Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

एकता कपूर ‘ब’ वर्गात
क्यों कि सॉंस भी कभी बहु थी, कसौटी जिदंगी की, कुसूम आणि यांसारख्या ‘क’ अक्षराने सुरू होणाऱ्या मालिकांची निर्माती आणि बालाजी टेलिफिल्म्स या बॅनरची सर्वेसर्वा एकता कपूरच्या दोन नव्या मालिका येत आहेत. पण आता एकता कपूरने ‘क’बरोबरच ‘ब’ वर्गात प्रवेश केला आहे असे म्हणायला हरकत नाही कारण नव्या दोन मालिकांमध्ये ‘बंदिनी’ ही ‘ब’ अक्षराने सुरू होणारी मालिका आहे तर दुसरी नेहमीप्रमाणे ‘क’ अक्षराने सुरू होणारी ‘कितनी मोहब्बत है’ या नावाची मालिका आहे. ‘ब’ अक्षराचे गुपित सांगताना एकता कपूर यांनी आपल्या ज्योतिषाने या अक्षरास मान्यता दिल्यामुळेच आपण ‘बंदिनी’ हे नाव निश्चित केले असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात एनडीटीव्ही इमॅजिन वाहिनीने बंदिनी या नावाचा आग्रह धरल्यामुळे एकता कपूरला गत्यंतर उरले नाही, अशी चर्चा आहे.
स्टार वाहिनीने ‘क्यों कि सॉंस भी कभी बहू थी’ मालिका बंद केल्यानंतर एकता कपूरचे महत्त्व कमी झाले की काय असे वाटत होते. तसेच एकता कपूरच्या मालिकांना मिळत असलेला प्राइम टाईम स्लॉटही गेला. एनडीटीव्ही इमॅजिन या वाहिनीला येत्या २१ जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत असून आरंभापासून थोडेसे वेगळ्या धाटणीचे कार्यक्रम दाखवून काही फारसा टीआरपी वाढत नाही असे या वाहिनीला वाटले. म्हणून आता टीआरपी आणि महसुल वाढविण्याचा उद्देश सफल करण्यासाठी एनडीटीव्ही इमॅजिनने बालाजी टेलिफिल्म्सला बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे, हे उघडच आहे.
१९ जानेवारीपासून सोमवार ते गुरूवार अशी सलग चार दिवस दोन्ही मालिका एकपाठोपाठ एक म्हणजे ‘बंदिनी’ मालिका रात्री १० वाजता तर ‘कितनी मोहब्बत है’ ही मालिका रात्री १०.३० वाजता एनडीटीव्ही इमॅजिनवरून दाखविण्यात येणार आहे.
या मालिकांची घोषणा करताना एकता कपूर म्हणाल्या की, बालाजी टेलिफिल्म्सच्या आधीच्या मालिकांपेक्षा या दोन्ही मालिका संपूर्णपणे निराळ्या धाटणीच्या आहेत. सासू-सून यांच्यातील हेवेदावे, भांडणे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न यातले काहीही या नव्या मालिकांमध्ये दिसणार नाही. एका तरूण मुलीचा विवाह तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाशी होतो आणि मग काय काय होते अशा स्वरूपाचे कथानक ‘बंदिनी’चे आहे. ही गोष्ट कशी सुचली असे विचारल्यावर आपली आई आणि आजी यांच्याकडून मी ही गोष्ट ऐकली होती. गेली ५-६ वर्षे कथानक डोक्यात घोळत होते. पण योग जुळून येत नव्हता. परंतु एनडीटीव्ही इमॅजिनच्या शैलजा केजरीवाल यांना गोष्ट ऐकवल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून कथानकाचा ढाचा तयार केला, असेही एकता कपूर यांनी सांगितले. आपल्या पूर्वीच्या मालिकांपेक्षा या नव्या मालिका सर्वथा निराळ्या आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. या दोन्ही मालिका किती भागांच्या असतील हे मात्र सांगायचे त्यांनी टाळले. यासंदर्भात एनडीटीव्ही इमॅजिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर नायर यांनाही याबाबत विचारल्यावर बालाजी टेलिफिल्म्सबरोबर आता आमची ‘इनिंग’ सुरू होतेय त्यामुळे या मालिका किती भागांच्या असतील हा प्रश्न आमच्या वाहिनीच्या दृष्टिने फारसा महत्त्वाचा नाही. एक प्रकारे बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिका म्हणजे किती शे एपिसोड्स असणारच हे जणू नायर यांनी अधोरेखित केले.
सुनील नांदगावकर

रिअ‍ॅलिटी मागची रिअ‍ॅलिटी
अगदी कालपरवापर्यंत ‘त्यांना’ स्वत:चा असा चेहरा नव्हता. लाखोंच्या गर्दीतील एक भाग म्हणून ‘ते’ही जीवन जगत होते. जगणे कसले म्हणा.. आला दिवस ढकलत होते. कोणाचे खायचे वांदे, तर कोणाचे निवाऱ्याचे. कधी आई-वडिलांची बोलणी सहन करीत, तर कधी कौंटबिक जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या या विवंचनेत! फक्त गर्दीमध्ये आणि त्यांच्यात एक फरक मात्र होता आणि तो म्हणजे त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता.. म्हणूनच ते वेगळे होते. या गुणवत्तेच्या जोरावरच त्यांच्या मनातील उमेद कायम होती. त्यापैकी कोणाच्या आवाजात कमालीचा गोडवा होता, तर कुणाचे पदलालित्य भन्नाट होते. कोणी उत्तम नकलाकार होता तर कोणाच्या बोटात जादू होती. मात्र आर्थिक परिस्थिती, बेकारी आणि उपासमारीच्या भस्मासूराने त्यांना इतका विळखा घातला होता की त्यातून बाहेर पडणे त्यांना अशक्य झाले होते. एकलव्याप्रमाणे त्यांचे तेच शिकत गेले. त्यापैकी अनेकांनी ‘सारेगमप’चे शास्त्रशुद्ध धडे गिरवले नाहीत की ‘ना धीं धीं ना’ शिकले नाहीत. किशोर कुमार, महम्मद रफी, मुकेश यांनाच त्यांनी आपले गुरु मानले. मिथुन चक्रवर्तीपासून ऋतिक रोशनपर्यंतच्या महानायकांना त्यांनी आपला आदर्श मानले. रस्त्यांवर डान्स करणारा मिथुन चक्रवर्ती थेट डिस्को डान्सर बनतो हे त्यांनी चित्रपटांमधून पाहिले होते. बारमध्ये गाणारा कुमार शानू भारतीय चित्रपट संगीतावर राज्य करतो हे त्यांनी अनुभवले होते. हिंदुस्थान लिव्हरमध्ये ‘लोडर’ म्हणून काम करणारा जॉनी लिव्हर यशाच्या शिखरावर कसा पोहोचला हे त्यांनी पाहिलेले असते आणि म्हणूनच त्यांची उमेद कायम असते.. ‘मै माधुरी दिक्षीत बनना चाहती हूँ’ प्रमाणे!
कुछ तो मेरे लहू में थी तख्लीक की महक
और कुछ मौसमों के रंग मेरे काम आ गये..
अखेर तो दिवस उजाडलाच! अचानक त्यांच्या आयुष्याला यशाची किनार लाभली. त्यांची गाडी ट्रॅकवर येऊन पोहोचली. अगदी चित्रपटांच्या कथानकाप्रमाणे त्यांचे आयुष्य घडत गेले. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात यशाची शिडी चढत गेला. आज ते ‘स्टार’ झाले आहेत. आज उनके पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स है.. आणि हे सगळे शक्य झाले ते त्यांना मिळालेल्या प्लॅटफॉर्ममुळे. हा प्लॅटफॉर्म होता मनोरंजन क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या ‘रिअ‍ॅलिटी शो’चा.. ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या या समुद्रमंथनातून अनेक रत्ने बाहेर पडली. ‘सारेगमप’, ‘इंडियन आयडॉल’, ‘व्हॉईस ऑफ इंडिया’, ‘लाफ्टर चँलेंज’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘एकापेक्षा एक’, ‘हास्यसम्राट’, ‘डान्सिंग क्वीन’ असे वेगवेगळ्या कलागुणांना वाव देणारे ‘रिअ‍ॅलिटी शो’ उदयास आले आणि या सगळ्या ‘स्ट्रगलर्स’चे नशिब फळफळले. ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या चमत्कारामुळे त्यांच्या आयुष्याचाही ‘मेकओव्हर’ झाला. केवळ ‘रिलॅलिटी शो’मधील विजेत्यांनाच नव्हे तर पराभूत झालेल्या मात्र ‘टॅलेन्टेड’ असलेल्यानांही त्याचा फायदा झाला. त्यापैकी अनेक आज चित्रपटांमध्ये पाश्र्वगायन करताना दिसत आहेत. अनेकजण चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. आज केवळ त्यांच्या नावावर ‘रिअ‍ॅलिटी शो’ तयार होत आहेत. ‘रिअ‍ॅलिटी शो’मधील अनेक दिग्गज संगीतकार, कोरिओग्राफर आणि पाश्र्वगायक परीक्षक त्यांना बरोबर घेऊन ‘शो’ज करीत आहेत. थोडक्यात काय तर ‘उनकी लाइफ अभी सेट हुई हैं’!
या सगळ्या ‘स्ट्रगलर्स’चा प्रवास कसा झाला..
आयुष्यात त्यांनी कोणत्या अडचणींवर मात केली.. स्टार झाल्यावर त्यांचे पुढचे संकल्प काय आहेत, याची कहाणी दर शुक्रवारी ‘वृत्तान्त’मध्ये आम्ही वाचकांसाठी घेऊन येत आहोत ‘अनोळखी ओळख’ या नव्या सदरामधून..!

‘गाव तसं चांगलं’ पण..
प्रीमिअरला कलाकारच वेशीबाहेर
प्रीमिअर शो हा चित्रपटातील सर्वच कलाकारांसाठी उत्कंठा वाढविणारा प्रसंग असतो. मराठी चित्रपटाचा प्रीमिअरही आता धुमधडाक्यात साजरा होतो. येत्या शनिवारी ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटाचा प्रीमिअर शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. पण ‘गाव तसं चांगलं’चे कलाकार मात्र चित्रपटाच्या प्रीमिअरला उपस्थित राहणार नाहीत. निर्मात्याने या चित्रपटाची पुरेशी प्रसिद्धी न केल्यामुळे नाराज झालेल्या कलाकारांनी अशा प्रकारे निषेध व्यक्त केला आहे. निर्माते आनंद डावरे यांनी मात्र आपला निर्णय योग्य असून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल, असे ‘वृत्तान्त’ला सांगितले. एका निगरगट्ट गावाला सुधारण्यासाठी कष्ट उपसणाऱ्या ध्येयवादी शिक्षकाची मुख्य भूमिका निळु फुले यांनी या चित्रपटात साकारली आहे. चित्रपटाची पटकथा व संवाद ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी लिहिली आहे. महेश टिळेकर यांनी या चित्रपटाची कथा व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. निळू फुले यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय नार्वेकर, विजय चव्हाण, सिद्धार्थ जाधव, सदाशीव अमरापूरकर

 

यांच्याही भूमिका आहेत.
‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटाला डिसेंबर महिन्यात सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर लगेचच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश टिळकर यांना हा निर्णय रुचला नाही. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाची योग्य ती प्रसिद्धी करावी, अशी टिळेकर यांची इच्छा होती. टिळेकर म्हणाले की, या चित्रपटाला ३० डिसेंबर रोजी सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले आणि निर्मात्याने लगेचच ९ जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. कलाकार, तंत्रज्ञ यांनी मेहेनत घेऊन तयार कलेल्या या चित्रपटाला पुरेशी प्रसिद्धी मिळाली नसल्याची तक्रार टिळेकर यांनी केली. प्रसिद्धीविना हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचेल की नाही, असा प्रश्नही दिग्दर्शकाला पडला आहे.
याबद्दल विचारणा केली असता निर्माते आनंद डावरे म्हणाले की, दिग्दर्शक-कलाकारांनी आपापली कामगिरी पाडली आहे. आता चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी निर्माते-वितरकांची आहे. सध्या चित्रपटाची फारशी प्रसिद्धी झाली नसली तर भविष्यात मात्र ती नक्कीच होईल. प्रसिद्धीसाठी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
स्पॉट बॉय ते दिग्दर्शक
‘गाव तसं चांगलं’चे दिग्दर्शक महेश टिळेकर एके काळी निळू फुले
अभिनीत चित्रपटासाठी स्पॉट बॉय म्हणून काम करत होते. ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटात निळू फुले मुख्य भूमिकेत आहेत. टिळेकर यांनी फिल्म मेकिंगचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नाही. स्पॉट बॉय म्हणून काम केल्यावर ‘गौरीचा नवरा’ या चित्रपटात ते ‘मॉब आर्टिस्ट’ होते. एकेक पायरी चढत चढत महेश टिळेकर दिग्दर्शनापर्यंत येऊन पोहोचले आहेत. ‘गाव तसं चांगलं’मधील निळू फुले यांच्या एनर्जीबद्दल टिळेकर भरभरून बोलतात. त्यांच्या एकाही दृश्याचा रिटेक घ्यावा लागला नाही, असे टिळेकर यांनी सांगितले.

गोविंदचे नशीब फळफळेल?
काही काही माणसांचे नशीब असे असते की, लाथ मारीन तेथे काढीन आणि काही माणसांनी कापसावर पाय मारला तरी जखम होण्याची शक्यता. ‘बॅड लक गोविंद’मधील गोविंदचे नशीब त्याला सदानकदा हुलकावणी देत असते. म्हणजे त्याने तबेल्यात पाय ठेवला तर दुभती गायही दूध देत नाही. अगदीच अतिशयोक्ती करायची झाली तर त्याने चहाचा घोट घेताच चहातील दूध नासते. एका घटनेने हा दिल्लीकर मुंबईत येतो. इकडे आल्यावर त्याची गाठ सहा ‘भाई’ आणि एका सुंदर ‘नर्स’शी पडते. त्यामुळे त्याचे नशीब पालटते की त्यांचे, असे या चित्रपटाचे कथासूत्र आहे. गोविंदची भूमिका साकारणारा व्ही. जे. गौरव कपूर अलीकडेच ‘वेन्सडे’मध्ये छोटय़ाशा भूमिकेत दिसला होता. लहानशी भूमिका असलेले ते पात्रही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले. गोविंद नामदेव, परमीत सेठी, व्रजेश हिरजी, ललित मोहन तिवारी आणि गणेश यादव यांनी ‘भाई’ची भूमिका केली आहे. ‘लिंबू-मिरची’च्या मध्ये अडकलेल्या गोविंदचे पोस्टर चित्रपटाच्या विनोदी बाजाची चाहूल देते. अलीकडच्या काळात फारसे मोठे स्टार न घेता कथेला महत्त्व देऊन तयार केलेले चित्रपट येऊ लागले आहेत. त्यामुळे वरुण खन्ना दिग्दर्शित हा चित्रपटही प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, अशी अपेक्षा आहे.चॉइस इज युवर्स

जॉर्ज बुश इज कमिंग
मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांसाठी भरपूर चित्रपट तयार होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘प्रेसिडेंट इज कमिंग’. हा चित्रपट २८ नोव्हेबरला प्रदर्शित होणार होता. पण दहशतवादी हल्ल्यांमुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हासुद्धा विनोदपटच आहे. जॉर्ज बुश भारतभेटीवर येतो आणि तीस वर्षांखालील एका व्यक्तीशी तो हात मिळविणार असतो. यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात येते. जॉर्ज बुशला शेक हॅण्ड करण्यासाठी भिन्न पाश्र्वभूमी असलेले सहाजण या स्पर्धेत सहभागी होतात, असा या चित्रपटाचा आशय आहे. कोंकणा सेनला आपण बरेचदा गंभीर भूमिकांमध्ये पाहिले आहे. यात मात्र ती एका विनोदी भूमिकेत आहे. बाकीचे अभिनेते फारसे ओळखीचे नाहीत. कुणाल रॉय कपूरचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे. हिंदी चित्रपटाच्या कथा आाताशा चाकोरीतून बाहेर पडू लागल्या आहेत. चार गाणी, अॅक्शन याच्या पलीकडे जाऊन नावीन्यपूर्ण संकल्पनेवर चित्रपट तयार होऊ लागले आहेत. ‘प्रेसिडेंट..’मधील कलाकार फारसे ओळखीचे नसले तरी चित्रपटाची कल्पना मात्र किमान शहरी प्रेक्षकाला चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याएवढी स्ट्राँग आहे. लेट्स ट्राय इट!

फेब्रुवारीत येणार ‘मराठी सिनेमा’
मराठी चित्रपटसृष्टीचीही आता ‘इंडस्ट्री’ होऊ लागली आहे, यावर शिक्कामोर्तबही होत चालले आहे. मराठी चित्रपटउद्योगाविषयी माहिती देणाऱ्या नियतकालिकांची संख्याही वाढू लागली आहे. अलीकडेच एका साप्ताहिकाची घोषणा झाल्यानंतर आता ‘मराठी सिनेमा’ हे मासिकही येऊ घातले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते या मासिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याभरात सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेले चित्रपट,पब्लिक नोटिस, फ्लोअरवर आलेले चित्रपट, प्रत्येक चित्रपटाने केलेला व्यवसाय, कलाकारांच्या मुलाखती, व्यावसायिक नाटकांची माहिती इत्यादी माहितीचा समावेश असणार आहे.
प्रतिनिधी