Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ८ जानेवारी २००९

मुंबई कोलमडणार!
मुंबई, ७ जानेवारी / प्रतिनिधी

मालवाहतूकदारांच्या संपाबरोबरच तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनीही आजपासून पुकारलेल्या संपामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांकडून होणारा पुरवठा जवळपास ठप्प असल्याने हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) वगळता शहरातील अन्य पेट्रोल पंप बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कमी दाबाने होणाऱ्या गॅस पुरवठय़ामुळे महानगर गॅसची शहरातील अर्धीअधिक सीएनजी फिलिंग स्टेशन बंद पडली होती. ही परिस्थती कायम राहिल्यास शहरात इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेला आदेश डावलून देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १३ तेल कंपन्यांतील अधिकारी आपल्या मागण्यांसाठी ऑईल सेक्टर ऑफिसर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे चार प्रमुख तेलशुद्धीकरण प्रकल्पांतील काम ठप्प झाले आहे. मात्र या संपाचा अद्याप देशातील तेलपुरवठय़ावर परिणाम झालेला नाही. दरम्यान ऑईल सेक्टर ऑफिसर्स असोसिएशनच्या १७ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

कसाब आमचाच; पाकिस्तानची कबुली
इस्लामाबाद, ७ जानेवारी/पीटीआय

मुंबईवर गेल्या २६ नोव्हेंबर रोजी केलेल्या हल्ल्यात सहभागी असलेला व जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल आमीर इमान कसाब हा पाकिस्तानचाच नागरिक असल्याचे पाकिस्तानने आज अखेर मान्य केले. कसाब हा पाकिस्तानी नाहीच अशी सातत्याने नकारघंटा वाजविणाऱ्या पाकिस्तानला अखेर सत्य मान्य करावेच लागले. पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद सादिक यांनी यासंदर्भात आज सांगितले की, पाकिस्तानच्या यंत्रणांनी केलेल्या तपासामध्ये कसाब हा पाकिस्तानचा नागरिक असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, सरकारी यंत्रणांशी कसाब याचा काहीही संबंध नाही असेही या तपासात आढळून आले आहे.

महाघोटाळ्याने ‘सत्यम’ गाळात
मुंबई, ७ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

देशातील चौथ्या क्रमांकाची आय.टी. कंपनी सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष रामलिंग राजू यांनी आज कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना, आजवर केलेल्या वित्तीय गैरव्यवहार व हिशेबातील घोटाळ्यांची कबुली देऊन मोठा गहजब निर्माण केला. त्यांच्या या कबुलीने कंपनीला गंभीर स्वरूपाच्या अरिष्टात ढकलण्याबरोबरच, कंपनीच्या ५१ हजारांच्या घरात असलेले कर्मचारी आणि लाखो भागधारकांचे भवितव्यही अंधातरी लोटले. भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात धक्कादायक व भीषण आर्थिक घोटाळा, अशीच सामाईक प्रतिक्रिया या प्रकरणी आज संपूर्ण देशभरात उमटताना दिसली. भांडवली बाजाराचे नियमन करणारी शिखर संस्था ‘सेबी’चे अध्यक्ष सी. बी. भावे यांनी सत्यम कॉम्प्युटरचे प्रकरण ‘भयंकर धाटणी’चे असल्याची प्रतिक्रिया देताना कायद्याने संमत कारवाईसाठी सरकार, कंपनी व्यवहार खाते व शेअर बाजाराच्या संचालकांशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले.

समभाग ७७ टक्क्यांनी कोसळला
मुंबई, ७ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लि.चे प्रवर्तक व अध्यक्ष रामलिंग राजू यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा तसेच कंपनीत झालेल्या गैरव्यवहाराची त्यांनी दिलेली कबुली, याची बातमी शेअर बाजारात येऊन थडकताच सत्यमच्या समभागांची जोरदार घसरण सुरु झाली. या घटनेचा शेअर बाजारास मोठा धक्का बसला असून सेन्सक्स आज तब्बल ७४९ अंशांनी कोसळला. तर सत्यमचा समभाग ७७.६९ टक्क्यांनी कोसळून ३९.९५ रुपयांवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात आज सुरुवातीला तेजीचे वातावरण होते. मात्र सत्यमची ही बातमी येताच सर्व चित्र पालटले आणि सत्यमच्या समभागांबरोबर सेन्सक्सचीही घसरगुंडी झाली. सत्यमच्या प्रवर्तकांनी कंपनीचा नफा फुगवून दाखविल्याचे मान्य केल्याने देशातील कॉर्पोरेट जगताला धक्का बसला. सत्यमचा समभाग आज बाजार उघडला त्यावेळी १३९.१५ रुपये होता. बाजार बंद होताना हा समभाग ७७.६९ अंशांनी घसरुन ३९.९५ रुपयांवर घसरला.

नवीन पाचशे डी.एड. कॉलेजची मान्यता रद्द
नागपूर, ७ जानेवारी/ प्रतिनिधी

राज्यात २००८-२००९ या वर्षांत मान्यता देण्यात आलेल्या ५१५ नवीन डी.एड. महाविद्यालयांना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एन.सी.टी.ई.) दिलेली मान्यता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवली असून, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन या महाविद्यालयांच्या मान्यतेचा नव्याने विचार करण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत सुरू झालेल्या १५७ महाविद्यालयांना या निर्णयाचा लगेच फटका बसणार आहे.राज्यात शिक्षकांची संख्या वाढली असूनही दरवर्षी हजारोंच्या संख्येत डी.एड. प्रशिक्षित शिक्षक तयार होत आहेत. अनेक उमेदवार आधीच बेकार असताना या नव्या उमेदवारांमुळे बेकारांची नवी फौज तयार होत आहे. त्यामुळे नवी डी.एड. महाविद्यालये सुरू करण्यास सरकारला प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी याचिका भंडारा जिल्ह्य़ातील गंगाधर शेंडे यांच्यासह दोन शिक्षकांनी केली होती.

मुंबई हल्ला : ‘फायनान्शियल इंटेलिजन्स’चे अपयशही चव्हाटय़ावर
मुंबई, ७ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने संरक्षण दल आणि पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या असफलतेवर आणि राजकारण्यांच्या बेजबाबदार वृत्तीवर आजवर बरीच टीका होत असली तरी देशाच्या आर्थिक राजधानीला हादरे देणाऱ्या या भयानक कारस्थानातून आपल्या वित्तीय व्यवस्थेतील गुप्तचर यंत्रणेचे अपयशही पटलावर आणले आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि अफरातफरीसारख्या दुष्प्रवृत्तींपासून आपल्या वित्तीय व्यवस्थेच्या सक्षमतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारा एक महत्त्वाचा संशोधक अहवालच या निमित्ताने पुढे आला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या टॉवरवरील तालिबान्यांच्या हल्ल्याबाबत सुरू झालेल्या तपासाच्या परिणामी, अमेरिकेसह सबंध जगभरात अशा प्रकारच्या भयंकर कारस्थानांच्या तपासासाठी ‘वित्तीय गुप्तचर नोंदी’ (फायनान्शियल इंटेलिजन्स) सारख्या सशक्त साधनाचा प्राधान्याने वापर होऊ लागला आहे. दहशतवादी कारस्थानांचा आर्थिक कणा मोडण्यासाठी, मुख्य सूत्रधारांना जेरबंद करण्यासाठी, त्याचप्रमाणे भविष्यात यासारखे हल्ले थोपविण्यासाठी ‘फायनान्शियल इंटेलिजन्स’ आणि ‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’ ही महत्त्वाची साधने ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कसाबची कबुली देणाऱ्या पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागाराची हकालपट्टी
इस्लामाबाद, ७ जानेवारी/पीटीआय

अजमल आमीर इमान कसाब हा पाकिस्तानचा नागरिक असण्याची शक्यता आहे असे वक्तव्य मंगळवारी रात्री करणारे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) महमुद अली दुर्राणी यांची त्या पदावरून पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज रात्री हकालपट्टी केली. दरम्यान त्या आधी कसाब हा पाकिस्तानी असल्याचे पाकिस्तानने आज अखेर मान्य केले होते. यासंदर्भात पंतप्रधान निवासस्थानातून आज जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान व अन्य सहकाऱ्यांना विश्वासात न घेता बेजबाबदार विधाने व वर्तन केल्याबद्दल महमुद अली दुर्राणी यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून दूर करण्यात आले आहे.

रहिवाशांच्या सतर्कतेमुळे वाचले डॉक्टर महिलेचे प्राण!
कल्याण, ७ जानेवारी/वार्ताहर

येथील वल्लीपीर रस्त्यावरील उषा संकुलन इमारतीत राहणाऱ्या डॉ. मृणाली लोखंडे यांच्या फ्लॅटचा दरवाजा उचकटून चोरटय़ांनी घरात घुसून त्यांना मारहाण करीत मारुती व्हॅनमधून पळवून नेण्याचा प्रयत्न दोन रखवालदार आणि सोसायटीतील रहिवाशांच्या सतर्कतेमुळे फसला. या प्रकरणातील बबन धावडे (५२) आणि मनोज चव्हाण (२२) या दोन दरोडेखोरांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.आज पहाटे या दोघांनी डॉ. मृणाली लोखंडे यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर डॉ. मृणाली यांना त्यांनी जबर मारहाण केली. यात त्यांच्या हाताचे बोट तुटले. त्या अवस्थेत त्यांना फरफटत ते बाहेर घेऊन आले. सोबत आणलेल्या मारुती व्हॅनमध्ये टाकून त्यांचे अपहरण करण्याचा, तसेच हत्या करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र तिथे असणारे दोन रखवालदार आणि रहिवाशांच्या सतर्कतेमुळे डॉ. मृणाली यांचे प्राण वाचले. त्यांनी या दोन मारेकऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मृणाली यांना जबर मारहाण झाली असून, त्यांना उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती शेजारच्याच खोलीत झोपले होते. एवढा गोंधळ झाला तरी त्यांना जाग कशी आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोलापूरजवळील अपघातात सातजण ठार
सोलापूर, ७ जानेवारी/प्रतिनिधी

सोलापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या हैदराबाद रस्त्यावरील दोड्डी गावच्या पुलाजवळ एका आराम बसने टाटा सुमोला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सातजण जागीच ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला. तीन दिवसांत त्याच ठिकाणी दुसरा अपघात झाल्याने घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख ज्ञानेश्वर फडतरे यांनी पाहणी केली. अपघातातील मृत आणि जखमी हे हैदराबाद येथे ग्रीन पल्स या विमा कंपनीच्या परिषदेसाठी जाऊन परत त्यांच्या टाटा सुमोत या गाडीने बारामतीकडे निघाले होते. दोड्डी पुलाजवळ रस्त्यात एक मालमोटार बंद अवस्थेत थांबली होती. तिला ओव्हरटेक करीत असतानाच समोरून हैदराबादकडे निघालेल्या वोल्व्हो या आरामबसची जोरदार धडक टाटा सुमोला बसली.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८