Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९

पेट्रोलपंप कोरडे; मुंबई ‘गॅस’वर
मुंबई, ८ जानेवारी / प्रतिनिधी
तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईवर अभुतपूर्व परिस्थिती ओढवली आहे. सीएनजी पुरवठा ठप्प झाल्याने टॅक्सी-रिक्षांसह बेस्टच्या अनेक बसेस दुपारनंतर रस्त्यांवर येऊ शकणार नाही. महानगर गॅसकडून (एमजीएल) मुंबईसह ठाण्यातील लाखो घरांना होणारा गॅस पुरवठा कुठल्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडर्सचा पुरवठा घटल्याने एकप्रकारे मुंबई ‘गॅस’वर आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील अर्धेअधिक पेट्रोलपंप कोरडे पडले असून, उद्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत न झाल्यास परवापासून एसटीच्या बसेससुद्धा रस्त्यांवर येऊ शकणार नाहीत, अशी स्फोटक परिस्थिती आहे. या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी आज या कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी तेल कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. दरम्यान ओएनजीसीने संपकरी अधिकाऱ्यांपैकी ६४ जणांची नोकरीतून हकालपट्टी करण्याचे ठरविले आहे अशी माहिती पेट्रोलियम खात्याचे सचिव आर. एस. पांडे यांनी आज दिली.

‘सत्यम’ च्या १० हजार कर्मचाऱ्यांवर ‘ले ऑफ’ची कुऱ्हाड
मुंबई/हैदराबाद, ८ जानेवारी/ पीटीआय

कोटय़वधींच्या आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या सत्यम कॉम्प्युटर्स या कंपनीतील सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात नोकरीतून कमी केले जाण्याची शक्यता आहे. सत्यम कॉम्प्युटर्समध्ये सध्या कर्मचाऱ्यांना दरमहा दिल्या जाणाऱ्या वेतनाची एकूण रक्कम ५०० कोटी रुपये इतकी होते. टेकीला आलेल्या सत्यम कॉम्प्युटर्सला इतका वेतनभार उचलणे आता शक्य नसल्याने कर्मचारी कपातीचा उपाय करण्यात येत आहे. ही माहिती हेडहंटर्स या रिक्रुटमेंट एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस लक्ष्मीकांत यांनी दिली आहे. आर्थिक घोटाळ्यामुळे सत्यम कॉम्प्युटर्स या कंपनीच्या खात्यात खडखडाट आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतकेही पैसे जवळ नाहीत इतकी ही कंपनी कंगाल बनली आहे. कर्मचारी कपातीनंतर हा वेतनाचा बोजा १० टक्क्यांनी कमी होणार आहे. या कंपनीत सध्या २० हजार कर्मचारी अतिरिक्त आहेत. त्यातील कर्मचाऱ्यांतूनच ही नोकरकपात होणार आहे.

मुंबईवरील हल्ल्यामागे ‘बांगलादेशी कनेक्शन’ही!
निशांत सरवणकर
मुंबई, ८ जानेवारी

मुंबईवरील हल्ल्यासाठी कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ दिल्याबाबत काही माहिती पुढे आलेली असतानाच आता बांगलादेशमधील लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांचे नवे कनेक्शन पुढे आल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला इम्रान शहजाद यांच्या जबानीतून यावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली. इम्रानला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ट्रान्झिट रिमांडद्वारे ताब्यात घेतले आहे. फईम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांनी दिलेल्या माहितीवरून इम्रानला ताब्यात घेण्यात आले असले तरी इम्रानच्या अटकेमुळे मुंबईवरील हल्ल्याचे बांगलादेश कनेक्शनही उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फईम आणि सबाउद्दीन या दोघांसमवेत इम्रानवरही अतिरेकी हल्ल्यासाठी मुंबईतील काही ठिकाणे निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुंबईतील गजबजलेल्या शेअर बाजाराचा फेरफटका इम्रानने मारला होता, असे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्यावर पराभवाची नामुष्की!
रांची, ८ जानेवारी/पी.टी.आय.

केंद्रातील पी. नरसिंहराव यांचे अल्पमतातील सरकार वाचविण्याच्या बदल्यात लाच घेतल्याच्या प्रकरणापासून सातत्याने चुकीच्याच कारणांसाठी चर्चेत राहिलेले झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना विधानसभा पोटनिवडणुकीत आज दणकून हार पत्करावी लागली. परिणामी त्यांच्या मुख्यमंत्रीपदावरच गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्याला पोटनिवडणूक गमवावी लागण्याचा अनावस्था प्रसंग गेल्या ३५ वर्षांत प्रथमच कोणावर आला आहे. सोरेन विधानसभेचे सदस्य नसल्याने येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना विधानसभेवर निवडून येणे गरजेचे होते.
तत्पूर्वी ९ जुलै रोजी राज्यातील तमाड येथील जद(सं)च्या आमदाराची माओवाद्यांनी हत्या केल्याने ती जागा रिकामी होती. सोरेन यांनी तेथूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात त्यांचे राजकारणातील प्रतिस्पर्धी आणि झारखंड पार्टीचे अध्यक्ष इनॉस एक्का यांचे सहकारी गोपालकृष्ण पतार हे उभे होते. गेल्या ३ जानेवारीला झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. पतार यांनी तब्बल ८ हजार मतांनी सोरेन यांचा पराभव करून एक वेगळाच इतिहास निर्माण केला. पराभवाची नामुष्की पदरात पडूनही शिबू सोरेन यांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अद्याप दिलेला नाही.
तांत्रिकदृष्टय़ा त्यांना मुख्यमंत्रीपदावर आणखी पावणेदोन महिने राहता येणार आहे. यूपीए नेत्यांची, विशेषत: राजदचे अध्यक्ष लालू यादव यांची भेट घेऊन मग राजीनाम्यासंदर्भात आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सोरेन यांना राजीनामा द्यायला लावून झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची आणि लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीलाही सामोरे जायचे, असा विचार काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव करीत आहेत. भाजपनेही झारखंडमध्ये सोरेन सरकार बडतर्फ करून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे.

संजय दत्तला सपाची लखनौमधून उमेदवारी
नवी दिल्ली, ८ जानेवारी / पी.टी.आय.

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेदरम्यान शस्त्र बाळगल्याबद्दल शिक्षा झालेला बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता व माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांचा पुत्र संजय दत्त याला लोकसभेच्या आगामी निवडणुकीत लखनौ लोकसभा मतदारसंघातून लढवण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने आज जाहीर केला. संजय दत्तचे कुटुंब प्रारंभापासून काँग्रेसचे समर्थक राहिलेले असून संजयची बहीण प्रिया दत्तही काँग्रेसच्याच खासदार आहेत. संजय दत्त हा अवैध शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली तुरुंगात होता. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले असून त्याला टाडा न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. त्याने शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले असून ते प्रलंबित असल्याने त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यापूर्वी सपाला सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. संजय दत्तला उमेदवारी देण्याचे समर्थन करताना अमरसिंह म्हणाले, भाजपने माजी कसोटी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ातील आरोपी असतानाही त्याला उमेदवारी दिली होती. संजय दत्तला निवडणूक लढण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, यासाठी पूर्ण ताकदीनिशी सपा प्रयत्न करेल. जर त्याला लढण्याची परवानगी मिळाली नाही तर तो आमचा ‘स्टार कॅम्पेनर’ असेल. लखनौ लोकसभा मतदारसंघ हा माजी पंतप्रधान व ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा बालेकिल्ला आहे. ते लोकसभेची आगामी निवडणूक लढणार वा नाही, याविषयी अद्याप अनिश्चितता असल्याने या मतदारसंघातून शक्तिशाली उमेदवार देण्यासाठीच सपाने संजय दत्तचे नाव समोर केल्याचे समजले जाते. संजय दत्तच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

वाढता दहशतवाद हे बौद्धिक आणि राजकीय आव्हान
मुंबई, ८ जानेवारी / प्रतिनिधी

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील वाढता दहशतवाद हे एक बौद्धिक आणि राजकीय आव्हान असल्याचे प्रतिपादन ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या पुस्तकाचे लेखक आणि कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक महमुद ममदानी यांनी आज मुंबईत केले. प्रेस क्लब आणि ‘इन्सानियत’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉरऑन टेरर’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. वाढता दहशतवादाला युद्ध हा पर्याय असू शकत नाही. कारण युद्धाला कधीच शेवट नसल्याचे सांगून महमुद म्हणाले, की अमेरिकेतील ‘९/११’च्या हल्ल्यानंतर दहशतवादाला एक जागतिक परिमाण प्राप्त झाले. दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आपल्याला वेगळ्या मार्गाने जावे लागेल. दहशतवादाला रोखण्यासाठी विविध उपाय करूनही तो आटोक्यात न येता वाढत का चालला आहे. त्याचाही विचार केला पाहिजे.
मानवाधिकार चळवळ ही आता मुलतत्त्ववादी होत चालली असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात महमुद यांनी अमेरिकेचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष आणि ओबामा, पॅलेस्टाइन, इस्राएल संघर्ष, मुजाहिदीन, तालिबान, जैश, लष्कर आदी दहशतवादी संघटना, अमेरिकेची बदलती धोरणे, राजकीय- सामाजिक गुन्हेगारीकरण, तसेच संबंधित प्रश्नांचा सविस्तर ऊहापोह केला.

आसाम स्फोटमालिकेचा सूत्रधार चकमकीत ठार
गुवाहाटी, ८जानेवारी/पीटीआय

नववर्षांच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू असताना गुवाहाटीमध्ये घडविण्यात आलेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील सूत्रधार व उल्फाचा प्रमुख नेता प्रंजल देका हा आसाममधील हलिकुची या गावी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला.
देका उर्फ बिजू सरनिया उर्फ भाम्बल हा उल्फाच्या ७०९ बटालियनचा सदस्य होता. आसाममधील कामरुप व नलबारी जिल्ह्यांच्या सीमेवरील हलिकुची गावातील एका घरात देका व त्याचा साथीदार लपले असल्याची पक्की माहिती मिळताच त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी या दोघांना प्रथम शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. पण त्याला प्रतिसाद न देता देका व त्याच्या साथीदाराने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये देका व त्याचा साथीदार हे दोघेही ठार झाले. देकाच्या साथीदाराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. गुवाहाटीतील बीरुबारी, भूतनाथ, भांगगड या भागांमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोटांमध्ये पाच जण ठार व ५० जण जखमी झाले होते.

धावती मालमोटार पेटल्याने आठ बैलांचा होरपळून मृत्यू
राजूर, ८ जानेवारी/वार्ताहर

यात्रेसाठी येथून जनावरे घेऊन चाललेल्या मालमोटारीस आग लागल्याने आठ बैल होरपळून मृत्युमुखी पडले, तर ८ गंभीर जखमी झाले. शेतकऱ्यांनी गाडीतून उडय़ा टाकल्याने ते बचावले. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावच्या यात्रेसाठी ही जनावरे चालवली होती.
आज पहाटे शिंदे, कोहणा, कोथळा, पिंपरी येथील जनावरे मालमोटारीतून (एमएच १७-८०२५) यात्रेसाठी घेऊन जाताना म्हसा गावाजवळ आल्यावर वीजतार घासल्याने ठिणगी पडली. त्यामुळे मालमोटारीतील पेंढय़ांनी पेट घेतला. हवेमुळे आग लवकर पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच चालक नासीर पठाण याने प्रसंगावधान ठेवत गाडी शेजारील नदीच्या पाण्यात घातली.
तोपर्यंत उशीर झाला होता. आठ बैल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, आठ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, परिस्थिती चिंताजनक आहे. दीपा कचरे (२), भाऊसाहेब साबळे (२), भास्कर गोडे (१), विठ्ठल गोडे (१), मारुती गोडे (२) या शेतकऱ्यांची ही जनावरे होती. भाऊ घोडे (१), सखाराम घोडे (२), देवराम गंभीरे (१), हरी घोडे (२) या शेतकऱ्यांची जनावरे जखमी झाली. या दुर्घटनेची माहिती समजताच आमदार मधुकर पिचड यांनी आमदार गोटिराम पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मदत उपलब्ध करून दिली. म्हसे येथील सरपंच भारती पुष्टे यांनी संबंधित शेतकऱ्यांना मदत केली.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८