Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९
व्यापार-उद्योग

(सविस्तर वृत्त)

पुंज लॉइडला विमानतळ उभारणीचे २६४ कोटींचे कंत्राट
 
व्यापार प्रतिनिधी : पुंज लॉइडने पकयंग येथील सिक्कीमचे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्प उभारणीचे कंत्राट मिळविले आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प २६४ कोटी असून २४ महिन्यांत पूर्ण केला जाईल. प्रकल्पामध्ये १.७ किमी लांबीचा व ३० मीटर रुंदीच्या धावपट्टीबरोबरच टॅक्सी मार्ग, ड्रेनेज प्रणाली व इलेक्ट्रिकल कामांचा समावेश आहे. या विमानतळामुळे सिक्कीमच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
याविषयी माहिती देताना पुंज लॉईडचे अध्यक्ष अतुल पुंज म्हणाले की, ‘सिक्कीमचा पहिला ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्प उभारताना पुंज लॉईडला विशेष आनंद होत आहे. पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी विमानतळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून या विमानतळामुळे पर्यटनाच्या अनेक संधी असलेल्या सिक्कीमसारख्या राज्याला निश्चितच मदत मिळेल.
सिक्कीमसारख्या डोंगराळ भागात विमानतळ उभारणे आव्हानात्मक आहे. समुद्रसपाटीपासून १४०४ मीटर उंचीवर उभारण्यात येत असलेले हे विमानतळ १०० मीटर खोल व ८० मीटर उंचीवर उभारण्यात येईल.

जर्मन ऑफिस फर्निचर सिस्टिम
‘विल्खान’चा भारतात प्रवेश

व्यापार प्रतिनिधी: पर्यावरणानुकुल ऑफिस कान्फरन्सिंग आणि सिटिंग सिस्टिम देणाऱ्या विल्खन या जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या प्रसिद्ध कंपनीने आता भारतात प्रवेश केला आहे. विल्खानने भारतात आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी वर्क प्लेस इंटिरिअर्स प्रा. लि.ची एकमेव वितरक म्हणून नियुक्त केली आहे. विल्खानने हरित संकल्पना घेऊन बेझोलो कॉम्प्लेक्समध्ये खास शोरूम सुरू केली आहे. २००९-१० साली दिल्ली आणि बंगलोर येथे आणखी दोन शोरूम सुरू करण्याचा विल्खानचा विचार आहे.
शंभर वर्षांपूर्वीची जर्मन कंपनी म्हणून ओळखली जाणारी विल्खान ही आंतरराष्ट्रीय फर्निचर उद्योगातील एका प्रतिष्ठेची कंपनी म्हणून ओळखली जाते. स्वरूप, कार्यपद्धती आणि सौंदर्य या त्रिसूत्रीवर उच्च दर्जाचे डिझाईन आणि नावीन्यपूर्ण उत्पादन देणे हे कंपनीचे खास वैशिष्टय़ आहे. जागतिक पातळीवरील कामकाज वातावरणात कॉन्फरन्सिंग, शेअरिंग आणि इंटरॅक्शन विल्खानचे अस्तित्व जगभरात असून या देशात कंपनीचा टअफदवएए ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे. अनेक आकर्षक डिझाईन कंपनीच्या नावावर आहेत. पर्यावरण व्यवस्थापन यंत्रणेबद्दल कंपनीला आयएसओ १४००१ हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. कंपनीचे जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि स्पेनमध्ये उत्पादन प्रकल्प आहे. कंपनीने आपल्या उत्पादनाच्या बहुतेक सर्व गटामध्ये आंतरराष्ट्रीय पारितोषिके पटकावली आहेत.

डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राला
सवरेत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा पुरस्कार

व्यापार प्रतिनिधी : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या डहाणूस्थित औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राला भारतीय उद्योग महासंघातर्फे दिला जाणारा यंदाचा सवरेत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा पुरस्कार देण्यात आला असून सन २००५ व २००६ नंतर २००८ असा एकंदरीत तिसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावण्याचा पराक्रम या केंद्राने केला आहे.
या पुरस्काराबरोबरच केंद्राला सवरेत्कृष्ट आस्थापनेबरोबरच जलव्यवस्थापनासंदर्भातील सवरेत्कृष्ट सामाजिक बांधीलकी जपणारे केंद्र तसेच आदर्श जलव्यवस्थापनाची सवरेत्कृष्ट केस स्टडी हे पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले.
जलव्यवस्थापनातील सवरेत्कृष्ट कार्यपद्धती भारतीय उद्योग क्षेत्रात राबविली जावी, उद्योग क्षेत्रात यासंबंधीच्या माहितीची, तंत्रज्ञानाची परस्परांत देवाणघेवाण व्हावी व एकंदरीत उद्योग क्षेत्राची नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराबाबतची कार्यक्षमता वाढीस लागावी या हेतूने महासंघाद्वारे सदरचा पुरस्कार प्रतिवर्षी प्रदान करण्यात येतो. मूलभूत माहितीच्या आधारे कडक निकषांवर निवडलेल्या औद्योगिक आस्थापनांना त्यांनी जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्यावर सादरीकरण करावे लागते व त्यावर प्रश्नोत्तरेही केली जातात व सर्व बाबतीत सवरेत्कृष्ट ठरलेल्या आस्थापनेलाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जलव्यवस्थापनाच्या या सवरेत्कृष्ट पुरस्कारासाठी नियत जलवापर, जलसंवर्धन प्रकल्प, जलनि:सारण कार्यपद्धती, पर्जन्यजल पुनर्धारण इ. निकषांमध्ये आस्थापनांच्या कार्याचे महासंघातर्फे सखोल परीक्षण केले जाते व त्यानुसार या पुरस्काराची निवड होते.
यंदाच्या पुरस्कारासाठी मोटरवाहन, औषधे, अभियांत्रिकी, कापड उद्योग, ऊर्जानिर्मती प्रकल्प इ. क्षेत्रांतील सुमारे ६५ आस्थापनांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. पैकी ५४ आस्थापनांनी अंतर्गत जलव्यवस्थापन तर उर्वरित ११ आस्थापनांनी सामाजिक बांधीलकीच्या गटात उमेदवारी दाखल केली होती. यामधून एकंदर २८ आस्थापनांची अंतिम सादरीकरणासाठी निवड होऊन त्यातून भारतीय उद्योग महासंघाच्या सवरेत्कृष्ट जलव्यवस्थापन पुरस्कार- २००८ साठी एस. एल. गणपती यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त असलेल्या सहासदस्यीय परीक्षण मंडळाने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राची या पुरस्कारासाठी निवड केली.
डहाणू भागात गेल्या दशकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या ऊर्जानिर्मिती केंद्राने नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर, त्यांचे संवर्धन इत्यादी क्षेत्रांत भरीव कार्यक्रम राबविले असून त्यासाठी अंतर्गत कार्यगट सक्रिय ठेवला आहे. या गटाद्वारे केंद्राच्या विविधि कार्यप्रणाली, देखभाल दुरुस्ती इ. बाबींकरिता होणारा पाण्याचा वापर, त्यातील गैरवापरावरील नियंत्रण यांचा जललेखापरीक्षण, सिक्स सिग्मासारखी अत्याधुनिक परीक्षण यंत्रणा इत्यादींच्या सहाय्याने अभ्यास करण्यात येऊन त्यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यात येते.
डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राला आतापर्यंत उत्कृष्ट पर्यावरण व्यवस्थापन, उत्कृष्ट चलनीय व कार्यक्षमता आस्थापन, सुरक्षितता व व्यावसायिक आरोग्य इ. क्षेत्रांत सुमारे ४० राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार प्राप्त असून या केंद्राचा अमेरिकेच्या सन २००४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्लॉटस् पॉवरमॅगझिन या नियतकालिकात जगातील सवरेत्कष्ट १२ ऊर्जानिर्मिती केंद्रांच्या यादीत समावेश होता.

श्री राम सहकारी बँक कॉसमॉस बँकेत विलीन
व्यापार प्रतिनिधी: दि कॉसमॉस सहकारी बँकेने निपाणी मधील श्री राम सहकारी बँकेचे आपल्यात विलिनीकरण करून घेतले आहे. कॉसमॉस बँकेने आत्तापर्यंत एकूण १२ बँका व त्यांच्या ४० लाखांचे विलिनीकरण करून घेतले आहे.
निपाणी येथील श्री राम सहकारी बँकेच्या निपाणी, मांजरी व चिकोडी अशा एकूण तीन शाखा आहेत. सदर बँकेच्या ठेवी रु. १४ कोटी व कर्जवाटप रु. ११ कोटी असून एकूण उलाढाल रु. २५ कोटींची आहे. कॉसमॉस बँकेतर्फे श्री राम सहकारी बँकेच्या सर्व खातेदारांना सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कॉसमॉस बँकेची एकूण आíथक उलाढाल रु. ९६०० कोटींच्या जवळपास गेली आहे. या विलिनीकरणामुले कॉसमॉस बँकेच्या पाच राज्यांत एकूण ९७ शाखा व विस्तारित कक्ष कार्यरत झाले आहेत.

जे. पी. मॉर्गनमध्ये महत्त्वाच्या नेमणुका
व्यापार प्रतिनिधी: जेपी मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आज त्यांच्या वरिष्ठ मॅनेजमेंट टीममध्ये बदल जाहीर केले. या आधी सीईओ व पूर्ण वेळ संचालक असलेले कृष्णमूर्ती विजयन यांना एक्झिक्युटिव्ह चेअरमन (कार्यकारी अध्यक्ष) म्हणून बढती मिळाली आहे. तर ख्रिस्तोफर स्पेलमॅन हे भारतातील अ‍ॅसेट मॅनेजमेंट बिझनेसचे प्रमुख असतील. जेपी मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंटने भारतात व्यवसाय सुरू केला तेव्हापासून क्रिश विजयन हे या कंपनीत काम करीत आहेत.

व्यापार संक्षिप्त
इंडियन बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नायर
व्यापार प्रतिनिधी: युनियन बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. नायर यांची भारतीय बँकिंग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था- ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. मावळत्या उपाध्यक्षा सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा ए. ए. दारूवाला यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. दारूवाला या सेंट्रल बँकेच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत.
‘फास्ट्रॅक’चे नवे आर्मी कलेक्शन
व्यापार प्रतिनिधी: भारतीय युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या आर्मी कलेक्शन आता फास्ट्रॅक बॅ्रण्डच्या घडय़ाळे आणि सनग्लासेसमध्ये दिसून येईल. सैन्यदलात वापरात येणारे साहित्य, युद्धसामग्री आणि पेहरावांचा वापर या घडय़ाळे व सनग्लासेसच्या डिझाइनिंगचा प्रेरणास्रोत आहे. म्हणजे ग्रेनेड, टँक्स आणि अगदी स्नीफर डॉग्जपासून प्रेरणा अनोख्या आकारातील केसेस कलेक्शनमधील विविध २० प्रकारच्या घडय़ाळांमध्ये वापरात आल्या आहेत. त्याचप्रमाणे फास्ट्रॅकच्या सनग्लासेसमध्येही रंग आणि फिनिशच्या बाबतीत आर्मीशी संबंधित वस्तूंचा अंतर्भाव केला गेला आहे. या कलेक्शननधील सनग्लासेसच्या फ्रेम्स या गन मेटल फिनिशसह तर काचांसाठी वापरलेल्या रंगात आर्मी ग्रीनच्या वेगवेगळ्या छटा आहेत. हे घडय़ाळे आणि सनग्लासेसचे कलेक्शन रु. १३९५ पासून सुरू होते आणि ते रु. २३९५ पर्यंत उपलब्ध आहे. हे कलेक्शन वर्ल्ड ऑफ टायटन शोरूम्स, शॉपर्स स्टॉप, सेंट्रल, लाइफस्टाइल, ब्ल्यू स्काय, पिरॅमिड या स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.
पॅराशूटचे छोटय़ांसाठी ‘अ‍ॅडव्हान्स्ड स्टार्स’
व्यापार प्रतिनिधी: केसांच्या निगेतील अग्रेसर ब्रॅण्ड ‘पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड’ने तीन ते १० वयोगटातल्या लहानग्यांसाठी ‘पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड स्टार्स’ ही खास उत्पादने आणली आहेत. केसांच्या निगा राखण्याबरोबरच, ती केसांना प्रभावी पोषण पुरवतील, असा कंपनीचा दावा आहे. स्टार्स श्रेणीत नॉन-स्टिकी हेअर ऑइल (१०० मिलिच्या बाटलीसाठी ३५ रुपये), कोरडय़ा आणि तेलकट केसांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे जेंटल शाम्पू (१०० मिलिच्या बाटलीसाठी ५४ रुपये) आणि टू-इन-वन क्रीम जेल (६० ग्रॅमची टय़ूब ४९ रुपये) अशी उत्पादने प्रस्तुत झाली आहेत.
वेल्ला प्रोफेशनल्सचे ‘ट्रेन्ड व्हीजन २००९’
व्यापार प्रतिनिधी: व्यावसायिक केशरचनेतील व सौंदर्यसाधनेतील एक प्रमुख नाव आणि नावीन्यपूर्णता व ट्रेन्ड स्पॉटिंगमधील अग्रणी कंपनी वेल्ला प्रोफेशनल्सने ‘ट्रेन्ड व्हीजन ०९’ (टीव्ही ०९) हा आधुनिक केशरचना ट्रेन्ड उपक्रम जाहीर केला आहे. आगामी फॅशनच्या बाबतीत भाकीत करण्यात आणि रेड कार्पेट लूकसाठी ज्ञात असलेली कंपनी टीव्ही ०९ च्या माध्यमातून केशरचनेतील युवा पिढीचे नवनवीन ट्रेन्ड सादर करणार आहे. या वर्षी ट्रेन्ड व्हीजनमधील आघाडीचे ट्रेन्ड आहेत इंटरसेक्शन, व्हच्र्युअल लाइफ, युटोपिया आणि डी-लश. वेल्ला प्रोफेशनल्सच्या जागतिक सर्जनशील दिग्दर्शकांनी ट्रेन्ड व्हीजन २००९ मध्ये आधुनिक असा ट्रेन्ड याआधीच स्वीकारला असून त्यासाठी न्यूयॉर्क, लंडन, मिलान आणि पॅरिस येथील स्प्रींग/ समर २००९ कॅटवॉक लूक अंतर्भूत केला आहे. नार्सिको रॉड्रिग्ज, स्टेल्ला मॅककार्टनी आणि हुसेन चालायन यांचे कलेक्शन हा टीव्ही ०९ मधील अंतर्भूततेचा एक महत्त्वाचा भाग असेल.
परदेशी शिक्षणासाठी कर्ज मेळावा
व्यापार प्रतिनिधी: परदेशी शिक्षण घेण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन करणाऱ्या जीबी एज्युकेशनतर्फे येत्या १० जानेवारीला सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या दरम्यान परदेशी शिक्षणासाठी कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. योगी हॉल, तळमजला, स्वामीनारायण मंदिराजवळ, दादर स्टेशनच्या बाजूला दादर (पूर्व) येथे हा कर्ज मेळावा होणार आहे. या कर्ज मेळाव्याला सात आघाडीच्या बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून परदेशी शिकायला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खर्चाची तरतूद करण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकेल. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन जीबी एज्युकेशन तर्फे करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांना युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि स्वित्र्झलड या देशांमधील शैक्षणिक संधीची माहिती दिली जाईल. या देशांमधील विद्यापीठांमध्ये व्यापार, इंजिनिअरिंग, हॉटेल व्यवस्थापन, आर्किटेक्चर, बायोटेक्नोलॉजी, कला, डिझाइन, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील पदवी, पदविका अथवा पदव्युत्तर, शिक्षणासाठी भारतीय बँका शैक्षणिक कर्ज देतात. बहुतांश बँका परदेशी शिक्षणासाठी २० लाख रुपयांपर्यंतची कर्जे सवलतीच्या व्याजदराने देतात.
वॅनबरीची एकूण विक्री ३८८.५ कोटींवर
व्यापार प्रतिनिधी: वॅनबरी लिमिटेड कंपनीने ३० सप्टेंबर रोजी समाप्त १८ महिन्यांच्या कालावधीत रु. ३८८.५ कोटी विक्री साध्य केली असून त्यावर रु. २९.८ कोटी करोत्तर नफा कमावला आहे. उतरलेल्या दराने माल विक्री झाल्यामुळे कंपनीच्या प्रचालन पातळीवरील मार्जिनमध्ये ३.९१ टक्के वाढ होऊ शकली आहे. तसेच एफसीसीबीमुळे होणारे विदेशी चलन नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने तरतूद केली आहे. मात्र इतर उत्पन्नात घट झाल्यामुळे निव्वळ मार्जिनच्या प्रमाणातसुद्धा थोडी घट झाली आहे. त्याचप्रमाणे व्याज घसारा वाढल्यामुळे देखील निव्वळ मार्जिनमध्ये घट झाली आहे. वित्तीय वर्ष २००७ मध्ये प्रलंबित कर मालमत्तेमुळे (डेफर्ड टॅक्स असेट) करोत्तर नफ्यात म्हणजेच मार्जिनमध्ये चार टक्के वाढ झाली होती.
देवेंद्र शाह शरद बँकेच्या अध्यक्षपदी
व्यापार प्रतिनिधी: देवेंद्र शाह यांची शरद बँक, मंचरच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. बँकेचे संचालक दत्ता थोरात यांनी शाह यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले होते. शाह यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे. शाह हे पराग मिल्क फूडस प्रा. लि. चेही अध्यक्ष आहेत. दूध, दुधाची पावडर, लोणी, दही, ताक, गुलाब जाम मिक्स, चीझ आणि तूप या पदार्थासाठी मानला जाणारा गोवर्धन हा बॅ्रन्ड पराग मिल्क फूडसच्या मालकीचा आहे. शरद बँकेने आर्थिक वर्ष २००७-०८ मध्ये रु. १.६४ कोटींचा नफा कमावला असून बँकेच्या सहा शाखा कार्यरत आहेत.
टीव्हीएसची मुलींसाठी नवी ‘स्कूटी स्ट्रिक’
व्यापार प्रतिनिधी: ‘स्कूटी पेप प्लस’च्या यशानंतर टीव्हीएस मोटर कंपनीने खास नव्या युगातील तरुणींसाठी ‘स्कूटी स्ट्रिक’ ही नवीन स्कूटरेट बाजारात आणली आहे. अधिक आकर्षक स्वरूपात बाजारात आलेल्या ‘स्कूटी स्ट्रिक’ची किंमत ३५,८०० रुपये आहे. तरुणींसाठी कामगिरी, शैली, सोय व आराम याबाबत तडजोडशून्य पर्याय म्हणजे ‘स्कूटी स्ट्रिक’ असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.