Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९
प्रादेशिक

‘प्राइस वॉटरहाऊस कूपर्स’चा पूर्वेतिहासही डागाळलेला!
मुंबई, ८ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

प्राइस वॉटरहाऊस कूपर्स या जागतिक मान्यतेच्या ऑडिटिंग कंपनीच्या प्रतिष्ठेला ताज्या सत्यम घोटाळ्यामुळेच केवळ बट्टा लागलेला नाही, तर यापूर्वी दिवाळखोरीत गेलेली खासगी बँक- ग्लोबल ट्रस्ट बँकच्या संशयास्पद लेखा-परीक्षणासाठी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’ या नियामक संस्थेने प्राइस वॉटरहाऊस कूपर्सवर ताशेरे ओढले आहेत. सत्यम महाघोटाळ्याने तर या ऑडिटिंग कंपनीच्या सचोटी आणि सक्षमतेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

अलमट्टीवरून लवादाची कर्नाटकला चपराक!
पाण्याच्या फेरवाटपावरून आंध्रचा महाराष्ट्राला विरोध

संतोष प्रधान
मुंबई, ८ जानेवारी

गेले तीन वर्षे सांगली व कोल्हापूर परिसरात अतिवृष्टीला कारणीभूत ठरलेल्या कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील गाळाचे सर्वेक्षण करताना महाराष्ट्र व आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेण्याचा आदेश देऊन कृष्णा खोऱ्यातील पाण्याच्या फेरवाटपासाठी नेमलेल्या लवादाने कर्नाटक सरकारला चांगलीच चपराक दिली आहे. त्याच वेळी महाराष्ट्राने आधीच जास्त पाण्याचा वापर केल्याने फेरवाटपात महाराष्ट्राला अतिरिक्त पाणी देऊ नये, असा आक्रमक पवित्रा आंध्र प्रदेशने घेतला आहे.

गाव तेथे एसटी आणि एसटी तेथे ‘मनसे’
संदीप आचार्य
मुंबई, ८ जानेवारी

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत काम करणाऱ्या हजारो एसटी चालक-वाहक तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि लाल-पिवळ्या रंगाच्या एसटीतून प्रवास करणाऱ्या लक्षावधी प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी मनसेची ‘राज्य परिवहन कामगार सेना’ सज्ज झाली आहे. ‘गाव तेथे एसटी आणि एसटी तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ अशी नवीन संकल्पना यातून तयार होणार असून आगमी लोकसभा तसेच त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फायदा मनसेला होण्याची शक्यता आहे.

रामदास आठवले मतदारसंघाच्या शोधात
बंधुराज लोणे
मुंबई, ८ जानेवारी

रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी आतापर्यंत चार वेळा संसदेत प्रवेश केला आहे, मात्र येणाऱ्या लोकसभेत आठवलेंना संधी मिळेल की, नाही या विषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेचा आठवले यांना फटका बसला असून त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघच नसल्याने कोणी मतदारसंघ देता का मतदारसंघ, अशी याचना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रामदास आठवले उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा तर पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेत पोहोचले.

मालवाहतूकदारांचा संप 'इस्मा' लागू
मुंबई, ८ जानेवारी / प्रतिनिधी
इंधन आणि टायर्सच्या दरात कपातीच्या मागणीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने पुकारलेला देशव्यापी संप मुंबईसह राज्यभरात अधिकच चिघळला आहे. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक प्रभावित झाली असून शक्यता काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने वाहतूकदारांना अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला आहे. तसेच तेल कंपन्यांतील अधिकाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या स्फोटक परिस्थितीत वाहतूकदारांचा संप इंधन बचतीच्या दृष्टीने मुंबई व राज्याच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. आज वाहतूकदारांच्या संपाचा चौथा दिवस होता. मुंबईसह राज्यभरातील सुमारे ८५ टक्के वाहने आज रस्त्यांवर नव्हती.

नागपुरातील महिला दलालाने पाठविली १६ सरकारी अधिकाऱ्यांना विमानतिकिटे!
‘तिरुपतीवारी’ची पोलिसांमार्फत चौकशी होणार!

मुंबई, ८ जानेवारी / प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील एका बिल्डरने सुमारे ४०० सरकारी अधिकाऱ्यांना घडविलेल्या तिरुपतीवारीची अखेर पोलिसांमार्फत चौकशी करण्यात येणार असतानाच नागपुरातील एका महिला दलालाने गृहनिर्माण आणि महसूल विभागातील १६ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या विमानाच्या तिकिटांचे प्रकरण उघड झाले आहे. एका दलालाकडून पती, पत्नी व मुलांसाठी विमानाची तिकिटे घेतल्यामुळे अडचणीत आलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांचे प्रकरण ताजे असतानाच या सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेली सेवाही सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

इंडियन आयडॉलमध्ये दीपिकाची जादू
मुंबई, ८ जानेवारी/प्रतिनिधी

या आठवडय़ाच्या इंडियन आयडॉलच्या भागाचे प्रमुख आकर्षण होती, दीपिका पदुकोण. अगदी कमी वेळेत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही दीपिकाने या भागात स्टेजवर येऊन इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांबरोबर नाचून एकच धमाल उडवून दिली. विशेष म्हणजे नाचाबरोबरच तिने गायलेल्या गाण्याला परिक्षकांनी दाद दिली आणि अनु मलिकने तर तिला पुढची इंडियन आयडॉल असं संबोधलं! नाच आणि गाणे यावरच न थांबता तिने इंडियन आयडॉलमधील मुलींना मार्शल आर्टची एक ट्रीकही सांगितली. ‘चांदनी चौक टु चायना’ या आपल्या सिनेमासाठी आठ महिने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. स्पर्धकांबरोबर मनापासून मिसळून जाणाऱ्या दीपिकासाठी स्पर्धकांकडेही एक सरप्राईज होतं. त्यांनी तिचा वाढदिवस सेटवर साजरा केला. यावेळच्या इंडियन आयडॉलमध्ये स्पर्धकांनी आपल्या आवडत्या व्यक्तींची गाणी गायली. भाव्या पंडीतसाठी आशा भोसले दैवत आहेत. प्रसनजीतला राहत फते अली खान यांच्याबद्दल आदर आहे. त्याने ‘मैं जहा रहू..’ हे गाणे गाऊन त्यांना आदरांजली वाहिली. सुरभीला आर. डी. बर्मनचे संगीत आवडते तर भानू हा सोनु निगमचा चाहता आहे. तोर्षांला लता मंगेशकर आदर्श वाटतात तर मोहितला किशोर कुमार. अनु मलिक आणि जावेद अख्तर हे दोन आपले आदर्श असल्याचे सांगून राजदीपने सगळ्यांची वाहवा मिळवली. ही सगळी मजा मस्ती सोनी एंटनटेन्मेंट टेलिव्हिजनवर शुक्रवारी रात्री ९.०० वाजता बघता येईल.

बडतर्फ पोलीस शिपायास पुन्हा नोकरीत घेण्याचा आदेश
मुंबई, ८ जानेवारी/प्रतिनिधी

एप्रिल २००६ मध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातून बडतर्फ केलेल्या नयन अशोक पाटील या पोलीस शिपायास एक महिन्याच्या आत पुन्हा सेवेत घ्यावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)ने दिला आहे. नयन पाटील यांची नेमणूक हंगामी स्वरूपाची होती. तरी पोलीस मॅन्युअलच्या नियम ७८(६)नुसार बडतर्फीपूर्वी त्यांना एक महिन्याची नोटीस दिली जाणे गरजेचे होते. मात्र पाटील यांना नोटीस दिल्यानंतर २० दिवसांतच बडतर्फ केले गेले. त्यामुळे त्यांची बडतर्फी नियमबाह्य ठरते, असा निकाल ‘मॅट’चे न्यायिक सदस्य न्या. एस. आर. साठे व सदस्य अवधेश प्रसाद सिन्हा यांच्या खंडपीठाने दिला. मात्र पाटील यांना पुन्हा नोकरीत घेतले तरी त्यांना मागचा पगार मिळणार नाही, असे न्यायाधिकरणाने नमूद केले. नयन पाटील मूळचे अलिबागचे आहेत. त्यांच्यावर एकूण चार फौजदारी खटले दाखल होते. त्या सर्वातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. याआधीही त्यांची पोलीस शिपाई म्हणून नेमणूक झाली होती. परंतु त्यांनी या चार खटल्यांची माहिती पूर्वचारित्र्य पडताळणीच्या फॉर्ममध्ये न दिल्याने त्यांना काढून टाकले गेले होते. आता निवड झाल्यावर भरलेल्या फॉममध्ये त्यांनी चारही खटल्यांची माहिती दिली व त्यांची निकलपत्रेही सोबत जोडली होती. तरीही त्यांच्याविरुद्धचे हे खटले नैतिक अध:पतनाच्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचे होते व त्यांना तांत्रिक मुद्दय़ावर निर्दोष ठरविले गेले होते, अशी कारणे देऊन त्यांना बडतर्फ केले गेले.

प्रजासत्ताकदिनी राजधानीत रंगणार धनगरी गजानृत्य
मुंबई, ८ जानेवारी / प्रतिनिधी

२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे शोभायात्रेत महाराष्ट्र राज्याच्या वतीने पारंपरिक वेशातील, धनगर आणि त्यांच्या प्रसिद्ध गजानृत्याचा चित्ररथ सहभागी होणार असून, देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची सांस्कृतिक पताका उंचावण्यासाठी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. जेजुरीचा खंडोबा हे धनगर समाजाचे कुलदैवत. कुलदैवताप्रती कपाळावर भंडारा, मेंढय़ांच्या संगोपनासाठी हाताला लांब काठी आणि खांद्यावर घोंगडी, डोक्याला फेटा असा हा मेंढपाळ धनगराचा पारंपरिक पोशाख असतो. या पोशाखातील कलाकार गजानृत्य सादर करणार आहेत.

संकटाशी सामना’ मुंबईत कार्यशाळा
‘मुंबई, ८ जानेवारी / प्रतिनिधी

आपत्कालीन स्थितीशी सामना कसा करावा, संकटग्रस्तांना कोणती व कशी मदत करावी, याचे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा एस. एन. डी. टी.च्या दूरस्थ शिक्षण विभागाने मुंबईतील जुहू कँपस येथे शनिवार, १० जानेवारी रोजी आयोजित केली आहे. या विभागाचे संचालक डॉ. चंद्रकांत पुरी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, डॉ. समीर दलवाई, क्रांती गवळी यांचे मार्गदर्शन या वेळी लाभेल.
स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांसाठी ही कार्यशाळा खुली आहे. नोंदणीसाठी संपर्क- मंगेश कदम- ९८६७७४१०५३ किंवा cdesndt@gmail.com