Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
टेलिव्हिजनवरच्या मनोरंजनाची परिस्थिती बदलेल अशी मला आशाच वाटू लागली आहे. तसं गेल्या पाच-सात महिन्यांत बरंच काही बदललं आहे. शेअर मार्केट म्हणजे सतत वरच जाणार, नुसते पैसे घातले की दोन-तीन आठवडय़ात डबल होणार, निवडणुका आल्या की गोविंदे-गोपाळे केवळ ते स्टार आहेत म्हणून आपणच निवडून देणार, बॉम्बस्फोट होणार, पोलीस कमिशनरपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे जनतेला शांततेचं आवाहन करणार, विरोधी पक्ष सरकारने राजीनामा द्यावा अशी बोंबाबोंब करणार, ही कमी पडली तर आणखी करमणूक करून घ्यावी म्हणून टेलिव्हिजनचा रिमोट टोचला तर त्यावर कारस्थानी बायका, त्यांच्या साडय़ा, त्यांचे दागिने, त्यांचे ते बावळट नवरे, त्यांचे ते दोनशे कोटीचे चेक.. म्हणजे काय एकूणातच सगळं प्लॅस्टिकचं. हे सगळं असंच चालायचं.. असं काही काळापर्यंत वाटत होतं.. पण सगळं बदलेल की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते आहे असं वाटतंय. बघा.. बोलतानाही मी किती जपून बोलतोय. चांगल्यावर पटकन

 

विश्वास बसत नाही ना..
मार्केट गडगडलं.. लोकांना राजकारण्यांचा राग वगैरे आला, तसंच टेलिव्हिजनवरून ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी’ला घरघर लागलेली.. दोन्ही गायब झाल्या. गेल्या वर्षीचा हा सगळ्यात मोठा चमत्कारच होता. ‘क्योंकि’च्या जागी ‘आपकी कचेहरी’ नावाचा किरण बेदींचा कार्यक्रम आला. हा एक खरं तर विनोदच आहे. लंबकाने एकदम दुसऱ्या बाजूला झोका घ्यावा तसं वाटलं की नाही? पण मुद्दा असा की भारतात सामान्य लोक राहतात आणि त्यांचे काही सामान्य प्रॉब्लेम्स असू शकतात आणि त्यांना काही वेगळं पाहायला आवडू शकेल कदाचित असा विचार तरी चॅनेल्स करू लागली आहेत. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे २००८ मध्ये घडलेल्या टेलिव्हिजनच्या क्षेत्रातल्या उलथापालथी..
समीर नायर, शैलजा केजरीवाल यांनी स्टार सोडलं आणि एनडीटीव्ही इमॅजिन जॉईन केलं. पीटर मुखर्जीनी नाईन एक्स नावाचं चॅनेल अंबानींच्या गळ्यात गळा घालून काढलं.. आणि अश्विनी पै यार्दी झी टीव्ही सोडून वायकॉम कलर्सला प्रमुख म्हणून गेली. या तीन गोष्टींनी या बदलांचा शुभारंभ झाला. वर नावं घेतलेली माणसं आपल्याला कदाचित माहीत नसतील, कारण ती पडद्यामागची माणसं आहेत. पण मनोरंजनाच्या क्षेत्राचं भवितव्य ज्या काही मूठभर लोकांच्या हातात आहे त्यातली ही काही महत्त्वाची नावं आहेत.
नाईन एक्स २००७ च्या शेवटी सुरू झालं होतं. पण त्याने कधीच मान उंचावली नाही आणि आता तर ते बंदच होतंय.. एनडीटीव्ही इमॅजिनने सुरुवात वेगळीच केली. ज्याप्रकारे त्यांनी रामायण प्राईम टाईमला आणलं तो एक मोठय़ा स्ट्रॅटेजीचा भाग होता. कसं आहे, नवीन चॅनेल येत असताना तिथे कोण प्रोडय़ुसर प्रोग्रॅम करताहेत हे साधारण इंडस्ट्रीत माहीत होतं. साधारण त्यांचे स्लॉटही माहीत असतात. प्रतिस्पर्धी चॅनेल्सनाही या बातम्या कळत असतात. पण रामायण ही मालिका इतकी गुप्तपणे करण्यात आली की त्याचा पत्ता एनडीटीव्हीमध्ये काम करणाऱ्यांनाही नव्हता. मला चांगलं आठवतं आहे, त्या दरम्यान मी नाईन एक्समधल्या एका मीटिंगसाठी गोरेगांवहून वरळीला गेलो. जाता जाता एका बसस्टॉपवर रामायणचं होर्डिग पाहिलं. रामायण रात्री नऊ वाजता? नाही नाही, काहीतरी घोळ आहे, वेगात जाताना बघण्यात चूक झाली असं वाटून मी पुढे गेलो. नाईन एक्सच्या मीटिंगमध्ये अर्थातच हा विषय निघाला आणि माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार होईना.. येताना मी पुन्हा कुठे होर्डिग किंवा काही दिसते का पाहत होतो. पण नाही दिसले. आणि आश्चर्य.. दुसऱ्याच दिवशी मी परत त्याच भागात गेलो त्यावेळी प्रत्येक नाक्या नाक्यावर होर्डिग्ज लागली होती आणि रामायण नऊ वाजताच येत होते. म्हणजे रातोरात जवळपास तीन-चारशे होर्डिग्ज लागली होती. हल्ली होर्डिग्ज करणे सोपे झाले आहे. हाताने पेन्टिंग करायचे नसल्यामुळे फटाफट कामं होतात आणि होर्डिग्जवरची माणसं ओळखताही येतात. पूर्वी मला बाबू जगजीवनराम सोडले तर बाकी कोणी नेते ओळखूच यायचे नाहीत होर्डिगवर. त्याने काही आयुष्यात नुकसान नाही झाले म्हणा! पण रामायण प्राईम टाईमला आणणे हा क्रांतिकारी निर्णय होता. धार्मिक मालिका प्राईम टाईमला? नाही चालणार.. पण चालली. सुरुवातीच्या काळात लोकांनी पाहिली. रामानंद सागर यांच्या रामायणाएवढा गाजावाजा नाही झाला.. पण ते दिवसच वेगळे होते. एका दिवसात अख्खी मुंबई रामायणच्या पोस्टर्स, होर्डिग्जने भरून गेलेली सगळ्यांनी पाहिली. पुढे ते थंडावलं हा वेगळा भाग.
या सगळ्यांमध्ये ‘कलर्स’ ही वाहिनी आपलं वेगळेपण घेऊन पहिल्यापासूनच उभी राहिली. अश्विनी पै यार्दी ही मूळची मराठी असल्यामुळे की काय माहीत नाही पण वेगळ्याच पद्धतीने कलर्स वाटचाल करते आहे. खतरों के खिलाडी, बालिका वधू, बिग बॉस-२, उतरन, डान्सिंग क्वीन.. असे अनेक कार्यक्रम एका मागोमाग एक करून कलर्सने लोकांना आपल्याकडे खेचायला सुरुवात केली आहे. केवळ टीआरपीचा खेळ असता ना तर कदाचित आपण त्याची दखल घेतली नसती. पण हे नुसते यश नाहीये.. या मागचे विचार वेगळे आहेत. तिकडे सास्वा-सुना चालतात, मग आपणही चालवूया असं नाहीये.. निश्चितपणे वेगळा विचार आणि वेगळी आखणी याच्यामागे आहे. कसं आणि काय हा जरा मोठा विस्तृतपणे विचार करण्याचा विषय आहे.. तेव्हा ते पुढल्या वेळी.. पण आशादायक परिस्थिती निर्माण होते आहे हे नक्की.
अभय परांजपे
asparanjape1@gmail.com