Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

(सविस्तर वृत्त)

‘सत्यम’ च्या १० हजार कर्मचाऱ्यांवर ‘ले ऑफ’ची कुऱ्हाड
मुंबई/हैदराबाद, ८ जानेवारी/ पीटीआय

 
कोटय़वधींच्या आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या सत्यम कॉम्प्युटर्स या कंपनीतील सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात नोकरीतून कमी केले जाण्याची शक्यता आहे. सत्यम कॉम्प्युटर्समध्ये सध्या कर्मचाऱ्यांना दरमहा दिल्या जाणाऱ्या वेतनाची एकूण रक्कम ५०० कोटी रुपये इतकी होते. टेकीला आलेल्या सत्यम कॉम्प्युटर्सला इतका वेतनभार उचलणे आता शक्य नसल्याने कर्मचारी कपातीचा उपाय करण्यात येत आहे.
ही माहिती हेडहंटर्स या रिक्रुटमेंट एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस लक्ष्मीकांत यांनी दिली आहे. आर्थिक घोटाळ्यामुळे सत्यम कॉम्प्युटर्स या कंपनीच्या खात्यात खडखडाट आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतकेही पैसे जवळ नाहीत इतकी ही कंपनी कंगाल बनली आहे. कर्मचारी कपातीनंतर हा वेतनाचा बोजा १० टक्क्यांनी कमी होणार आहे. या कंपनीत सध्या २० हजार कर्मचारी अतिरिक्त आहेत. त्यातील कर्मचाऱ्यांतूनच ही नोकरकपात होणार आहे.
काल दुपापर्यंत सत्यम कॉम्प्युटर्समधील सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांनी विविध जॉब साईटस्वर दुसऱ्या नोकरीकरिता आपला बायोडेटा पाठविला आहे. सत्यममध्ये एकूण ५३ हजार कर्मचारी आहेत. त्या सर्वाना बेकारीच्या भीतीने घेरले आहे. दुसऱ्या बाजूस मंदीमुळे आयटी उद्योगातील अन्य कंपन्यांतही नोकरभरतीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे ही चिंता अधिक गडद झाली आहे.
भयंकर अरिष्टात सापडलेल्या सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेसमध्ये हंगामी व्यवस्थापनाकडून कंपनीची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, त्यांनी जगभरातील ग्राहक कंपन्यांशी व्यावसायिक सातत्य ठेवण्याबाबत बोलणी सुरू केली आहेत. सत्यमचे हंगामी सीईओ राम मायनमपती यांनी आज सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध ‘डॅमेज कंट्रोल’ उपायांची माहिती दिली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच, कंपनीच्या वित्तीय व्यवहार व हिशेबांची धुरा सांभाळणारे आणि महाघोटाळ्यात संगनमताची शक्यता असलेले सत्यमचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) वल्दमनी श्रीनिवास यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचेही वृत्त आले.
सत्यम कॉम्प्युटरच्या व्यावसायिक सातत्यात बाधा येणार नाही, याला आपण सर्वाधिक प्राधान्य दिले असून, अपूर्णावस्थेत असलेल्या व्यावसायिक करारांची विनाखंड पूर्तता करण्यावर आपला भर राहिल, असे प्रतिपादन सत्यमचे हंगामी सीईओ राम मायनमपती यांनी केले. सत्यमच्या ग्राहक कंपन्या सद्यस्थितीत साथ सोडून जाणार नाहीत, यासाठी जागतिक स्तरावर त्यांच्याशी संपर्क व बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आणि या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे यशही मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्यमच्या ग्राहकवर्गात मोडणाऱ्या आघाडीच्या १०० कंपन्यांद्वारे कंपनीचा ८० टक्के महसूल उभा राहत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांनी कबुली दिलेल्या हिशेबातील घोटाळ्यांचे प्रमाण नेमके किती हे अद्याप निश्चित करता आलेले नाही आणि त्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षकांची नियुक्ती केली गेली असल्याचे मायनमपती यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. शिवाय कंपनीचे ताळेबंद पत्रक प्रमाणित करताना प्राइस वॉटरहाऊस कूपर्सने नेमकी कोणती प्रक्रिया अनुसरली हेही स्पष्ट नसून, त्या संबंधाने या कंपनीशी आपण संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांच्याशी गेले दोन दिवस आपला संपर्क नसला तरी ते हैदराबादमध्येच आहेत, असे स्पष्ट करीत त्यांनी ते फरार झाल्याचे वृत्त अनाठायी असल्याचे सांगितले. तर सीएफओ वल्दमनी श्रीनिवास यांच्या राजीनाम्याबाबत १० जानेवारीच्या संचालक मंडळात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अनेक संचालकांच्या राजीनाम्यांमुळे सध्या संचालक मंडळात मायनमपती यांच्यासह तीनच सदस्य उरले असून, संचालक मंडळाच्या विस्तारासाठी लवकरच नव्याने इन्व्हेस्टमेंट बँकरची नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सत्यमची रोख तरलता आणि हाती असलेली रोख शिलकीची स्थिती फारशी समाधानकारक नसली, तरी डिसेंबर २००८ महिन्याचा वेतन सर्व ५३,००० कर्मचाऱ्यांना दिला गेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.