Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९


दुसऱ्याला ‘नावे’ ठेवायला आपण कितीही उत्सुक असलो तरीही आपण स्वत:च्या नावाला कायम जपत असतो. जपणे स्वत:ला आवश्यक वाटत असते, परंतु दुसऱ्याच्या नावांबाबत आपण मात्र ‘नावात काय आहे?’ म्हणून बेफिकीर असतो. काही वेळा स्वत:च्या नावालाही आपण महत्त्व न देता काय फरक पडतो असे म्हणून दुर्लक्ष करतो. पण काही कागदपत्रे अशी असतात की त्यात चुकीचे नाव किंवा नावातचे चुकीचे स्पेलिंग चालत नाही. अशा वेळी आपला बेजबाबदारपणा दिसून येतोच पण त्याचबरोबर असंख्य अडचणी उभ्या राहतात.
बहुसंख्य स्त्रियांच्या बाबतीत लग्नानंतरच्या नावात होणारे बदल काळजीपूर्वक केले नाहीत तर मोठे घोटाळे होतात. लग्नात उत्साहाने नाव बदलले जाते पण माहेरच्याच

 

नावाने संबोधले जात असते. निवडणूक कार्डासाठी किंवा शिरगणतीसाठी घरातील मंडळी माहेरचे नाव, नवऱ्याचे नाव आणि आडनाव सांगतात. कालांतराने पासपोर्ट काढताना वास्तव्याचा दाखला देताना नावातील फरक जाणवतो आणि नाव बदलासाठी कोण आटापिटा करावा लागतो. रेशनकार्डावरही अशाच चुकीच्या नावाची नोंद सर्रास आढळत असते.
स्त्रीच्या नावाच्या बाबतीत घटस्फोट घेतल्यानंतरही असाच गोंधळ अनुभवास येतो. लग्नानंतर सगळीकडे नावे बदललेली असतात. माहेरच्या जुन्या नावाची कुठेच नामोनिशाणी शिल्लक ठेवलेली नसल्याने ज्यावेळी घटस्फोट होतो त्यावेळी पुन्हा माहेरच्या नावाची गरज भासते. या नावाच्या प्रश्नांनी प्रसंगी शारीरिक आणि मानसिक ताप होतो.
या सर्व पाश्र्वभूमीवर स्त्रियांनी लग्नानंतर त्वरित विवाहनोंदणी झाल्यावर नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी. माहेरच्या नावाचे किमान एक तरी बँक खाते सुरूच ठेवावे. सहा महिने सासर अनुभवल्यावर माहेरील रेशन कार्डावरील नाव कमी करून सासरच्या रेशन कार्डावर नवीन नावाने नोंदणी करावी. त्यासाठी अर्थातच विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Registration Certificate) उपयुक्त ठरते. रेशन कार्डावर नवीन नावाने नोंदणी झाली की टेलिफोन, मोबाईल बिलावर नोंदणी करण्यास हे रेशनकार्ड उपयुक्त ठरेल.
आयकराच्या पॅन क्रमांकासाठीही नवीन फोटो देऊन बदललेल्या नावासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देऊन अर्ज करावा. नवीन नावाने पॅन क्रमांकाचे कार्ड आले की तुमचा अर्धा त्रास संपतो. हे पॅनकार्ड व रेशन कार्ड वा तत्सम वास्तव्याचा दाखला (उदा. टेलिफोन बिल, इलेक्ट्रीसिटी बिल) देऊन नवीन नावाने बँक खाते उघडणे वा पासपोर्टसाठी अर्ज करणे वगैरे सुलभ होते. नोकरी करणाऱ्या वा व्यावसायिक क्षेत्रातील स्त्रियांनाही सरकारी गॅझेटीअरमध्ये बदललेले नाव व जुने नाव नवीन विद्यमान पत्त्यासह द्यावे लागते. त्याची प्रत त्यांना नोकरीच्या ठिकाणी द्यावी लागते. काही सरकारी व निमसरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी वर्तमानपत्रात नाव बदलाची जाहिरात देणे बंधनकारक आहे. तसेच या जाहिरातीत कोणत्या तारखेच्या किती क्रमांकाच्या सरकारी गॅझेटीअरमध्ये प्रसिद्ध झाले आहे त्याचा उल्लेख स्पष्ट करावा लागतो.
गुंतवणूक प्रमाणपत्र व आयुर्विमा पॉलिसीवर नामबदल करताना विवाहामुळे नामबदल असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत आणि जर घटस्फोटामुळे असेल तर कुटुंब न्यायालयाच्या निकालाची प्रत (डायव्होर्स डिक्री) नोटरीने प्रमाणित केलेली द्यावी लागते. केवळ नावात काय आहे म्हणून गप्प राहिल्यास भविष्यात किती अडचणी उभ्या राहू शकतात याचा अंदाज आला असेलच.
पासपोर्ट, निवडणूक मतदान पत्र, आयकराचे पॅनकार्ड, रेशन कार्ड, आयुर्विमा व इतर विम्याच्या पॉलिसी, बँक खाते आणि इतर गुंतवणुकीची प्रमाणपत्रे यावरील नामबदल करताना काळजीपूर्वक अर्ज भरावेत. तसेच स्थावर मालमत्तेबाबत गृहनिर्माण सहकारी सोसायटीतील शेअर्स प्रमाणपत्रावर किंवा सात-बारा उताऱ्यावर वेळीच योग्य ते नामबदल करून घेणे हिताचे ठरते.
विनायक कुळकर्णी