Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

किलो किलो मिरच्या फस्त करणाऱ्या चिमुरडय़ा
मोंद्रमाती या कोलकात्यापासून २०० कि. मी. अंतरावर वसलेल्या गावात राहणाऱ्या दोन छोटय़ा मुली. वय र्वष पाच आणि सात. त्यांच्यावर ‘मिरॅकल चिल्ड्रेन’ म्हणून शिक्का बसलाय. कारण या दोघींना मिरच्या खूप आवडतात आणि आवडतात म्हणजे किती? तर दर दिवसाला त्या तीन किलो हिरव्या मिरच्या खातात. वाचूनच तोंडाची जळजळ झाली. नाकाडोळ्यांतून पाणी यायला लागलं, कानातून गरम वाफा यायला लागल्या नं? पण या दोन चिमुरडय़ांना मात्र तसं काही होत नाही. त्यामुळे त्या भाजी खावी तशा किलो किलो मिरच्या फस्त करतात. पण या दोघींना मिरच्या आवडतात कशा, हे सांगताना त्यांचे वडील सांगतात- माझ्या मेव्हण्याची मिरच्यांची शेती आहे. तो खूप वेळा या चिमुरडय़ांना घेऊन शेतावर जात असे. तिथे यांनी मिरच्या खायला सुरुवात केली आणि सगळ्यांनाच कोडय़ात पाडलं.
लाइटसनं मढवलेली साडी
तुम्हाला तो अमिताभ बच्चनचा चित्रपट आठवतोय? त्यात त्यानं लाईटस लावलेले कपडे घालून दे धमाल नाच केला होता. त्याचे ते ‘लाईटीवाले’ कपडे लई गाजले होते. लाईटीवाले कपडे होऊ शकतात, तर मग साडीनं तरी काय पाप केलंय? साडी का लाईटसनं झगमगून निघू नये? एक्झ्ॉक्टली. तामिळनाडूतील एका विव्हरनं अशी साडी तयार केलीये. तिचं नाव ‘ओलियम सोलियम’ म्हणजे लाइट अ‍ॅण्ड साऊंड. या साडीत शंभरच्यावर छोटे छोटे दिवे जडवले आहेत आणि एक बॅटरीही फिट केली आहे. त्यामुळे हे दिवे लागतात आणि म्युझिकही सुरू होतं. गाडीच्या रिव्हर्स हॉर्नसारखं म्युझिक आहे हे. या साडीची किंमत आहे फक्त ४,५०० रुपये. बॅटरी- दिव्यानं मढवलेली साडी ड्रायवॉश करण्याचं बंधन असलं तरी इस्त्री मात्र नेहमीसारखीच करता येईल. आता, एकच साडी तयार झाली असली तरी कदाचित पुढच्या दिवाळीपर्यंत ओलियम सोलियम साडय़ा बाजारात आलेल्या असतील..
लक्ष ठेवा जरा.