Leading International Marathi News Daily
 


बुधवार, ७ जानेवारी २००९
  सूक्ष्मातून साकारलेले विशाल तंत्रज्ञान..
नॅनो टेक्नॉलॉजी
  दलाल : शेअर बाजार
  शिष्यवृत्ती : एक चालकशक्ती
  हे विश्वचि माझे घर
  वैद्यक-शिक्षणाचे अथांग विश्व
  शोधाची जननी
  अलाहाबाद बँक :ऑफिसरपदाची तयारी
  कृषी क्षेत्रातील व्यवसायाची उत्तम संधी : काजू प्रक्रिया उद्योग
  इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय
  मराठी भाषेला योग्य व्यावसायिक प्रतिष्ठा मिळायलाच हवी!
  बीपीओ कॉल सेंटर

 

जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा आणि मानवाच्या प्रगतीचा प्रचंड व विलक्षण मोठा वारसा घेऊनच सजीव सृष्टी पुढे पुढे जात आहे. अंधारयुगातून मार्गक्रमणा करत अश्मयुगाकडून आज मानव जेट, इंटरनेट यांसारख्या तंत्रज्ञानात्मक युगाकडे येऊन पोहोचलेला आहे. या नवीन युगामध्ये तरुणांसमोर विविध क्षेत्रांतील आकर्षक संध्यांची दालने उभी आहेत. या संध्या नक्कीच व्यावसायिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारचे समाधान मिळवून देऊ शकतात. सध्याचे दिवस हे केवळ एखाद्या ऑफिसमध्ये क्लार्क किंवा स्टेनो म्हणून काम करणार अशा पद्धतीचे ध्येय ठेवणाऱ्या तरुणांचे नसून त्यांना ‘काहीतरी वेगळे करून दाखवायचंय’ असं सतत वाटत असतं. आर्टस्, सायन्स किंवा कॉमर्स तुम्ही कोणत्याही शाखेत शिक्षण घेत असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रात काही ना काही तरी करून दाखविता येईल अशा संध्या या बदलत्या जगामध्ये उपलब्ध होत आहेत. परंतु अशी संधी ओळखून ती प्राप्त करून घेऊन त्यामध्ये शस्वी होण्यासाठी आवश्यकता आहे ती अभियोग्यतेची आणि योग्य क्षमतेची. आज तंत्रज्ञानाच्या विविध शाखा उच्च शिक्षणासाठी खुल्या झालेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून मानव सुखमय भौतिक जीवनाचा आस्वाद घेत आहे. मानवी जीवन अधिकाधिक सोपे, सुलभ, सुखमय करण्यामध्ये तंत्रज्ञानाचा निश्चितच मोठय़ा प्रमाणात वाटा आहे. अशा या तंत्रज्ञानात्मक युगामध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होत असून सतत यामध्ये दर्जात्मक व गुणात्मक बदल झालेल्या नवनवीन शाखा उदयास येत आहेत. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या दोन अभ्यासक्रमांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ अजूनही प्रचंड आहे. याच तंत्रज्ञानयुक्त अभ्यासक्रमाच्याजोडीने आता येऊ घातलेली, किंबहुना उदयास येत असलेली आणखी एक शाखा म्हणजे ‘नॅनोटेक्नॉलॉजी’. आज कित्येक विद्यार्थ्यांना बारावी सायन्सनंतर इंजिनीयरिंग, आय. टी. किंवा बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या अभ्यासक्रमाकडे जावेसे वाटते परंतु याच्याच जोडीला ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, कष्ट करण्याची तयारी आहे त्यांनी जर ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ या शाखेचा विचार केला तर निर्विवादपणे ते उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात आणि जर आपल्याला आयुष्यात प्रगती करायची असेल तर वेगळी वाट शोधायलाच हवी. काय असतं की, मळलेली वाट आपल्याला प्रगतीकडे नेणार नाही असे मुळीच नाही, परंतु एखादी नवीन वाट तुम्हाला अधिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. रतन टाटांच्या नॅनो मोटारमुळे आपण नॅनो या शब्दाशी तसे बऱ्यापैकी परिचित आहोत, परंतु येथे आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे ती ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ या नवीन अभ्यासशाखेबद्दल. नॅनो ही एक मापनश्रेणी आहे. मापनाच्या मेट्रिक पद्धतीमध्ये नॅनो म्हणजे ‘अब्जावा’ भाग होय. एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा एक अब्जावा भाग. नॅनोमटेरियल, नॅनोइलेक्ट्रॉनिक्स, नॅनोडिव्हाइस, नॅनोपावडर इ.चा सरळ अर्थ असा की
 

ज्या गोष्टी नॅनोमीटर या परिमाणात मोजल्या जाऊ शकतात. नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने नॅनोमीटर स्केलवर म्हणजेच साधारणत: ०.१ ते १०० नॅनोमीटर यामध्ये होणाऱ्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा समावेश होतो. उदाहरण देऊनच जर हा आकार स्पष्ट करायचं झालं तर साधारणपणे एका मानवी केसाच्या व्यासाच्या दहा हजाराव्या भागाइतका छोटा भाग होय. नॅनोटेक्नॉलॉजी याचा अर्थ बऱ्याचदा मायक्रोस्कोपिक टेक्नॉलॉजी असा देखील घेतला जातो. हे तंत्रज्ञान म्हणजे ज्या गोष्टी नॅनोमीटर स्केलवर घडतात त्यांचा अभ्यास करण्याचे प्रगत तंत्रज्ञान आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इंजिनीयरिंग या सर्व शाखांचा मिळून एकत्रित अभ्यास नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. सन १९५९ मध्ये नोबेल पुस्कारविजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन यांनी 'There is plenty of room at the bottom' या विषयावर दिलेल्या व्याख्यानामध्ये नॅनोमीटर स्केलवरील पदार्थाच्या गुणधर्माचे महत्त्व विषद केले होते आणि या क्षेत्रात भविष्यात प्रचंड संधी आहे असे भाकीत देखील केले होते. अशा प्रकारे नॅनोटेक्नॉलॉजीची सर्वप्रथम दखल कोणी घेतली असेल तर ती रिचर्ड फेनमन यांनीच. तद्नंतर १९८६ मध्ये 'Engines of creation : The coming Era of Nanotechnology' या एरिक ड्रेक्सलर यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामुळे या तंत्रज्ञानाची अधिक प्रमाणात जागृती झाली असे म्हणता येईल. सध्या नॅनोपार्टिकल्सचा वापर अनेक प्रकारचे व्यवसाय व उद्योगधंदे यांमध्ये केला जातो. विविध क्षेत्रांमध्ये नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. वैद्यकीय शाखेत नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर विशेषकरून केला जाऊ शकतो. बायोमेडिकल क्षेत्रामध्ये नॅनोस्फटिकमय स्वरूपातील कॅल्शिअम-फॉस्फेटपासून कृत्रिम हाड संमिश्र तयार केले जाते. नैसर्गिक हाडामध्ये जी खनिजे असतात त्यासारख्या खनिजांपासून हे संमिश्र बनविले जाते आणि तरीसुद्धा अत्यंत मजबूतपणा त्यामध्ये असतो. या तंत्रज्ञानाचा वापर एखाद्या रोगातील कमकुवत पेशी शोधून त्यावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. नॅनो उपकरणाचा वापर करून रोगनिदान, उपचार केले जाऊ शकतात. वाहने तयार करण्याच्या कारखान्यात या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. प्लास्टिक नॅनो संमिश्राचा वापर करून वजनाला हलके परंतु मजबूत व गंज न पकडणारे गाडीचे भाग बनविण्यासाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. टोयोटासारखी कंपनी मुबलक प्रमाणात नॅनो संमिश्राचा वापर बंपर्समध्ये (मोटारीच्या पुढचा व मागचा आघात प्रतिबंधक दांडा) करते ज्यामुळे त्याचे वजन जवळजवळ ६० टक्के कमी होते आणि शक्यतो त्याला खळगे किंवा ओरखडे देखील पडत नाहीत. हेल्थकेअर कंपन्या जी विविध प्रकारची बँडेजेस तयार करतात त्यावर सिल्व्हर नॅनोस्फटिकांचा वापर केला जातो. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते तसेच वेदना शमविण्यास मदत होते. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उदा. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, लाँड्री मशीन्स यांच्यावरील पृष्ठभागावर सिल्व्हर नॅनोकणांचा वापर केला जातो
जेणेकरून त्यावर बसणाऱ्या बुरशीचा किंवा सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यास मदत होते. म्हणजेच नॅनोकोटिंगचा वापर केला जातो. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये देखील या तंत्रज्ञानाचा वापर करून धाग्याचा दर्जा वाढविता येतो. विविध औषधी द्रव्यांमध्ये नॅनोपार्टिकल्सचा वापर केला जाऊ शकतो. तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील विविध गुन्ह्य़ांच्या तपासकामात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर रोबोटच्या निर्मितीमध्येसुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारे नॅनोटेक्नॉलॉजी हे असे प्रगत तंत्रज्ञान आहे की ज्याचा वापर जीवनावश्यक अशा प्रत्येक गोष्टीमध्ये येत्या काही वर्षांत केला जाऊ शकतो व त्यामुळे पर्यावरण, संगणक, टेलिकम्युनिकेशन, मेडिकल,
इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी,टेक्स्टाईल यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात बदल घडून येऊ शकतो. त्याचप्रमाणे विविध रोजगारांच्या संध्या उपलब्ध होऊ शकतात. सध्या नॅनोमटेरिअलस, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स, नॅनोबायटेक्नॉलॉजी या तिन्ही प्रमुख विभागांमध्ये दिवसेंदिवस नवीन संशोधन सुरूच आहे. येत्या भविष्यकाळात नॅनोटेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर बऱ्याच उद्योगधंद्यांमध्ये आपल्याला दिसून येईल. येणाऱ्या २० वर्षांत १ ट्रिलिअन डॉलर (एकावर १२ शून्य इतकी संख्या) पेक्षाही अधिक किमतीची जागतिक बाजारपेठ नॅनोटेक्नॉलॉजीसाठी उपलब्ध होईल असे भाकित यु.एस. नॅशनल सायन्स फाऊंडेशनने वर्तविले आहे. नॅनोमटेरिअल्स, ोइलेक्ट्रॉनिक्स, नॅनोबायोटेक्नॉलॉजी इ. क्षेत्रातील संशोधनासाठी शेकडो अर्ज सध्या संशोधन संस्थामध्ये येत आहेत. या विषयातील शिक्षणानंतर बायोटेक, मेडिकल, फार्मास्युटिकल्स यांसारख्या कंपन्यांमध्ये लठ्ठ पगाराच्या मोठय़ा संध्या उपलब्ध आहेत. या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यापैकी एका विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. पीएच.डी.साठी मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्समधील एम.टेक. ही पदवी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्समधील एम.एस्सी. पदवी असणे आवश्यक आहे. तेव्हा मित्रांनो, विचार करा एका नवीन आव्हानात्मक विद्याशाखेचा. असे दिसून येते की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे या शाखेतील प्रमाण फारच कमी आहे याचे एक कारण म्हणजे एकतर त्यांना अशा वेगळ्या शाखेची माहिती नसते, माहिती करून घेण्याची इच्छा नसते आणि दुसरं म्हणजे मोठे होण्यासाठी प्रयत्न, क्षमता हे सर्व लागतेच पण प्रथमत: मोठे होण्यासाठी मोठे विचार हवेत, (यू मस्ट थिंक बिग!) जे आपल्याजवळ नसतात. ‘खयाल’ नेक तर असायलाच हवेत परंतु बडेसुद्धा हवेत. माफक विचार, जेमतेम विचार तुम्हाला जेमतेमच यश देतात. तेव्हा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. हे मान्य आहे की एवढा चांगला अभ्यासक्रम भारतातल्या इतर राज्यांतील विद्यापीठांमध्ये आहे परंतु
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या ठिकाणी (आय.आय.टी.,मुंबई सोडून) किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही विद्यापीठात नाही. परंतु तरीही जर इच्छा असेल तर मार्ग निघतोच. हे एक खर तर दुर्दैवच आहे की, आय.आय.एम.सारखी जगप्रसिद्ध संस्था शिलाँग, रांची, बिहारसारख्या राज्यांमध्ये आहे. परंतु महाराष्ट्रात किंबहुना भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नाही. (त्यामागे आपल्या राजकारण्यांचा स्वार्थ दडलेला असू शकतो.) जर हे घडू शकते तर ‘नॅनोटेक्नॉलॉजी’सारख्या येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाविषयी आपण एवढय़ा लवकर अपेक्षा न केलेलीच बरी. असो. या सर्व गोष्टी किंवा अडचणी असल्या तरी जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर काहीच कठीण नाही आणि म्हणूनच जे ध्येय ठरवाल ते उच्च प्रतीचे ठरवा आणि जिंकून दाखवा, मोठे होऊन दाखवा. स्वामी विवेकानंद या संदर्भात म्हणतात, ``This life is a great chance. Seek the highest, aim at the highest, and you shall reach the hight.''

नॅनोटेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्था :
१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर, कर्नाटक, www.iisc.ernet.in
२) अमिटी विद्यापीठ (नोएडा, दिल्ली, लखनौ), www.amity.edu
३) जादवपूर इन्स्टिटय़ूट, कोलकाता, प. बंगाल, www.jadavpur.edu
४) वेल्लोर विद्यापीठ, वेल्लोर, तामिळनाडू, www.vit.ac.in
५) राजस्थान विद्यापीठ, जयपूर, www.uniraj.ernet.in्ल
६) सत्यभामा विद्यापीठ, चेन्नई, तामिळनाडू, www.satyabama.info
७) सराह टकर कॉलेज, तिरुनेवली, तामिळनाडू येथे
नॅनोसायन्समध्ये बी.एस्सी. उपलब्ध आहे.
८) आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम येथे एम.एस्सी., एम.टेक. उपलब्ध आहे.
९) पंजाब विद्यापीठ, चंडीगढ (www.puchd.ac.in) येथे एम. टेक. उपलब्ध आहे.
१०) युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास (www.unom.ac.in) येथे एम.एस्सी., एम.टेक. हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. - वरील संस्थांशिवाय आय.आय.टी. या जगप्रसिद्ध संस्थेच्या मुंबई, मद्रास, कानपूर, खरगपूर, दिल्ली, गुवाहाटी येथे
नॅनोटेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात.
अधिक माहितीसाठी वेबसाइट-www.iitb.ac.in.
सुहास कदम
suhaskadam11@yahoo.in