Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

खूप वेळा आपण ऐकीव बातम्यांवर, लेखांवर विश्वास ठेवतो आणि पटकन काही तरी निष्कर्ष काढून मोकळे होतो. याच निष्कर्षांतून काही विधानंही करून टाकतो. हल्ल्यानंतर झालेल्या ‘इव्हेन्टस्’मध्ये काही टक्के तरुणाईनं बेजबाबदारपणाचं दर्शन घडवलंही असेल, पण ते समजाचे, तरुणाईचे प्रतिनिधी नाहीत, एवढं निश्चित. माझ्या अस्वस्थ मनाची खात्री पटवून देण्यासाठीच मी सगळी पायपीट केली होती. या पायपीटीनं मला तरुणाईचं वेगळं रूप दिसलं. हे रूपही समाजासमोर यावं, बेजबाबदारपणे वागणाऱ्या तरुणाईनं यावरून काही बोध घ्यावा म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अनुभव लिहूनही काढले.
२६ डिसेंबर २००८ नेहमीसारखाच आमचा घोळका चर्चगेट स्टेशनवर स्वप्नालीची वाट बघत बसला होता. स्वप्नाली आली तीच मुळी रागाच्या आवेशात. तिला विचारलं, अगं काय झालं? अशी चिडलीयेस का? स्वप्नाली म्हणाली, ‘अगं आता ट्रेनमधून येत होते तर आपल्याच वयाच्या काही मुलींचा घोळका माझ्यासमोर बसलेला. त्यांची चर्चा चालू होती, म्हणे आज २६ डिसेंबर हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला. आज पण स्टेशनवर आतंकवादी आले तर काय मजा येईल ना.. ते ऐकलं आणि वाटलं एक कानाखाली मारावी तिच्या, अरे तो

 

काय लहान मुलांचा खेळ होता का पुन्हा अनुभव घेण्यासाठी!
तिने सांगितलेला तो किस्सा आम्हाला सुन्न करून गेला. पण ते ऐकलं आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. इतकी असंवेदनशीलता? आपण इतकं बोथट झालोय का? की आपण अशा जीवघेण्या हल्ल्याला अ‍ॅडव्हेंचरस म्हणावं? पण गेले काही दिवस एकंदरीतच तरुणाई, तिची बेजबाबदार मानसिकता, तिचं वागणं यावर सगळीकडून हल्ला होतो आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून आयोजित केलेल्या विविध रॅलीज, श्रद्धांजली सभा, मानवी साखळी, कॅण्डल मार्च.. सगळ्यात तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता, यात शंका नाही. पण या तरुणाईकडे पुरेसं गांभीर्य नव्हतं, भावनेपेक्षा दिखाऊपणा जास्त होता, अशा विविध कारणांनी अनेक लेख, पत्रं लिहिली गेली आणि तरुणाई टीकेचं लक्ष्य झाली. या पाश्र्वभूमीवर स्वप्नालीने सांगितलेल्या प्रसंगानं आणखीनच अस्वस्थ केलं. तरुणाईवरची ही टीका, असंवेदनशील किंवा बोथटपणाचं लावलेलं लेबल, दिखाऊपणावरची शेरेबाजी, हे सारं या पिढीची प्रतिनिधी म्हणून खूपच बोचत होतं.
मनाच्या या अस्वस्थ अवस्थेतच ३१ डिसेंबरच्या रात्री मी ११ वाजता तरुणाईच्या नववर्षांच्या स्वागताचं मोस्ट हॅपनिंग प्लेस असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला गेले. घरातून निघताना एक प्रकारचा उदासपणा, अस्वस्थता वाटत होती. सारखं मनात येत होतं, तरुणाईच्या बोथटपणाचं प्रदर्शन बघायला मिळू नये. आणि खरोखरच गेटवेला गेल्यानंतरचं दृश्य फार वेगळं होतं. गेटवेवर घालवलेल्या दोन तासांत मी जे पाहिलं, जे अनुभवलं ते खूप वेगळं होतं. मला मोठय़ाने ओरडावसं वाटलं, येस आय वन. आमची संवेदनशीलता अजून बोथट झालेली नाही. कोणी काहीही म्हणा, देशावर असा हल्ला झाला असताना आम्ही आनंद साजरा करणार नाही. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात नववर्षांचे स्वागत करणारे तरुण सगळ्यांना त्यांच्या कृतीतून हाच संदेश देऊ पाहात होते, आम्ही आज इथे जमलोय ते आमची शक्ती दाखवायला. गेटवेवरील या दृश्यात जरा बरं वाटलं आणि खातरजमा करण्यासाठी आणखी काही ठिकाणी जावंसं वाटू लागलं. म्हणून गेटवेसमोरून मी लिओपोल्डच्या समोर आले. तिथे दोन तरुण मुलं हातात ैा१ी ँ४ॠ२' चे बोर्ड घेऊन उभी होती. कुतूहल म्हणून मी त्यांच्याकडून हा काय प्रकार आहे हे जाणून घेतलं, तेव्हा समजलं की ५्र३ पुणे येथून भूषण लोढा आणि त्याचा मित्र अंकुश झवर नवीन वर्षांच्या सुरुवातीस सर्व भारतीयांना ‘एकसंध भारत’ हा मंत्र त्यांच्या या छोटय़ाशा प्रयत्नातून देऊ पाहात होती. प्रत्येक भारतीयाने नवीन वर्षांच्या सुरुवातीस एकमेकांना जादूची झप्पी देऊन नवीन वर्षांची सुरुवात करावी हा त्यांचा उद्देश होता. खूप छान वाटलं. पुण्यावरून दोन तरुण नववर्षांचे स्वागत अशा अनोख्या पद्धतीने करत होते. आपली एकात्मता जपण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत होते हे बघून खूप आनंद झाला.
विचार केला आता मरीन ड्राइव्हवरून गिरगाव चौपाटीला जाऊ. तिथे पण असाच माहौल असावा ही प्रार्थना मनातल्या मनात करायला विसरले नाही. मरीन ड्राइव्हला आलेले जथ्थे हे एकतर टवाळखोर मुलांचे होते, नाहीतर उच्चभ्रूंचे. त्यांची नववर्षांची मस्त मजा चालली होती. परत एकदा नैराश्य. पण म्हटलं, अरे, या टवाळखोरांकडून आणखी काय अपेक्षा करणार? आणि हा उच्चभ्रू वर्ग तर येऊन गेलेल्या संकटाची भीषणता समजूच शकत नाही. ज्याला रोज स्वत:च्या जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो तो सामान्य मुंबईकरच या संकटाचं महत्त्व समजू शकतो आणि मूठभरांच्या असंवेदनशीलतेमुळे का नाराज व्हायचं? असं म्हणून तिकडे दुर्लक्ष करून गिरगावकडे निघाले. गिरगावच्या वाडय़ांमधून फिरत असताना कुठेच उत्साहाचा माहौल नव्हता. पण झावबाच्या वाडीत नववर्ष सेलिब्रेशनची आणखी एक पद्धत बघायला मिळाली. वॉर्ड क्र. २१८ मधील मनसेच्या काही तरुणांनी १२ वाजता भरपूर मेणबत्त्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती. मनाने पुन्हा एकदा म्हटलं, येस आय वन. अरे ठीक आहे, काही मूठभर हा दिवस जल्लोषात साजरा करत आहेत पण बाकीच्यांची संवेदनशीलता तर बोथट झालेली नाही हे काय कमी आहे. तशीच मी पुढे चालत येत असताना काही लहान मुलं येणाऱ्या जाणाऱ्यांना ‘हॅपी न्यू इयर’ करीत होती. छान वाटलं, चला बरं झालं. या हल्ल्याचा परिणाम काही प्रमाणात लहान मुलांवर झाल्याचं म्हटलं जातंय, पण चौकाचौकातून दिसणाऱ्या लहानग्यांची मनंही सावरली आहेत. नवीन वर्षांचं स्वागत मोकळेपणी करताहेत हे दृश्य खरंच खूप सुंदर होतं.
या सगळ्या दृश्यांची नोंद करताना माझ्या मनाला खूप आनंद होत होता. कारण ज्या अवस्थतेत मी घरातून बाहेर पडले होते, ती अस्वस्थता लोकांच्या अशा वागण्याने हळूहळू कमी होत होती. आमची संवेदनशीलता अजून बोथट झालेली नाही. मी याची देही, याची डोळा अनुभव घेत होते.
खरं तर खूप लांब पल्ल्याची भटकंती मी केली होती. मनाचं समाधान होण्याइतपत अनुभव घेतला होता. पण तरी मनाची अस्वस्थता प्रू्ण गेली नव्हती. त्यामुळे तिथून पुढे वरळी सी-फेसला जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी वरळी सी-फेसला खूप गर्दी होती. आता सध्या तिथे काय चालू असेल हे मला पाहणं आवश्यक वाटत होतं. वरळी सी-फेसला गेले तर दरवर्षी गर्दीने फुलून येणाऱ्या सी-फेसवर जेमतेम वीस-पंचवीस लोक होते. त्यांच्यामध्ये जास्त होती ती जोडपी, जी केवळ गर्दी नसल्यामुळे एकांत मिळेल या उद्देशाने तिथं आली होती. त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की त्यांनाही सेलिब्रेशनमध्ये काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता. आपल्या घरात इतकं वाईट घडून गेलंय आणि आपण काय आनंद साजरा करणार हीच प्रत्येकाची भावना होती. पण केवळ या दिवसाच्या निमित्ताने एकांत मिळतो. आणि तो वेळ एकमेकांच्या सहवासात घालवावा, या उद्देशाने ही जोडपी सी फेसला आली होती. त्यांची भावना समजून घेण्यासारखी होती.
या शोधयात्रेत मी जवळजवळ रात्रभर विविध एरियात फिरले. या अत्यंत माफक हेतूनं खरंच मला या ३१ डिसेंबरच्या रात्री काही वेगळं गवसल्याचा आनंद झाला. जर या ३१ डिसेंबरला मी अशी फिरले नसते तर आम्ही बोथट झालोय या निराशाजनक भावनेने माझी पाठ कधीच सोडली नसती, पण त्या एका रात्रीने मला खूपच काही मिळवून दिलं. तो आनंद मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी घरी आले, त्यावेळेस पटकन एक विचार मनात चमकून गेला. २७ नोव्हेंबरच्या रात्री लोकांच्या उदासीन वागण्यामुळे विवश, निराश झालेली मी आणि आज त्याच लोकांच्या संवेदनशील वागण्यामुळे आनंदित झालेली मी. खूप वेळा आपण ऐकीव बातम्यांवर, लेखांवर विश्वास ठेवतो आणि पटकन काही तरी निष्कर्ष काढून मोकळे होतो. याच निष्कर्षांतून काही विधानंही करून टाकतो. हल्ल्यानंतर झालेल्या ‘इव्हेन्टस्’मध्ये काही टक्के तरुणाईनं बेजबाबदारपणाचं दर्शन घडवलंही असेल, पण ते समजाचे, तरुणाईचे प्रतिनिधी नाहीत, एवढं निश्चित. माझ्या अस्वस्थ मनाची खात्री पटवून देण्यासाठीच मी सगळी पायपीट केली होती. या पायपीटीनं मला तरुणाईचं वेगळं रूप दिसलं. हे रूपही समाजासमोर यावं, बेजबाबदारपणे वागणाऱ्या तरुणाईनं यावरून काही बोध घ्यावा म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अनुभव लिहूनही काढले.
rane.geet@gmail.com