Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

भारतातर्फे ऑस्करला पाठविण्याची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘तारें जमीं पर’ची घोषणा झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच स्वतंत्र प्रवेशिका म्हणून ‘टिंग्या’ ऑस्करच्या स्पर्धेत पाठविण्याची घोषणा ‘टिंग्या’च्या निर्मात्यांनी केली. या दोन घटनांमुळे खळबळ नाही, पण काही गोष्टींची चर्चा व विचारांना चालना देणाऱ्या घडामोडींना नक्कीच वाव मिळाला. कोणताही अव्यावसायिक हेतू मनात न बाळगता केलेला चित्रपट म्हणून ‘तारें जमीं पर’ नक्कीच उल्लेखनीय आहे आणि त्याचबरोबर आपल्या मातीतला, आपल्या श्वासांचा चित्रपट म्हणून ‘टिंग्या’ही तेवढाच उल्लेखनीय आहे. मुळात या दोन चित्रपटांमध्ये अशा प्रकारची स्पर्धा व्हावी, अशी परिस्थिती नसतानाही अमीर खान आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्ये या बळावर ‘तारें जमीं पर’ची प्रवेशिका अधिकृत ठरवून निवड समितीने बॉलीवूडच्या गळ्यात तथाकथित दर्जेदारपणाची माळ घातली. या निमित्ताने काही गोष्टींचा ऊहापोह करावासा वाटल्यामुळेच हा लेखप्रपंच!
डिस्लेक्सिया झालेल्या मुलाची गोष्ट ‘तारें जमीं पर’ सांगतो. चित्रपट पाहून बाहेर पडणारे लोक भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडतात. चित्रपट सुंदर आहे यात वाद नाही, पण त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा आपण विचार करू लागतो. तेव्हा अनेक गोष्टी हळूहळू ध्यानात येऊ लागतात. संहितेच्या पातळीवर विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यावयास हवी की मनाशी संबंधित काही गोष्टींशी जडणघडण होण्यासाठी जी मानसिकता निर्माण व्हावी लागते आणि ती मानसिकता निर्माण होण्यासाठी जो एक विशिष्ट मूलभूत कालावधी लागतो, तो कालावधीच मुळात या चित्रपटात मिळत नाही. दुसरी गोष्ट, चित्रपट बव्हंशी जातो निकुंभसरांच्या दृष्टिकोनातून.. (चित्रपटीय भाषेत निकुंभसरांच्या ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ने..) पण इशानच्या पॉइंट ऑफ व्ह्य़ूने हा चित्रपट

 

जातच नाही. त्याचा पॉइंट ऑफ व्ह्य़ू केवळ दुसऱ्यांकडून त्याला होणाऱ्या त्रासात दिसतो. इशानची निसर्ग सजगता कॅमेरा दाखवतो तो दिग्दर्शकाच्या पॉइंट ऑफ व्ह्य़ूने, इशानच्या नव्हे.. त्यानंतरचा खेळ हा इशानची नेमकी मानसिक अवस्था कळल्यानंतर त्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा होतो, ज्यामध्ये पुन्हा (साधे-सोपे- सरळ का होईना) दिग्दर्शकीय कौशल्याद्वारे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न दिसतो. ‘तारें जमीं पर’च्या गोष्टीतच मुळात एवढी ताकद आहे की, सुमारे पावणेदोन तास चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. पण..
आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक दृष्टीने आणि स्तरावर चित्रभाषेतून बोलण्याचे प्रयत्न सुरू असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या तुलनेत त्रोटक असलेला ‘तारें जमीं पर’ ऑस्करसाठी कसा काय नामांकित होऊ शकतो? (गेल्या काही वर्षांत तर अमोल पालेकरांचा ‘पहेली’ आणि विधू विनोद चोप्रांचा ‘एकलव्य’ हे दोन चित्रपट ऑस्करवारीसाठी पाठवल्याच्या बातमीने सगळेच हबकले होते. ‘देवदास’ सुद्धा ऑस्करला पाठवण्यासाठी त्या वेळी संजय लीला भन्साळी प्रयत्न करीत होता म्हणे.. आता बोला!) पुन्हा एकदा स्पष्ट करतो. ‘तारें जमीं पर’च्या एकूणच दर्जाबद्दल कोणताही संदेह नाही, कोणताही वाद नाही. विषय (काहीसा) वेगळा (म्हणजे भारतीयांसाठी वेगळा), तरल सादरीकरण, अप्रतिम अभिनय सगळे काही मान्य.. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचे विषय नवीन नाहीत. अभिनव तर नाहीतच नाहीत. ‘तारें जमीं पर’सारखा चित्रपट आजवर झालेला नाही किंवा आजवर न मांडलेला विषय त्याने मांडला, असेही खचित नाही. या चित्रपटामुळे पालकांना आपल्या मुलांबाबत विचार करण्याची गरज भासली, हे मात्र या चित्रपटाचे नक्कीच सामाजिक यश आहे, पण एखादा चित्रपट ऑस्करसाठी पाठवताना आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीची स्पर्धा आहे, हे गंभीरपणे पाहण्याची व अभ्यासण्याची गरज आहे. अधिकच बारकाईने विचार करायचा झाला, तर ऑस्करच्या स्पर्धेतील मुख्य प्रवाहातील चित्रपटांपेक्षा परदेशी चित्रपट विभागातील चित्रपट हे आशय-विषयाच्या दृष्टीने अधिक सच्चे आणि सरस असतात, हे दिसून येईल.
आता ‘टिंग्या’कडे वळू.. ‘टिंग्या’देखील कोणत्याही व्यावसायिक क्लृप्त्या न वापरता साध्या-सोप्या-सरळ पद्धतीने अत्यंत प्रामाणिकपणे बनवलेला चित्रपट आहे. तांत्रिक बाबतीत त्याबद्दल चर्चेला जागा आहे, पण संहिताधिष्ठित चित्रपटाच्या अनुषंगाने आपण ऊहापोह करीत आहोत, त्यामुळे ‘टिंग्या’ सर्व परीने उजवा ठरतो. (पाह्यला गेले तर, माजिद माजिदींच्या चित्रपटांमध्येही तांत्रिक मुद्दे गौण ठरतात.) ‘तारें जमीं पर’ मध्ये हरवलेला इशानचा पॉइंट ऑफ व्ह्यू ‘टिंग्या’मध्ये ठळकपणाने दिसतो. केवळ टिंग्याच नव्हे, तर चितंग्या हा बैलदेखील चित्रपटातील एक ठळक व्यक्तिरेखा होऊन जाते. (जो अभाव ‘वळू’मध्ये जाणवतो. शीर्षकाधिष्ठित असूनही त्यातला वळू चित्रपटातील ‘व्यक्तिरेखा’ होत नाही.) ‘टिंग्या’ फार वास्तववादी चित्रपट आहे, असे मला वाटते. केवळ आपल्या मातीतला, आपल्या श्वासातला आहे, म्हणून नव्हे, तर माणूस आणि प्राणी यांच्यावर तेवढय़ाच सहृदयतेने प्रेम करणाऱ्या ‘टिंग्या’चे जग हे वैश्विक आहे. वस्तुत: हे केवळ ‘टिंग्या’चेच जग नाही, तर त्याच्या आई-बापाचे (पक्षी : एका उद्ध्वस्त शेतकरी जमातीचे), टिंग्याबरोबर त्याच्या एवढय़ाच निरागस सजगतेने चितंग्यावर प्रेम करणाऱ्या टिंग्याच्या बाल मैत्रिणीचे आणि चितंग्याच्या रूपकात्मकतेने या भीषण अवस्थेला पोहोचलेल्या समस्त प्राणीजातीचेही जग आहे, हे जग वैश्विक आहे, ही भावना वैश्विक आहे, ही समस्या वैश्विक आहे (जसा व्हिटोरिओ डिसिकाचा ‘बायसिकल थीव्हज्’ वैश्विक आहे). सगळे काही आपल्या मातीतले, श्वासातले असले तरीही ते वैश्विक आहे आणि म्हणूनच एका क्षणी टिंग्याला वाटसरूने पशुवैद्यकीय डॉक्टरच्या दवाखान्याजवळ आणून सोडल्यानंतर त्याला पुन्हा माघारी बोलावून आभाराप्रित्यर्थ आपल्या हातातले मोरपीस वाटसरूला देणारा टिंग्या आणि धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळवूनदेखील तिसऱ्या क्रमांकासाठी असलेले बूट आपल्याला मिळाले नाहीत, म्हणून नाराज होणारा माजिदींचा ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’ मधला बालनायक मला एकाच उंचीवरील वाटतात. चितंग्यावरच्या प्रेमापोटी डॉक्टरच्या खर्चासाठी साठवून ठेवलेले खाऊचे पैसे टिंग्याला देणारी त्याची बालमैत्रीण आणि भावाचे बूट हरवले म्हणून घरात आई-बाबांना न कळवता स्वत:हून आपले बूट भावाला घालू देणारी बहीण या दोघीसुद्धा मला एकाच उंचीवर जाणवतात. वैश्विकता ती ही..! वैश्विक विषयाला भाषा-स्थळ-काळाची गरज कधीच नसते. गरज असते ती केवळ प्रामाणिक अभिव्यक्तींची! ही वैश्विक अभिव्यक्ती ‘तारें जमीं पर’ पेक्षादेखील ‘टिंग्या’मध्ये अधिक ठळकपणे स्पष्ट होते आणि त्यामुळेच ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘टिंग्या’ अधिक योग्य ठरला असता, असे प्रामाणिकपणे वाटते.
यापूर्वीदेखील ऑस्करवारीसाठी चर्चिले गेलेला सत्यजित रेंचा ‘पथेरपांचाली’, मेहबूब खानचा ‘मदर इंडिया’ किंवा मीरा नायरचा ‘सलाम बॉम्बे’ हे चित्रपट कथाविषयाच्या दृष्टीने वैश्विकच होते. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात घडू शकणारे हे विषय होते आणि कुठेही घडले तरी त्यामागील सामाजिक व वैचारिक भान व सजगता हीदेखील कुठेही दिसू शकणारी होती आणि त्या वैश्विकतेबरोबरच प्रादेशिकतेचे सामाजिक व वैचारिक भानही त्यामागे होते, त्यापैकी ‘मदर इंडिया’ आणि ‘सलाम बॉम्बे’ हे ऑस्करच्या परदेशी चित्रपट विभागातील पहिल्या पाचांमध्ये दाखल झाले होते. ‘तारें जमीं पर’मधली पालकांची मानसिकता प्रामुख्याने आपल्याच देशात त्यातही करून काही विशिष्ट आर्थिक व सामाजिक वर्गात जाणवणारी आहे, तर पुन्हा ‘टिंग्या’ची मानसिकता ही सार्वत्रिक आहे, कोणालाही सहज समजू शकेल, अशी आहे.
आता या सर्वापलीकडे गेली अनेक वर्षे पडलेला एक प्रश्न.. बॉलिवूड, मराठी, बंगाली यापलीकडेही देशभरात काही दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. सलग नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे जानू बारुआ (ज्यांनी अलीकडे ‘मैने गांधी को नहीं मारा’ केला होता), गिरीश कासारवल्ली, अदूर गोपालकृष्णन यासारखे दिग्दर्शक आहेत. यांचे अनेक चित्रपट सर्वार्थाने वेगळे असूनही ऑस्करच्या प्रवेशिकेसाठी यांचा विचार का केला जात नाही? की ही मंडळी आपले चित्रपटच निवड समितीकडे पाठवीत नाहीत. काही वर्षांपूर्वी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाची निवड समिती स्वत:हून ऑस्करसाठीच्या चित्रपटाची निवड करीत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही पद्धत बदलून ज्यांना आपले चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची इच्छा आहे, त्यांनी स्वत:हून आपल्या चित्रपटाची प्रवेशिका निवड समितीकडे पाठवण्याची पद्धत अस्तित्वात आली आहे. त्यामुळेच कदाचित ‘एकलव्य’ किंवा ‘पहेली’सारखे चित्रपट ऑस्करला पाठवण्याची अपेक्षा निर्माण होत असावी. गिरीश कासारवल्लींचा ‘हसीना’ नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी पाहण्यात आला होता. ऑस्करसाठी म्हणून नव्हे, पण आपल्या बॉलिवूडपेक्षा कितीतरी चांगले चित्रपट अन्य भाषांमध्येही निर्माण होतात, हे कळण्यासाठी हा जाताजाताचा उल्लेख!
असो! या निमित्ताने काही मूलभूत गोष्टींची चर्चा करावीशी वाटली. या गोष्टी अभिरुची आणि वैचारिक संवर्धनाशी निगडित आहेत. अखेर ‘तारें जमीं पर’ काय किंवा ‘टिंग्या’ काय, भारताची प्रवेशिका म्हणून ऑस्करवारीवर जाणार. दोघांपैकी कोणालाही ऑस्कर मिळाले (मिळावे ही इच्छा तर आहेच), तरी भारताचेच नाव झळकणार. पण मूलभूत प्रश्न तर अनुत्तरितच राहतात ना? ते कधी सुटणार?
श्रीनिवास नार्वेकर
shri.narwekar@gmail.com