Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

डॉग शो

नेहा: हॅलो काकू, नेहा बोलतेय.
शरयू: नेहा? अगं, कशी आहेस?
नेहा: मी मस्तय. अगं, आईकडे फोन केला होता, पण कोणी उचलतच नाहीये. मग तुला फोन केला.
शरयू: अच्छा, आई भेटली नाही, म्हणून मला फोन केलास हो..
नेहा: काकू, तू पण ना..
शरयू: जाऊ दे गं. गंमत केली तुझी.
नेहा: काकू, अगं आज सकाळपासून सोसायटीतल्या सगळ्यांची एवढी आठवण येत होती ना. कसे आहेत गं सगळे? शाल्मली, शंतनू काय करताहेत? बोलव ना तिला.
शरयू: दोघंही घरात आहेत कुठे? शंतनू गेलाय झाडं बघायला आणि शाल्मली गेलीय कुत्र्यांचा क्लास घ्यायला.

 

नेहा: कुत्र्यांचा क्लास? हे काय प्रकरण?
शरयू: काही विचारू नकोस. तुला माहीत आहे ना. दरवर्षी आपल्या सोसायटीत २६ जानेवारीला कार्यक्रम असतो. या वर्षी ‘डॉग शो’ आहे.
नेहा: डॉग शो? आणि हे एवढे ‘डॉग्ज’ आले कुठून?
शरयू: सोसायटीनं पाळले आहेत हे डॉग्ज..
नेहा: काकू, असं कोडय़ात बोलू नकोस. नीट सांग ना मला.
शरयू: अगं, तू मध्ये बातमी वाचलीस असशील ना की, उपद्रवी कुत्र्यांना आता ठार मारणार म्हणून. ती बातमी वाचल्यापासून शाल्मली आणि शंतनू अस्वस्थ झालेच होते..
नेहा: ..आणि या अस्वस्थेततूनच त्यांच्या डोक्यात काहीतरी नवीन उपक्रम शिजला असेल. हो नं!
शरयू: तर काय? ही बातमी वाचल्यापासून आपल्या एरियातल्या सगळ्या कुत्र्यांना वेगवेगळ्या सोसायटय़ांनी दत्तक घ्यावं, यासाठी प्रयत्न करताहेत.
नेहा: दत्तक घ्यायचं म्हणजे?
शरयू: दत्तक घ्यायचं म्हणजे त्या कुत्र्यांची देखभाल करायची. त्यांना खायला घालायचं. डॉक्टरांकडे नेऊन आ णायचं, त्यांची स्वच्छता करायची..
नेहा: ऐकायला हे सगळं छान वाटतंय गं काकू, पण करणार कोण हे सगळं? आणि हे करायला वेळ मिळत नाही, म्हणून तर कित्येक कुटुंबं कुत्री कितीही आवडत असली तरी पाळायच्या भानगडीत पडत नाहीत.
शरयू: तू कशी अगदी सगळ्या सोसायटय़ांची प्रतिनिधी असल्यासारखं बोलते आहेस. अगदी अशीच रिअ‍ॅक्शन आली सगळ्यांच्याकडून. आम्हालाही ते अपेक्षितच होतं म्हणा. पण म्हणून शाल्मली -शंतनू गप्प बसतील असं वाटलं तुला? इतर वेळेस दोघांचं एक मिनिट पटणार नाही, पण अशा वेळेला मात्र दोघं एक होतात.
नेहा: आणि त्यांच्या मागे तुम्ही घट्ट उभे असता. मग काय, सगळ्यांनी मिळून काही तरी फंडू कल्पना काढली असेल.
शरयू: अगदी बरोबर ओळखलंस. तूही त्यांच्याबरोबर काम केलं आहेस नां!
नेहा: हो गं. तेच तर इथे मिस करत्येय. अगं, मीच काय आशीषही जाम इम्प्रेस झालाय दोघांमुळे. चिल्ड्रेन्स डेचा तो ट्री प्लॅन्टेशनचा कार्यक्रम तर त्याला इतका आवडला ना. पण काकू, न्यू इअरला काय केलंत गं!
शरयू: काही नाही. या वर्षी न्यू इयर सेलीब्रेशन करायचं नाही, असं आपल्या सोसायटीनं ठरवलं होतं.
नेहा: म्हणजे? मग भेटलासुद्धा नाहीत? एकत्र जमला नाहीत?
शरयू: एकत्र जमलो होतो गं. बरोबर बारा वाजता. तेव्हा शांतपणे फक्त पणत्या उजळल्या आणि सायलीनं भजनं म्हटली. बस्स! एवढंच. नव्या वर्षांचं स्वागत केलं, पण शांतपणे, आणि खरं सांगायचं, ना तर सगळ्यांना कुत्र्यांपुढे काही सुचत नाहीये.
नेहा: पण काकू, कुत्री तर कायमच होती की आपल्या एरियात? मग आताच का सगळ्यांना एवढं प्रेम वाटायला लागलं?
शरयू: त्याला कारण हा कुत्र्यांना मारायचा निघालेला फतवा.
नेहा: पण कुत्री त्रास देत असतील तर त्यांना मारणंच योग्य नाही का? कारण शेवटी प्रायॉरिटी माणसालाच द्यायला पाहिजे ना!
शरयू: अगं, पण मुळात ही भटकी कुत्री उपद्रवी का होतात, ते पाहायलं पाहिजे ना! खायला मिळालं नाही की, माणसंसुद्धा कशी वागतात? पोटाची भूक फार वाईट असते. इतरही अनेक कारणं असतात, पण मुख्य असते ती पोटाची भूक. एवढय़ा सोसायटय़ा आहेत, कितीतरी अन्न जमेल एकत्र केलं तर, दोन-तीन कुत्र्यांची भूक सहज भागेल. साहजिकच सुरुवात आपल्या सोसायटीपासून झालीये.
नेहा: अगं, पण हे अन्न कोणी एकत्र करायचं, कुत्र्यांना कोणी खायला घालायचं?
शरयू: दत्ताराम करतो ते सगळं. केरवाल्यालाही हल्ली अन्न वेगळं आणि कचरा वेगळा द्यावा लागतो. मग दोघांच्याही बायका मिळून कुत्र्यांना खायला देतात.
नेहा: त्यामुळे कचऱ्यात आता अन्न काही पडत नसेल ना! नाही तर त्या कचराकुंडीपाशी काय भांडणं चालतात. कचरा सगळीकडे पसरतो, प्लास्टिकच्या पिशव्या त्यांच्या पोटात जातात, या सगळ्याला पण आळा बसेल नाही?
शरयू: हो नं. अगं, आता सगळ्यांना व्यवस्थित खायला मिळतंय. वखवख नसते, रविवारी त्यांच्या सामूहिक आंघोळीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे स्वच्छ दिसतात. बघशील ना, तर ओळखणार नाहीस. परवाच पुरोहितांनी पट्टे स्पॉन्सर केलेत. त्या पट्टय़ांना घुंघरं लावलीयेत. काही विचारू नकोस.
नेहा: मग काय, सगळी कुत्री खुशीत असतील!
शरयू: अगं, प्रेमानं कोणीही सुधारतं. कुत्र्यासारखं इमानी जनावर त्याला अपवाद असेल का? वस्सकन कुणाच्याही अंगावर जाणं खूपच कमी झालंय. उलट सोसायटीला खूपच प्रोटेक्शन मिळतंय. चांगला वचक बसलाय सगळ्यांना. आता सोसायटीच्या मेन्टेनन्समध्ये ‘डॉग मेन्टेनन्स’ असा पॉइंट अ‍ॅड झालाय.
नेहा: काय सांगतेस काय काकू? सगळ्यांनी बरं मान्य केलं हे. जोशी काकू, राजेकाका म्हणजे तर कुत्र्यांचे अगदी हाडवैरी..
शरयू: जोशीकाकू? आता त्या पक्क्या श्वानप्रेमी झाल्या आहेत. राणीची पाच पिल्लं त्यांच्या घरात अगदी सुखेनैव नांदताहेत.
नेहा: बापरे! कुत्र्यांची पिल्लं आणि जोशीकाकूंच्या घरात? हे कसं घडलं?
शरयू: अगं, मोठी स्टोरी आहे ती. ये कधी तरी घरी, मग सांगते.
नेहा: ए काकू, आताच सांग ना!
शरयू: खरं तर ती अगदी रंगवून रंगवून सांगण्यासारखी गोष्टी आहे, पण आता तेवढा वेळ नाही म्हणून अगदी थोडक्यात सांगते. गंधालीचं म्हणजे जोशीकाकूंच्या सुनेचं पहिलं मिसकॅरेज झालं, ते तुला माहिती आहे ना! आता दुसऱ्यांदा दिवस गेलेत, त्यातही खूप कॉम्प्लीकेशन्स होत्या. डिलिव्हरीही अवघडच होती. तिकडे तिची डिलिव्हरी आणि इकडे राणीची गडबड. त्यात त्यांनी मागं राणीची पिल्लं बाहेर फेकून दिली होती. आठवतंय ना! त्यानंतरच गंधालीचं मिस्कॅरेज झालं. तेव्हा राणीचा शाप लागला, असं त्यांच्या मनानं घेतलं. या वेळेसही नेमकी दोघींची एकच वेळ. तेव्हा बोलल्या देवाला, गंधालीची हातीपायी धड सुटका कर. राणीची पिल्लं मी सांभाळेन. आणि बोलाफुलाला गाठ पडली की! गंधालीला मुलगा झाला. दोघंही सुखरूप आहेत. मग काय, जोशीकाकू राणीची पिल्लं सांभाळताहेत.
नेहा: मी लग्न होऊन गेल्यापासून किती काय काय घडतंय सोसायटीत? पण काय गं काकू, लहान मुलांना कुत्र्यांच्या सहवासात ठेवू नये म्हणतात ना?
शरयू: अगं, गंधाली तिच्या माहेरी आहे ना. आणि ती घरी येईपर्यंत ही पिल्लं चांगली मोठी झालेली असतील. मग ती थोडीच घरात असतील? मे तर आताच उनाडक्या करायला लागलीय.
नेहा: आता ही मे कोण?
शरयू: अगं, त्या पिल्लांची नावं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आणि मे अशी ठेवलीयेत. त्यातली ही मे..
नेहा : How cute! थोडक्यात काय, तर सगळी सोसायटी मस्त ‘कुत्रेमय’ झालीय.
शरयू: होय आणि ते लोण हळूहळू इतर सोसायटय़ांमध्येही पोहोचतंय. आधी कोणीच ही कल्पना मान्य केली नव्हती. त्यामुळे सगळ्या कुत्र्यांना आपल्याच सोसायटीनं दत्तक घेतलं होतं. आता इतरही सोसायटय़ा पुढे येताहेत. परवाच स्प्रिंगफील्डनं तीन कुत्री नेली. एव्हरशाईननं दोन नेली आहेत. राणीची पिल्लं तर खूपच डिमान्डमध्ये आहेत, पण ती थोडी मोठी झाल्याशिवाय द्यायची नाहीत असं ठरलंय.
नेहा: अशी सगळ्या कुत्र्यांची सोय झाली की , शाल्मली बहुधा वाघ वगैरे दत्तक घेईल.
शरयू: हो गं. नॅशनल पार्कनं तसं आवाहन केलंय ना. शाल्मलीच्या डोक्यात तसा काही कीडा वळवळत असेलच. परवाच बापलेकीची चर्चा चालली होती. एक वाघ दत्तक घ्यायचा तर किती खर्च येत असेल..
नेहा: म्हणजे उद्या शाल्मलीनं वाघ दत्तक घेतल्याची न्यूज कानावर आली तर आश्चर्य वाटायला नको. पण तिच्या आताच्या ‘कुत्रा दत्तक योजने’ला हातभार म्हणून आमच्याही सोसायटीत हा प्रस्ताव मांडते.
शरयू: आता खरी तिची मैत्रीण शोभतेस बघ. आणि या दोघंही सव्वीस जानेवारीचा ‘डॉग शो’ बघायला.
नेहा: ते तर मी येणारच. अं. हं. आम्ही येऊ. तेव्हा भेटूच. बाय. आईला सांग गं. माझा फोन येऊन गेला म्हणून.
शुभदा पटवर्धन.
shubhadey@gmail.com