Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

(सविस्तर वृत्त)

मुंबईवरील हल्ल्यामागे ‘बांगलादेशी कनेक्शन’ही!
निशांत सरवणकर
मुंबई, ८ जानेवारी

 
मुंबईवरील हल्ल्यासाठी कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ दिल्याबाबत काही माहिती पुढे आलेली असतानाच आता बांगलादेशमधील लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांचे नवे कनेक्शन पुढे आल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला इम्रान शहजाद यांच्या जबानीतून यावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली.
इम्रानला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ट्रान्झिट रिमांडद्वारे ताब्यात घेतले आहे. फईम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांनी दिलेल्या माहितीवरून इम्रानला ताब्यात घेण्यात आले असले तरी इम्रानच्या अटकेमुळे मुंबईवरील हल्ल्याचे बांगलादेश कनेक्शनही उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फईम आणि सबाउद्दीन या दोघांसमवेत इम्रानवरही अतिरेकी हल्ल्यासाठी मुंबईतील काही ठिकाणे निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुंबईतील गजबजलेल्या शेअर बाजाराचा फेरफटका इम्रानने मारला होता, असे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले.
‘हरकत-उल-जिहादी’ या बांगलादेशमधील अतिरेकी संघटनेच्या मदतीने इम्रानवर मार्च २००८ मध्ये शेअर बाजारात बॉम्ब ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्याआधीच त्याला अटक झाल्याने हा कट यशस्वी होऊ शकला नव्हता. त्यासाठी इम्रानने शेअर बाजार परिसराचा संपूर्ण सव्‍‌र्हे केला होता. शेअर बाजाराची त्याने छायाचित्रेही काढली होती. ही संपूर्ण माहिती सबाउद्दीनमार्फत लष्करच्या पाकिस्तानातील हँडलरकडे पाठविण्यात आली होती, असेही या सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानातील लष्करचा आणखी एक हँडलर अबू कमा याने इम्रान मियाँमार्फत भारतातील इंडियन मुजाहिदीनला मुंबईवरील हल्ल्यातील अतिरेक्यांसाठी सिम कार्डची व्यवस्था करण्यास सांगितले होते. या प्रकरणी दोघांना कोलकाता येथून अटक करण्यात आल्यानंतर इम्रान मियाँचेच नाव पुढे आले होते, असेही या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईत अतिरेकी हल्ल्यासाठी शिरलेले दहा अतिरेकी पहिल्यांदाच आले होते असे तपास यंत्रणांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ते यापूर्वीही येऊन गेले असावेत असे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. समुद्रमार्गे मुंबईत शिरकाव करणारे अतिरेकी ताज वा ओबेराय हॉटेल किंवा नरिमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्थानकात पहिल्याच भेटीत जाण्याची शक्यता कमीच आहे, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे. पाकिस्तानातून एक नौका भारतीय हद्दीत शिरणार असल्याचा संदेश १८ नाव्हेंबर रोजी गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर नौदल तसेच तटरक्षक दलाने म्हणावी तशी दक्षता का घेतली नाही याचीही सध्या चौकशी सुरू आहे. मच्छिमारांना पैशाचे आमीष दाखवून शस्त्र तस्करीच्या नावाखाली अतिरेक्यांनी कुबेरमध्ये प्रवेश मिळविला असावा, असा वेगळाच प्रवाह गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. अलीकडेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त राकेश मारीया यांनीदेखील अतिरेक्यांनी कुबेरचे अपहरण केले नव्हते तर ती संगनमताने त्यात शिरले होते, असे सांगितले होते.