Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

नाईट डय़ूटी हा सध्याच्या अनेक प्रकारच्या जॉब्जचा अविभाज्य भाग आहे.रात्री घरी जाताना मुलींना नेहमीच असुरक्षित वाटतं. पण करिअर करायचं असल्यामुळे बहुतेकजणी आणि त्यांचे पालक ही जोखीम पत्करतात. त्यात काही वाईट प्रसंगांची भर पडते आणि तो एक चर्चेचा विषय ठरतो. तरुणांना काय वाटतं या प्रश्नाबद्दल..?

वल्लरी (जपान भाषा शिक्षिका)
नर्स, ट्रॅव्हल, एअरपोर्टमध्ये मुलींना अपिरहार्यपणे नाईट डय़ूटी करावीच लागते. आजच्या काळात नाही म्हणता येत नाही. पण सुरक्षा व्यवस्था हवी. सहा महिन्यांनी इन्स्पेक्शन या सुरक्षा व्यवस्थांचं, मुलींना घरी सोडायला जाणाऱ्या ड्रायव्हरचं इन्स्पेक्शन होण्याची गरज आहे. मुलींच्या सुरक्षिततेसंबंधी त्या त्या कंपन्यांमध्ये काही पॉलिसी असावी. त्यात निर्णय घेणाऱ्या महिला असाव्यात.

माधवी (नोकरी)
गरज असेल तरच मुलींनी नाईट डय़ूटी करावी. आपण कसे कपडे घालतो याकडे नीट लक्ष असावं. मुलींना घरी सोडण्यासाठी ड्रायव्हर असतात. या ड्रायव्हरसाठी काही निवड प्रक्रिया असावी. त्याचबरोबर मुलींनी त्यांच्याबरोबर जास्त पर्सनल असू नये. आपल्या कामावर लक्ष असावे. कोणाजवळ काय बोलावे याचे भान राखणे जरुरीचे आहे. याशिवाय कंपनीने ड्रयव्हर निवडताना त्याची कसून चौकशी करावी. माणूस स्वस्तात काम करतो हा निकष नको.

ऋषी (नोकरी)
मुलींनी नाईट डय़ुटी करू नये शक्यतो. पण जर करायचीच असेल तर कंपनीने तिला घरापर्यंत सोडावे. मुलीची इच्छा असेल तर तेवढी रिस्क घ्यायची तिची तयारी हवी. कारण कोणावर किती विश्वास ठेवावा यात मर्यादा आहेत.

मंदार (नोकरी) - मुलींनी नाईट डय़ूटी करण्यास काहीच हरकत नाही. अनेकदा काही वाईट प्रसंग घडतात, पण त्यावर उपाय शोधला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. त्यांना सुरक्षितपणे घरी सोडणं ही कंपनीची जबाबदारी आहे. एखादी मुलगी घरी पोहोचली की त्याची पावती तत्परतेने ऑफीसला पोहोचेल याची दक्षता ड्रायव्हरने घ्यावी आणि यावर कंपनीचं लक्ष असावं. त्याचबरोबर अनेकदा मुली कपडय़ांच्या बाबतीत काळजी घेत नाहीत, याबद्दल त्यांनी विशेष जागरुक असणं त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे. आपल्या सहकाऱ्यांबरोबर एक अंतर ठेवणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण मोबाईलवर बोलत असताना आपल्याला भान राहत नाही व आपली माहिती ड्रायव्हर ऐकून त्याचा गैरफायदा घेऊ शकतो हे मुलींनी लक्षात ठेवलं पाहिजे.