Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

अविस्मरणीय घटनांचा काळ
भाग्यात रवी , मंगळ , दशमात गुरू , राहू , पंचमात शनी , लाभात शुक्र. अशा ग्रहांचे अनेक दशकांनंतर सहकार्य मिळत असल्याने सप्ताहातील काही घटना अविस्मरणीय ठरू शकतील. त्यात शुक्रवारच्या रवि- हर्षल शुभयोगाच्या आसपासच्या घटनांचा समावेश शक्य आहे. व्यापारपेठ , राजकीय शक्ती , अर्थप्राप्ती , हवेशीर जागेची खरेदी , ठरणारी मंगलकार्ये , कला-साहित्यात होणारे करार यांचा समावेश राहील. दूरदृष्टीने संधीचा उपयोग केला तर बडय़ा असामींच्या वर्तुळातही आपला प्रवास होऊ शकेल. रागरंग पाहून सरळ संधीचा लाभ उठवा , परदेशी संपर्कातून मोठा उद्योगही सुरू करता येऊ शकेल.
दिनांक : ५ ते ९ शुभ काळ.
महिलाना : अपेक्षा सफलतेचा आनंद मिळेल.

यश मिळवता येईल
रवी, शनी, मंगळ विरोधात आणि शुक्र, गुरू, राहू यांचं सहकार्य अशा काळात कल्पकता व प्रयत्नांनी संधी साधणारे तंत्रच यश निश्चित करू शकेल. शब्द-सुरातील गोडवा यश व्यापक करू शकते. शनिवारी होणाऱ्या चंद्राचा शुक्र-हर्षलाचा नवपंचमयोग याचीच प्रचीती देणारा आहे. व्यवहाराची रूपरेखा अशाच स्वरूपाची ठरवावी. त्यात वादळी प्रश्नांचा समावेश करू नका. धंद्यातून पैसा मिळेल. सत्तेतून प्रभाव वाढेल. परिचयातून नवीन क्षेत्रात प्रवेश करता येईल. प्रपंचातील स्थगित प्रकरणे मार्गी लावता येतील. भागीदार, सहकारी, गिऱ्हाईक यांना नाराज करू नका. प्रवास होतील.
दिनांक : ७ ते १० शुभ काळ.
महिलांना : झगडून यश मिळवावे लागेल.

कर्तृत्वाने चमकाल
पराक्रमी शनी, सप्तमात सूर्य, मंगळ आणि भाग्यात शुक्र. मिथुन व्यक्तींना प्रतिष्ठा मजबूत करणारे यश मिळवता येईलच; शिवाय शुक्रवारच्या रवि-हर्षल शुभयोगाच्या आसपास चकित करणाऱ्या कृतीमधून कर्तृत्वाच्या नवीन बाजू प्रकाशात येतील. त्यात विज्ञानशोध, क्रीडामैदान, कलाविष्कार, साहित्यविषय यांचा समावेश होऊ शकेल. मंगलकार्य पक्के करता येईल. शिक्षणातील समस्या सोडवता येतील. परंतु गुरू, राहू अष्टमात असल्याने संशय व प्रलोभने यांपासून दूर राहा. स्पर्धा टाळा. परमेश्वरी चिंतनात एकाग्रता ठेवा. याचाच उपयोग होईल.
दिनांक : ५, ६, ९, १० शुभ काळ.
महिलांना : प्रपंच खूश राहील. समाजात चमकाल.

मोठे साहस नको
गुरू, राहूच्या सहकार्यामुळे नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील. षष्ठातील रवी, मंगळ शत्रूंचाही बंदोबस्त करू शकतील. तरीही शक्तीपेक्षा साहस मोठे नसावे, याची सतत काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्य, आश्वासने, आप्त यांच्या संबंधात चुका करू नका. भेटी, चर्चा, संपर्क यांतून नवे प्रस्ताव समोर येतील. शुभकार्ये ठरतील. व्यापाराचे नवे स्वरूप तयार करता येईल. अभिनव उपक्रमांनी समाजकार्यात प्रभाव वाढेल.
दिनांक : ४ ते ८ शुभ काळ.
महिलांना : सामोपचाराने समस्या सोडवता येतील.

समन्वयातून यश
रवी, मंगळाचे सहकार्य, शुक्राची प्रसन्नता आणि रवि-हर्षलाचा शुभयोग, शिकस्तीचे प्रयत्न यांच्या समन्वयातून ही ग्रहस्थिती यश देणारी ठरते. त्यात शुभ चंद्रभ्रमणाचाही उपयोग होणार आहे. श्रीमारुतीची प्रार्थना स्फूर्ती देणारी आहे. यश निश्चित करणाऱ्या या सर्व मार्गाचा उपयोग केला तर गुरू, राहूच्या अनिष्टतेची धारही आपोआपच कमी होईल. प्रवास होतील. परिचित मदत करतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती येतील. ऐनवेळी पैसा उभा राहील. दडपण, वादातून प्रकृती आणि संधी अडचणीत येऊ नये याची फक्त काळजी घ्या.
दिनांक : ६ ते १० शुभ काळ.
महिलांना : रागरंग पाहून कृती करा.

मार्ग सापडतील
साडेसातीच्या कटकटी चतुर्थातील रवि, मंगळामुळे खूपच वाढलेल्या असतील. संसारात अशांती आणि व्यवहारात असंतोष हे त्यांचेच परिणाम आहेत. परंतु गुरू, राहूच्या आधाराने मार्ग शोधत राहिलात तर शनिवारी शुक्र-हर्षलाशी होणाऱ्या चंद्राच्या नवपंचम योगापर्यंत दुष्परिणाम नियंत्रित करण्यात यश मिळवता येईल. चुका नको. गुप्तता हवी. संयम आवश्यक राहील. हीच त्याची पथ्ये असतील. प्रतिष्ठेचा बुरुज त्यामुळे सांभाळता येईल. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल. मंगलकार्य ठरणे शक्य आहे.
दिनांक : ७ ते १० शुभ काळ.
महिलांना : रागरंग पाहून सरळ संधीचा लाभ उठवा, यश मिळेल.

प्रकरणे मार्गी लागतील
पराक्रमी सूर्य, मंगळ, लाभात शनी.. याच ग्रहांचे परिणाम साथ देतील. झटपट निर्णय घेऊन कृती केली तर शुक्रवारच्या रवि-हर्षल शुभयोगाच्या आसपास प्रतिष्ठेची प्रकरणे मार्गी लावता येतील आणि भविष्यातील संभाव्य वादळांचाही बंदोबस्त करता येईल. चतुर्थातील गुरू, राहूची अनिष्टता कमी करण्यास याच मार्गाचा उपयोग होणार आहे. प्रवास, भेटी, लिखापढी, संपर्क यांचा फायदा शनिवारी होणाऱ्या चंद्राच्या शुक्र-हर्षल नवपंचम योगाच्या आसपास स्पष्ट होईल. आश्वासन कटाक्षाने टाळा.
दिनांक : ५, ६, ९, १० शुभ काळ.
महिलांना : प्रत्येक दिवस महत्त्वाचे यश देणारा आहे.

यशाने झगमगत राहाल
गुरू, शनीची अनुकूलता, रवि-मंगळाचे सहकार्य, वर बुध, शुक्र खूश आहेत. वृश्चिक व्यक्ती कार्यवर्तुळात नेत्रदीपक यशानं झगमगत राहाव्यात अशीच ही ग्रहस्थिती आहे. ‘अवघड’, ‘अशक्य’ हे शब्द सध्या तरी समोर उभे राहणार नाहीत. यातूनच प्राप्ती आणि प्रतिष्ठेचं संरक्षण मजबूत करून त्यात व्यापकता आणता येईल आणि शुक्रवारच्या रवि-हर्षल शुभयोगाच्या आसपास नवी झेप घेता येईल. प्रवास होतील. मंगलकार्ये ठरतील. व्यापार पैसा देईल. उपक्रम प्रसिद्धी देतील. प्रकृतीचा संशय येताच उपचार मात्र त्वरित सुरू करा.
दिनांक : ४, ७, ८ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नांनी प्रभाव प्रस्थापित करता येईल.

स्मरणात राहणाऱ्या घटना
राशिस्थानी सूर्य-मंगळ, भाग्यात शनी, पराक्रमी शुक्र. या ग्रहस्थितीत प्रयत्न व यशाचा समन्वय साधला जातो. त्यातून आकर्षक उपक्रम उभे राहतात. बडी मंडळी संपर्कात येतात. शुक्रवारच्या रवि-हर्षल शुभयोगाच्या आसपास काही घटना दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या ठरतील. कला, साहित्य, व्यापार, शिक्षण यांमध्ये धनू व्यक्ती आघाडीवर येतील. सत्ताशक्ती प्रबल करता येतील. बढती-बदलीचे योग यावेत. गुरू-राहू सहयोगात धर्मकार्ये आनंद देतात. कुटुंबीय मंडळी अचानक एकत्र येतील.
दिनांक : ५, ६, ९, १० शुभकाळ.
महिलांना : प्रपंच प्रसन्न राहील. प्रकृती सुधारेल. प्रवास कराल.

थोडे थांबा, पुढे चला
गुरू-राहूचे सहकार्य आणि बुध-शुक्रामधून होत राहणारा शक्ती-उत्साहाचा पुरवठा. अनिष्ट शनी-मंगळाच्या परिणामांवर विजय मिळवत मकर व्यक्तींना पुढे घेऊन जाणारी ही ग्रहशक्ती आहे. महत्त्वाची प्रकरणे, चर्चा, कार्यक्रमाचं स्वरूप ठरवणं यासाठी अल्प काळ थांबलात तर विजय निश्चित करता येईल. आर्थिक प्रश्न सुटतील. अपेक्षित माणसं मिळतील. शुक्रवारच्या रवि-हर्षल शुभयोगाच्या आसपास शुभ घटनांची प्रसादचिन्हे स्पष्ट होतील. प्रवास, स्पर्धा टाळा. भलत्याच लोकांच्या नादी लागू नका.
दिनांक : ४, ७, ८ शुभ काळ.
महिलांना : अचूक अंदाज येईतो कृती करू नका.

यशाची प्रतीक्षा टळेल
प्रयत्नांचा वेग आणि व्यावहारिक संधी यांचा समन्वय शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत साधणे आवश्यक आहे. वाद, विलंब, साहस यांतून अंदाज चुकतील व संधी हुकतील. नंतर अपेक्षित यशासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. राशिस्थानीचा शुक्र निराश होऊ देणार नाही. पण व्ययस्थानी गुरू, राहू असतो बेसावध राहता येत नाही. आर्थिक देवघेव, शासकीय प्रकरणे, नवीन उद्योगकेंद्र यांचा त्यात समावेश राहील.
दिनांक : ५, ६, ९, १० शुभ काळ.
महिलाना : सफलतेसाठी प्रयत्न आवश्यक.

चिंता दूर होतील
लाभात गुरू, राहू, दशमात रवि-मंगळ. नवनव्या क्षेत्रांत मीन व्यक्ती प्रभाव निर्माण करतील. शुक्रवारच्या रवि-हर्षल शुभयोगाच्या आसपास प्रयत्न-कृतीच्या समन्वयातून कर्तृत्व उजळून काढणारी सफलता मिळेल. त्यात व्यापारपेठ, राजकारण, साहित्य, शिक्षण, क्रीडा प्रांत, विज्ञानशोध यांचा समावेश होऊ शकेल. षष्ठातील शनीमुळे आरोग्य आणि शत्रूंनी सफल संधींना रोखू नये यासाठी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. शनिवारच्या चंद्र-शुक्र नवपंचम योगामुळे चिंता दूर होतील. यश निश्चित होईल.
दिनांक : ४ ते ७ शुभ काळ.
महिलांना : शुभकार्ये ठरतील. प्रवास होतील.