Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

जर्मन भाषा, संस्कृती, परंपरा यांचा परिचय करुन देणारं हे पाक्षिक सदर.
नवीन वर्षांची सुरुवात म्हणजे नवीन संकल्प, नवीन स्वप्ने, नवीन सीमांचे उल्लंघन. नवीन भाषा हीसुद्धा एक प्रकारे दोन मानव समूहांमधली सीमाच नाही का? प्रस्तुत कॉलममधून असेच काहीसे परभाषेच्या प्रांतातले सीमोल्लंघन करणे हा आमचा संकल्प आहे. ही भाषा आहे जर्मन. मराठी भाषेचे आणि देवनागरी लिपीचे बोट घट्ट धरून आपण जर्मन भाषा आणि जर्मन जीवन याची ओळख करून घेणार आहोत.
आमच्या लहानपणी अवांतर वाचनासाठी परुळेकरसरांनी एखादे इंग्रजी पुस्तक दिले आणि आमच्यापैकी कोणी म्हटले की, ‘सर’, यातले इंग्रजी कळत नाही, की सर म्हणत- ‘बाबांनो, तिकडचे जीवन कळत नाही, असे म्हणा.’
किती खरं आहे ते! ‘सात-बाराची विरार लोकल’ या शब्दांना अभिप्रेत असलेली गती, निकड, ओढ एखाद्या जर्मन माणसाला नुसत्या शब्दांनी कशी कळणार? त्यासाठी मुंबईचे जीवन माहिती हवे.
म्हणून जर्मन भाषेची नुसती वाक्ये व शब्दार्थ असे सीमित रूप न ठेवता तेथील जीवनाचे संदर्भ परिचित करून घेत आपण ही भाषाओळख करून घेणार आहोत. तेव्हा जर्मन भाषेच्या सरावासाठी तुमच्या वेळापत्रकातले दोन गुरुवार आताच राखून ठेवा बरं!
या भाषावर्गाचे बरेचसे स्वरूप `Do it yourself' असे काहीसे असणार आहे. स्टीव्हन पिंकर म्हणतात त्याप्रमाणे भाषेचे आकलन ही मानवसमूहाची एक सहज प्रेरणा आहे- अगदी भूक- भय- तहान यासारखी. आपण सर्वजण हे सॉफ्टवेअर घेऊनच जन्माला आलो आहोत. तेव्हा जर्मन शिकताना हे सॉफ्टवेअर पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करायचे आहे आणि खूपसा कॉमन सेन्सही!
मग! करायची आपण सुरुवात?
स्सो! बेगीनन् वियर?
हे पहिले वाक्य उच्चारताना आणि बघताना तुमच्या लक्षात आलेच असेल की, काही थोडे थोडे ओळखीचे वाटते आणि काही अगदीच परके. पायरीपायरीने आपण उच्चार, व्याकरण, वाक्यरचना अशा गोष्टी समजावून घेणार आहोत आणि निरीक्षणाने प्रथम साम्यस्थळे, पॅटर्नस् याची नोंद घेणार आहोत.
आपल्या भाषाप्रवासातले पहिले स्टेशन आहे उच्चारशास्त्र! खालील वाक्ये म्हणून बघा आणि त्यातला एखाद-दुसरा पॅटर्न लक्षात येतो का पाहा बरं!

 

आज गुरुवार आहे.
हॉयटऽ इस्ट डोनरस्टाग
Heute ist Donnerstag.
आपण सर्व जर्मन भाषा शिकत आहोत
वीयर लेर्नन् डॉइट्श.
Wir lernen Deutsch.
आपण सर्व मुंबईत राहतो.
वीयर वोह्नन् इन् मुम्बाय.
Wir wohnen in Mumbai

Wir = आपण सर्व
wohnen = राहणे
lernen = शिकणे
हे पॅटर्न तुम्ही ओळखले असतील. त्याचबरोबर keu k चा उच्चार ‘ऑय’, ‘ai चा उच्चार ‘आय’ हेही तुमच्या ध्यानात आले असेल. हेच तंत्र वापरून शून्य ते बारा आकडे आपल्याला ओळखता येतात का पाहूया बरं! सुरुवात व शेवट आम्ही करून देतो.
‘मिस्टर फायद्या आहेत का?’ जर्मनीहून टेलिफोनवर विचारणा होत होती.
‘आँ? कोण?’ अशा नावाचे कोणी डोळ्यापुढे येईना.
‘मिस्टर यॉशींच्या अ 69 विभागातले मिस्टर फायद्या!’ आता कुठे माझी टय़ूबलाईट पेटली. अ 69 यॉशी म्हणजे जोशी असणार म्हणजे ‘फायद्या’ म्हणजे आपले वैद्य असणार.
परभाषा शिकताना चुकीच्या उच्चारांमुळे होणारे गोंधळ फार मजेशीर असतात. त्यामुळे स्वच्छ व चांगले उच्चार येणे हे सुसंवादासाठी महत्त्वाचे आहे.
सध्या भारताच्या प्रगतीचे सगळीकडे खूप कौतुक होत आहे. त्यात खरा तर हाही एक प्लस पॉइंट आपण लक्षात घ्यायला हवा. तो असा की, कुठल्या तरी आपल्या खानविलकर गुरुजींनी किंवा मांडे मॅडमनी आपल्याकडून जो गीतेचा बारावा अध्याय पाठ करून घेतला होता त्यातल्या संस्कृतच्या उच्चारांनी आपली जीभ अशी काही वळू शकते की, जर्मनच काय पण कुठल्याही भाषेच्या उच्चारांचे सगळे खडे दगड आपण मस्त चघळून हजम करू शकतो. उदाहरणार्थ,
जर्मन भाषेत ‘उमलाऊट’ नावाचा एक प्रकार आहे, A, O आणि U वर दोन ठिपके दिले(Ä, Ö, Ü) की लगेच ही तीन मंडळी एकमेकांना जीभ काढून चिडवल्यासारखी आपल्याला तोंडाची चोच करून बोलायला भाग पाडतात म्हणजे पाहा हं! Oean- ओत्सेआन म्हणजे महासागरात सापडणारे खनिज तेल म्हणजे Öl.
आता साधारणत: जिभेची पन्हळ करून ‘ओ’मध्ये किंचित ‘या’ मिसळून ‘ओयॅल’ असे म्हणून पाहा बरं!
आपली देवनागरी लिपी हीसुद्धा अफलातून स्वातंत्र्य देते त्यामुळे नीट कान देऊन जर्मन उच्चार ऐकले की ते असे मस्त आपल्या भाषेत लिहून घेता येतात. असो. पुढच्या वेळी आपण या उच्चारांबरोबर पुढचे अंक आणि जर्मनमधल्या संवादातल्या गमती ऐकणार आहोत. आऊफ वीडर झेहेन! Auf wiedersehen! पुन्हा भेटूया!
वैशाली करमरकर
मॅक्सम्युलर भवन