Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
जानेवारी २००९ उजाडला आणि तुम्ही सर्व आपल्या भवितव्याचा डोळसपणे विचार करायला लागलात. आनंद वाटला. अभिनंदन करू की धन्यवाद म्हणू? माझं म्हणणं तुमच्यापैकी अनेकांना पटलं म्हणून खरोखर धन्यवाद! तरीही एक सांगावंसं वाटतं; आपल्या यशाची गणितं मांडताना कद्रूपणा, कंजूषपणा मात्र नको, नाही तर पुन्हा आपलं अध्र्या हळकुंडानं पिवळं..!
ही दुनिया ग्लॅमरची आहे; प्रसिद्धीची आहे. त्यामुळे इथे यशाची पायरी चढायची असेल, डोक्यावर मुकुट हवा असेल तर आपल्याकडे दारिद्रय़ असलं किंवा गरजेपुरती ऐपत नसली तरी ते लपवण्याची खुबी असायलाच हवी. या मायाजालात दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.
सर्कशीतल्या लोकांचं आयुष्य कधी जवळून पाहिलं आहे तुम्ही? रिंगणात येऊन लोकांची करमणूक करतात हे कलावंत! रिंगणाच्या आजूबाजूला आपण प्रेक्षक ऐटीत बसून त्यांची कला बघत असतो; पण ते कलावंत त्या रिंगणाबाहेर गेले की क्षणात आपल्या शरीरावरचा तो झगमगाट उतरवतात आणि मग कापडी भिंतीमधलं, तंबूतलं आयुष्य सुरू! तंबूतच आंघोळ, तंबूतच जेवण, तंबूतच शय्या! राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ बॉक्स ऑफिसवर किती हिट झाला याची आकडेवारी नाही माझ्याकडे, पण ग्लॅमरच्या दुनियेतल्या एका कलावंताचं ते यथार्थ दर्शन होतं, असं निदान माझं तरी वैयक्तिक मत आहे.
चित्रकार व्हायचं असेल तर नुसत्या रेघोटय़ा ओढून रंग फासण्यात काहीच अर्थ नाही. त्या रेषांचा आणि रंगांचा अर्थ शिकून घ्यायलाच हवा. गायक व्हायचं असेल तर नुसत्याच सीडीज ऐकून नक्कल करण्यात काहीच अर्थ नाही. शास्त्रोक्त गायकी शिकायलाच हवी. नर्तक व्हायचं असेल तर नुसतेच फिल्मी डान्स बघून रोंबासोंबा

 

नाचानाच करण्यात काहीच अर्थ नाही; तंत्रशुद्ध नृत्य शिकायलाच हवं. हेच अभिनयाच्या बाबतीत, हेच फोटोग्राफीच्या बाबतीत. भारतीय परंपरा १४ विद्या ६४ कलांनी बहरलेली आहे. प्रत्येकाच्या बाबतीच हेच म्हणेन मी!
‘बॉर्न आर्टिस्ट’ ही संकल्पनाच मला चुकीची वाटते. उपजत कला असली तरी त्याला मार्गदर्शनाची गरज भासतेच किंवा असायलाच हवी. एखाद्याला उपजत ‘आकलनशक्ती’ असू शकते; पण म्हणजे तो मार्गदर्शनाशिवाय ‘उपजत कलाकार’ नव्हे.
आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं, प्रसिद्धीच्या झोतात राहायचं, असा डोळस विचार जर तुमच्यापैकी अनेकांनी करायला सुरुवात केली असेल तर आधी जे तुमच्याकडे नाही ते शिकून घ्या; आपल्यातले दुर्बल घटक लपवायला शिका. माझे गुरू मला नेहमी सांगायचे की, ‘अरे! दारिद्रय़ लपवायला शीक, आधी! स्वत:कडे असामान्य काल्पनिक दृष्टी असेल आणि कॅमेरा नसेल तरी तात्पुरता भाडय़ाने मिळव आणि आपली कला दाखव. कॅमेराच नाही म्हणून रडगाणं सुरू केलंस, तर तुझ्या कलाविष्काराला कोण दाद देणार?’ अनेक गुरूंकडून मी विद्या मिळवत राहिलो, द्रोणाचार्य मात्र अजून कोणी भेटले नाही.
बऱ्याच वेळा गायनाचे, नृत्याचे, अभिनयाचे धडे घेतलेली मंडळी किंवा अध्र्या हळकुंडाने पिवळे होऊन ‘स्टार’ झालेली मंडळी माझ्याकडून फोटोसेशन करून घ्यायला येतात, ती आपल्यातला कंजूषपणा दाखवतच! यात ‘एस्टॅब्लिश्ड’ मंडळीसुद्धा असतात. ‘माझ्याकडे पैसे कमी आहेत पण मला ५/१० फोटोच काढून हवे आहेत’, अशी सुरुवात असते या मंडळींची.
जवहिऱ्याकडे जाऊन ‘पैसे कमी आहेत, पण हिऱ्याची कुडीच हवी आहे’, असं कधी कोणी म्हणतं का हो? जवाहिऱ्याची आणि हिऱ्याची उपमा देतो आहे. कारण मी वारंवार एकच सांगतो, ‘ग्लॅमरची दुनिया म्हणजे मायाजाल’, यात फसणारा प्रत्येक जण स्वत:ला हिऱ्यासारखा चमकवायलाच आलेला असतो आणि मग जर चमकायचंच असेल तर आपलं दारिद्रय़ लपवायलाच हवं. पूर्ण तयारीनिशी यायला हवं. ही रंगभूषेची आणि वेशभूषेची दुनिया? इथला झगमगाट हा फक्त दिखाव्यापुरता असतो.
जसं मी माझ्या गुरूंच्या सल्ल्यानुसार माझ्या करिअरची सुरुवात ही दुसऱ्याच्या म्हणजे भाडय़ाच्या कॅमेऱ्याने केली तसंच गुणवत्ता आहे, पण ऐपत नसेल तर तात्पुरते दागिने, तात्पुरते ग्लॅमरस कपडे आणि तुमच्या सुंदर चेहऱ्यावर असणारं, ‘उसनं’ का होईना, पण ‘स्माईल’ आणायलाच हवं. तुमचा कलाविष्कार हा हजारो-लाखो रसिकांसाठी असतो. त्यासाठी तुमची पूर्वतयारी हवी. हे फक्त फोटोग्राफी किंवा अभिनयापुरतंच मर्यादित नाही. कोणत्याही क्षेत्रात ‘चमकायचं’ असेल तर आपलं हे आर्थिक/ वैचारिक/ बौद्धिक दारिद्रय़ लपवायलाच हवं.
आणि ते फार कठीण नाही. जिद्द असेल तर नुसत्याच भाडय़ाच्या वस्तू नव्हे; तर आत्मविश्वासही परत आणू शकता.
‘आभाळमाया’ ही मालिका आठवते का? त्यातली केतकी थत्ते ही तीन वर्षांपूर्वी ‘समुद्र’ आणि ‘वैऱ्याची रात्र’ या नाटकात खूप बिझी होती आणि अचानक तिच्यावर एक मोठा आघात झाला. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती त्या आजारपणातून बरी झाली, हे तिचे सुदैव! त्यानंतर केतकी मनाने खचली होती. एक वेळ आपण रंगमंचावर उभे राहू शकू, पण ‘इडियट बॉक्स’ आणि ‘सिनेमा’ ही क्लोजअपची दोन माध्यमं तर फारच अशक्य असं तिला वाटलं होतं.
पण पुन्हा एकदा इच्छाशक्ती! केतकी पूर्ण बरी झाल्यावर एका भल्या पहाटे मी तिच्या घरी आणि घराजवळच्या प्रांगणात फोटोसेशनला सुरुवात केली. मेकअप न करता बरेच दागिने आणि कपडे जमवून केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर केतकीने मला वेगवेगळे मूडस् टिपायला चान्स दिला. आपल्या आजारपणाच्या भीतीवर मात केली. आपल्या आजारपणातल्या काही गोष्टी केतकीने खुबीनं लपवल्या आणि नंतर ती ई टीव्हीच्या मंथन मालिकेत आणि केदार शिंदेच्या ‘गलगले निघाले’ची नायिका म्हणून चमकली.
ज्यांना चमकायची हौस नाही. स्टेटस, पोझिशन, चंगळवाद, यांच्या नादाला लागून खोटं जगायची इच्छाच नाही ते किती सुखी असतात नाही? त्यांना काही लपवावंच लागत नाही. त्यांना काही उसनं घ्यावंच लागत नाही. त्यांना ग्लॅमरचं वेड नसतं, त्यांच्या कर्तृत्वानेच त्यांना ते ग्लॅमर आपोआप मिळत असतं; त्यांच्याभोवती एक वलय निर्माण होत असतं. दारिद्रय़ाची तमा न बाळगणारे ते खरे गर्भश्रीमंत!
संजय पेठे
sanjaypethe@yahoo.com