Leading International Marathi News Daily                                    बुधवार, ७ जानेवारी २००९

पश्चाताप होत असेल तर राणे यांनी श्रेष्ठींची माफी मागावी
विलासरावांचा सल्ला

मुंबई, नवी दिल्ली, ६ जानेवारी / खास प्रतिनिधी

सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच नारायण राणे हे आपला पुढील निर्णय घेणार आहेत. राणे यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याने ते काँग्रेसमध्ये राहतील अशी अटकळ बांधली जात आहे. राणे यांना संयम बाळगावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला असतानाच विलासराव देशमुख यांनी मात्र पश्चाताप होत असेल तर राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितील पाहिजे, अशी भूमिका घेऊन राणे विरोध कायम ठेवला आहे.

वर्षभरात अडीच हजार भारतीय संकेतस्थळे ‘हॅक’
पाकिस्तानी सायबर हल्ल्याचा धोका!

पुणे, ६ जानेवारी/खास प्रतिनिधी

अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर लढण्यात येणाऱ्या युद्धाबरोबरच भारतीय ‘सायबरस्पेस’मध्येही ‘अतिरेक्यां’नी धुमाकूळ घातला असून गेल्या वर्षभरात सुमारे अडीच हजार भारतीय संकेतस्थळे ‘हॅक’ करण्यात आली आहेत! मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानी सायबरचाच्यांच्या कारवायांची वाकडी नजरही भारतीय संकेतस्थळांवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

चिनी मोबाईलवर बंदी?
मुंबई, ६ जानेवारी / प्रतिनिधी

ब्रॅण्डेड मोबाईलपेक्षा स्वस्त किंमतीत उपलब्ध असलेले चिनी मोबाईल फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. कारण या फोनवर बंदी घालण्याचा विचार दूरसंचार विभागातर्फे करण्यात येत आहे. चीनमध्ये स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या मोबाईलना ‘इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट नंबर’ (आयएमईआय) नसतो. त्यामुळे या मोबाईलचा थांगपत्ता लावणे कठीण जाते. दहशतवादी कारवायांमध्ये याच मोबाईल फोनचा वापर झाल्याचे अलीकडे झालेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दूरसंचार विभागातर्फे हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे कळते. भारतात सुमारे दीड कोटी चिनी मोबाईलची विक्री झाल्याचा दावा केला जात आहे. सरसकट सर्व चिनी मोबाईलवर बंदी न टाकता केवळ ज्या मोबाईल फोनना आयएमईआय नाही, त्याच मोबाईलवर बंदी घालण्यात येणार आहे. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट नंबर हा प्रत्येक जीएसएम मोबाईल फोनला देण्यात आलेला विशिष्ट क्रमांक असतो. एखाद्याचा फोन हरवला किंवा चोरला गेला आणि ग्राहकाने संबंधित मोबाईल सेवा कंपनीला त्या फोनचा आयएमईआय नंबर कळविल्यास तो फोन बंद करता येऊ शकतो. मोबाईलचा आयएमईआय नंबर मोबाईल बॅटरीच्या खाली लिहिलेला असतो. अथवा मोबाईलवर *#06# डायल केल्यावर मोबाईलच्या स्क्रीनवर आयएमईआय क्रमांक दिसतो.

पाकिस्तानी संकेतस्थळे पाहण्याचे टाळा
६६६.२ल्लॠ२.स्र्‘ या पाकिस्तानी संकेतस्थळाच्या माध्यमातून बारा लाखांहून अधिक भारतीय नेटिझन दर्जेदार गाण्यांची मेजवानी लुटतात. परंतु, त्यांचे हे संगीतप्रेम पाकिस्तानी सायबरचाच्यांसाठी ‘पर्वणी’ ठरत आहेत. या संकेतस्थळाला भेट दिलेल्या नेटिझनचे पासवर्ड आदी गोपनीय माहिती ‘हॅक’ करून त्यांच्या संकेतस्थळांमध्ये घुसखोरी करण्यात येत आहे. काही मिनिटांच्या अवधीतच सायबर दहशतवादी ही घुसखोरी करू शकतात. त्यामुळेच त्यासारख्या डॉट पीके, म्हणजेच पाकिस्तानमधील ‘डोमेन नेम’ असलेल्या संकेतस्थळांना भेट देण्याचे टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.

चिता कॅम्पमध्ये भीषण आग; शेकडो झोपडय़ा भस्मसात
मुंबई, ६ जानेवारी / प्रतिनिधी

ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प भागात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत शेकडो झोपडय़ा भस्मसात झाल्या असून अनेकजण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सायन-ट्रॉम्बे रोडवरील चिता कॅम्प येथील सेक्टर-डी, जोशी हॉटेलजवळील झोपडपट्टीत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटले जात आहे. सदर ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० झोपडय़ा असून हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. त्याचबरोबर वाराही असल्यामुळे ही आग अल्पावधीतच झपाटय़ाने पसरली. आग लागल्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे १२ बंब, सहा जम्बो वॉटर टँकर्स आणि आठ जेट्टी व चार रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
आगीमुळे दहापेक्षा जास्त सिलेंडरचे स्फोट होऊन आगीत २५ जण भाजल्याचे तसेच त्यांना सायन, शताब्दी आणि राजावाडी रुग्णालयात हलविल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत होते. मात्र रात्री सव्वा अकरा वाजेपर्यंत एकही जखमी या रुग्णालयांत पोहोचला नसल्याचे पालिका नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आगीबाबत काहीही माहिती उपलब्ध नव्हती.

पुरावे विश्वासार्ह नाहीत
इस्लामाबाद, ६ जानेवारी/पी.टी.आय.

मुंबईत दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याबद्दल भारताने दिलेले पुरावे विश्वासार्ह नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. विशेष म्हणजे, भारताचे पुरावे पुरेसे नसल्याचे काही वृत्तपत्रांत आलेले वृत्त चुकीचे आहे, असे राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते फरातुल्ला बाबर यांनी जाहीर केल्यानंतर काही तासांतच हे पुरावे विश्वासार्हच नसल्याचा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्ली या कनिष्ठ सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीसमोर बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री मलिक अहमद खान आणि परराष्ट्र सचिव सलमान बशिर यांनी हा दावा केला. या हल्ल्यातील आरोपींना हवाली करण्याची भारताची मागणी फेटाळताना बशिर म्हणाले की, उभय देशांमध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा करार झाला नसल्याने या मागणीचा विचार करता येणार नाही. या हल्ल्यात पाकिस्तानी सरकारातील घटकांचाही सहभाग असल्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याने उपखंडातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाल्याचेही ते म्हणाले. जागतिक पातळीवर भारत पाकिस्तानला एकटा पाडू पाहात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

निर्यातक्षेत्रातील एक कोटी भारतीय रोजगारास मुकणार!
नवी दिल्ली, ६जानेवारी/पी.टी.आय.

जागतिक मंदीच्या प्रभावामुळे देशातील निर्यातक्षेत्रातील तब्बल एक कोटी रोजगार येत्या मार्चपर्यंत बंद होतील, अशी भीती एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स’ या संघटनेचे अध्यक्ष ए. शक्तिवेलु यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जागतिक मंदीमुळे भारतीय मालाला परदेशात सध्या मागणी राहिलेली नाही. त्यामुळे या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. देशाच्या निर्यातीतून मिळणारे उत्पन्न हे ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या २० टक्के आहे. विशेष म्हणजे हे क्षेत्र प्रामुख्याने रोजगारप्रधान असून सध्या तब्बल दीड कोटी कामगार/कर्मचारी या क्षेत्रात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. चालू आर्थिक वर्षांच्या (एप्रिल २००८ ते मार्च २००९) पहिल्या तिमाहीत देशाच्या निर्यातीत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली होती. परंतु मंदीच्या तडाख्यामुळे गेल्या ऑक्टोबरमध्ये ही वाढ अवघ्या १२ टक्क्यांवर आली. गेल्या पाच वर्षांतील पहिल्यांदाच अशा प्रकारे नकारात्मक वाढ (निगेटिव्ह ग्रोथ) नोंदली गेल्याचे शक्तिवेलु म्हणाले.
डिसेंबर महिन्याची परिस्थिती नेमकी कशी आहे याची आकडेवारी अजून हाती आलेली नाही. परंतु डिसेंबरसह पुढील दोन महिन्यांतही ऑक्टोबरचीच पुनरावृत्ती होत राहण्याचीच शक्यता अधिक असेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यातच सरकारने अलीकडेच मंदीच्या तडाख्यातून सावरण्यासाठी दिलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये निर्यातक्षेत्राकडे दुर्लक्ष करण्याती आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. २००७-०८ या आर्थिक वर्षांत १६० अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. या वर्षी ती २०० अब्ज डॉलरची असेल असे लक्ष्य ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात ती जेमतेम १७५-१८० अब्ज डॉलपर्यंत जाईल, असेही ते म्हणाले.

प्रचंड निधी येऊनही आदिवासी मात्र विकासाच्या प्रतीक्षेतच
नंदुरबार जिल्ह्य़ातील रस्त्यांसाठी कोटय़वधींचा निधी येऊनही रस्ते झालेले नाहीत. उलट मक्तेदार, संबंधित खात्याचे अभियंते व त्यांच्याशी साटेलोटे असणारे लोकप्रतिनिधी दुर्गम भागातील विकासकामांच्या नावावर गर्भश्रीमंत झाले आहेत. रोजगार हमी योजनेच्या नावाखाली कामे मंजूर होतात, पण ती अजस्र यंत्राच्या साह्य़ाने पार पडतात. मात्र साहेबांच्या साप्ताहिक अहवालामध्ये प्रचंड मजूर संख्या आणि त्या प्रमाणात पैशांचे वाटप बिनधास्तपणे दाखविले जाते. नंदुरबार जिल्ह्य़ाला अनेक आदिवासी नेत्यांचे नेतृत्व लाभूनही दुर्दैवाने गुणात्मक विकास झाला नाही. आजही आदिवासींचे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी प्रश्न संपूर्णत: सुटलेले नाहीत. कुपोषणाचे ग्रहण अजूनही जिल्ह्य़ाला त्रस्त करीत आहे.

विलासरावांची नवी खेळी
नांदेड व लातूरवरून काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई, ६ जानेवारी / खास प्रतिनिधी

नांदेडला महसुली विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस पक्षात जुंपली आहे. नांदेडला विरोध करणाऱ्या लातूरच्या काँग्रेस नेतेमंडळींच्या विरोधात गंभीर दखल घेण्याची मागणी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसाने केली आहे. नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजकीयदृष्टय़ा झटका दिल्यानंतर विलासराव समर्थकांनी आता नवी खेळी केली आहे. बीडचे विभाजन करून आंबेजोगाई जिल्ह्य़ाची निर्मिती करावी व लातूर, बीड आणि आंबेजोगाई या तीन जिल्ह्य़ांसाठी लातूरला महसुली आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली आहे.

कडकडीत ‘बंद’
लातूर, ६ जानेवारी/वार्ताहर
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नवे महसूल आयुक्तालय नांदेड येथे स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जिल्ह्य़ामध्ये आज कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. शहरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. शिवाजी चौकात काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केले. किरकोळ दगडफेकीत एक एस. टी. बस, दोन मालमोटारी, एक मिनी बसचे किरकोळ नुकसान झाले. परभणीकरांनी आज कडकडीत ‘बंद’ पाळून या निर्णयाचा निषेध नोंदविला.
आज शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८