Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

(सविस्तर वृत्त)

पेट्रोलपंप कोरडे; मुंबई ‘गॅस’वर
मुंबई, ८ जानेवारी / प्रतिनिधी

 
तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईवर अभुतपूर्व परिस्थिती ओढवली आहे. सीएनजी पुरवठा ठप्प झाल्याने टॅक्सी-रिक्षांसह बेस्टच्या अनेक बसेस दुपारनंतर रस्त्यांवर येऊ शकणार नाही. महानगर गॅसकडून (एमजीएल) मुंबईसह ठाण्यातील लाखो घरांना होणारा गॅस पुरवठा कुठल्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडर्सचा पुरवठा घटल्याने एकप्रकारे मुंबई ‘गॅस’वर आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील अर्धेअधिक पेट्रोलपंप कोरडे पडले असून, उद्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत न झाल्यास परवापासून एसटीच्या बसेससुद्धा रस्त्यांवर येऊ शकणार नाहीत, अशी स्फोटक परिस्थिती आहे.
या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी आज या कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी तेल कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. दरम्यान ओएनजीसीने संपकरी अधिकाऱ्यांपैकी ६४ जणांची नोकरीतून हकालपट्टी करण्याचे ठरविले आहे अशी माहिती पेट्रोलियम खात्याचे सचिव आर. एस. पांडे यांनी आज दिली.
‘एमजीएल’ला मुंबईसाठी ‘गेल’ कंपनीकडून होणारा सीएनजी पुरवठा आज पूर्णत: ठप्प झाला. कालपर्यंत कमी दाबाने होणारा गॅसपुरवठा आज पूर्णत: बंद झाल्याने दुपारनंतर मुंबई व ठाण्यातील सर्व १३४ सीएनजी फिलिंग स्टेशनवर एमजीएलने वाहनांसाठी सीएनजी भरणा रोखला. दोन्ही शहरांत सुमारे पावणे चार लाख घरगुती आणि एक हजार व्यावसायिक ग्राहकांना पाईपलाईनद्वारे होणारा गॅस पुरवठा (पीएनजी) सुरळीत राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे एमजीएलच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
पाईपलाईनमधील गॅस संपल्यानंतर कोणत्याही क्षणी घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा पीएनजी पुरवठा बंद होण्याची शक्यता एमजीएलने वर्तविली. सीएनजी फिलिंग स्टेशन बंद असल्याने शहरातील अनेक टॅक्सी-रिक्षा आज रस्त्यांवर आल्या नाहीत. उद्या सीएनजी संपल्यानंतर रिक्षा-टॅक्सींचा अघोषित चक्का जाम होईल. सीएनजी तुटवडय़ाचा फटका मुंबईकरांना आज संध्याकाळपासूनच जाणवू लागला. अनेक रिक्षा-टॅक्सी रस्त्यांवर न आल्याने रेल्वे स्थानकांबाहेर बसेससाठी मोठय़ा रांगा लागल्या होत्या. पेट्रोल पंपांवरही वाहनांची तोबा गर्दी उसळली होती. हिंदुस्तान पेट्रोलियमचे (एचपी) ८४ पेट्रोल पंप वगळता मुंबईतील इंडियन ऑईलचे ३४ आणि बीपीसीएलचे ८२ पंप कोरडे पडले असल्याने मुंबईतील इंधन पुरवठय़ाची स्थिती बिकट असल्याचे ‘फामपेडा’चे अध्यक्ष रवी शिंदे यांनी नमूद केले. राज्यातील सुमारे तीन हजार पेट्रोल पंपांपैकी अर्धेअधिक बंद पडले आहेत. त्यामुळे उर्वरित पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. निदान ‘एचपी’चे पंप सुरू आहेत; ही बाब वाहनधारकांच्या दृष्टीने दिलासादायक आहे. सीएनजीपुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास उद्या दुपारनंतर सुमारे ३५० बसेस रस्त्यावर येऊ शकणार नसल्याचे ‘बेस्ट’कडून सांगण्यात आले.