Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९


‘नऊ’लाई!!!
काही चित्रकार इतके हुबेहुब चित्र काढतात की ते छायाचित्रच वाटावे तर काही जण एखादे दृश्य कॅमेऱ्यात अशा काही खुबीने टिपतात की, ते दृश्य एक चित्रच बनून जाते. अॅब्स्ट्रॅक्ट हा प्रकार केवळ चित्रांत नसून छायाचित्रातही तो असू शकतो, याचा अनुभव देणारे नऊ छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ७ जानेवारीपासून वरळीच्या नेहरू केंद्रात सुरू होत आहे. अरविंद सावंत यांची कृष्णधवल रंगातील फुलांची छायाचित्रे, हिरा पंजाबी यांचे वन्यजीवनातील टिपलेला वेग, जगदीश माळी, मंगेश पवार यांनी टिपलेली अॅबस्ट्रॅक्ट छायाचित्रे यातून छायाचित्रणाचे एक वेगळेच रूप रसिकांसमोर येते. याशिवाय मनोहर गांगण, मेघनाद गणपुले, ओंकाल सिंग प्लाहा, रामसिंग बीर आणि शैलेश वर्तक यांची छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. येत्या
१२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.

पालिका ठेकेदारांकडून कोटय़वधींची राजरोस लूट
बंधुराज लोणे

देशात सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील नागरी कामांत ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमतातून करदात्या मुंबईकरांची कोटय़वधींची लूट केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा महिन्यात या ठेकेदारांनी शेकडोपट जास्त रक्कम आकारल्यामुळे पालिकेच्या तिजोरीतून सुमारे पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेकेदारांच्या खिशात जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम शहरात सुरू होणाऱ्या फक्त ६२ कामांतून ठेकेदारांच्या खिशात जाणार आहेत. पालिकेकडून वर्षभरात होत असलेल्या एकूण कामांची तपासणी केल्यास या कामांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे दीड हजार कोटी रुपये ठेकेदारांच्या खिशात जात आहेत.
निविदा काढण्यापूर्वी प्रत्येक कामांचा अंदाजे खर्च गृहीत धरला जातो. सहा महिन्यांपूर्वीचा या कामाचा अंदाजित खर्च पाहता आता काढण्यात आलेल्या निविदांचा दर कितीतरी अधिक आहे.

भुयारी मार्गातील अतिक्रमणे सुरक्षित!
प्रतिनिधी

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला एक महिना लोटतो न लोटतो तोच सीएसटी रेल्वे स्थानकालगतच्या भुयारी मार्गातील सुरक्षा व्यवस्था ढेपाळल्याचे निदर्शनास आले आहे. भुयारी मार्गातील दुकानदार आपल्या दुकानापुढे पादचाऱ्यांसाठीच्या जागेवर अतिक्रमण करून मालाची विक्री करीत असून त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी तैनात असलेले पोलीसही या प्रकाराकडे दुर्लक्षच करतात. दुकानदार आणि येथे बंदोबस्ताला असलेले पोलीस यांचे साटेलोटे असल्यामुळेच विक्रेते शिरजोर झाल्याचे पादचाऱ्यांमध्ये बोलले जाते. याबाबत विचारणा केली असता तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने बेजबाबदारपणे उत्तरे देऊन प्रस्तुत प्रतिनिधीची बोळवण केली. दहशतवाद्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर हल्ला चढविल्यांनंतर काही दिवस तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. परंतु आता या सुरक्षा व्यवस्थेत शिथिलता आल्याचे निदर्शनास येत आहे. सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेरच्या भुयारी मार्गामधील दुकानदार नियम धाब्यावर बसवून आपल्या मालाची विक्री जाण्या-येण्याच्या मार्गात डबे ठेऊन करीत आहेत. या भुयारी मार्गामध्ये काही कारणास्तव धावपळ उडाली तर या मालामुळे प्रवासी धडपडू शकतात. भुयारातील खांबांना दुकानदार वरपासून खालपर्यंत कपडे लटकवतात.

टॅक्सीतील ‘रायडिंग कम्फर्ट’चा विचार कधी होणार?
कैलास कोरडे

मोटारकार संवर्गातील चालकासह तीन किंवा चार प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असलेले कोणतेही वाहन टॅक्सी म्हणून रस्त्यांवर येऊ शकते. एखाद्या वाहनाला टॅक्सी म्हणून मंजुरी देताना राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) निर्णयाचे तंतोतंत पालन केले जाते. मात्र रेल्वे व बेस्ट वाहतुकीच्या तुलनेत सुरक्षित, वेगवान, आरामदायी सेवेसाठी जास्त पैसे मोजणाऱ्या टॅक्सी प्रवाशांच्या ‘रायडिंग कम्फर्ट’च्या हक्काला हरताळ फासला जातो. याबाबत फ्लीट टॅक्सी योजना राबविताना केलेला विचार काळ्या-पिवळ्या किंवा निळ्या-चंदेरी (कूल कॅब) टॅक्सींच्या बाबतीत कधी होणार, असा प्रश्न जाणकार प्रवासी उपस्थित करीत आहेत. ऑगस्ट २००८ मध्ये एसटीएने २५ वर्षे झालेल्या टॅक्सी मोडीत काढण्याचा आदेश दिला. त्या टॅक्सींना दिलेला परवाना कमी करण्यात आला. यामुळेच मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने पुढाकार घेऊन ‘स्वस्तात मस्त’ म्हणून मोठय़ा संख्येने मारुती ओम्नी टॅक्सी म्हणून रस्त्यांवर आणल्या.

तानाजी विठ्ठल केमसे.. अग्निशमन दलातील विक्रमवीर
प्रसाद रावकर

तानाजी विठ्ठल केमसे.. वय वर्षे ४१.. अग्निशमन दलातील एक कर्तव्यदक्ष जवान.. आपत्कालीन संकटात प्राणपणाला लावून नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी धावणाऱ्या या जवानाने आगळावेगळा विक्रम नोंदवून अग्निशमन दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तानाजी केमसे यांचा जन्म पुणे येथील मुळशी तालुक्यात झाला. इयत्ता पहिलीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढे त्यांचे वडील नोकरीनिमित्त मुंबईत आले. एकत्र कुटुंबात वाढलेले तानाजी यांचे पुढील शिक्षण गिरगावमधील फणसवाडीतील सीताराम पोतदार शाळा आणि नंतर ठाकूरद्वार येथील जे. रानडे विद्यालयात झाले. साहसी वृत्तीमुळे तानाजी १९९५ मध्ये अग्निशमन दलामध्ये रूजू झाले. अग्निशमन दलात दाखल होताच तानाजी यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अग्निशमन दलातील जवानांचे कौशल्य, चपळता, चातुर्य यांची चाचपणी करण्यासाठी अग्निशमन दलातर्फे महाराष्ट्र आणि राज्य पातळीवर अग्निकवायत स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. निर

पथनाटय़ातून वाहतूकनियमांचा संदेश देणार
प्रतिनिधी : टॅक्सीच्या मागील सीटवर बसलेला प्रवासी टॅक्सीचालकाला गाडी वेगात चालविण्यास सांगतो पण टॅक्सीचालक मात्र तसे करण्यास नकार देतो. त्याच्या या उत्तरामुळे रागावलेला प्रवासी टॅक्सीचालकाला पुन्हा हॉर्न वाजवायला सांगतो. याही वेळी, हॉस्पिटल समोर असल्याने आपण हॉर्न वाजवू शकत नाही असे टॅक्सीचालक सांगतो. प्रवासी, टॅक्सीवाला, त्याच्या बाजूने जाणारा बेस्टचालक यांच्यात थोडेसे भांडण होते. भोवती असलेले रिक्षावाले या भांडणाला हसतात, टाळ्या वाजवतात. रिक्षा, बस आणि टॅक्सीमधील हा प्रसंग रोजच तुमच्या-आमच्या आयुष्यात घडणारा असला तरी यावेळी मात्र तो एका पथनाटय़ाचा भाग होता. गेले तीन दिवस वाहतूक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या पथनाटय़ाला मिळालेला प्रतिसाद पाहता वाहतूक विभागाच्या विविध मोहिमा पथनाटय़ाद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस असल्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त हरिश बैजल यांनी सांगितले.

पत्रकारदिनी दै. ‘सागर’च्या वतीने शहीद शशांक शिंदे यांचे स्मारक लोकार्पण
प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे २६ नोव्हेंबरला दहशतवाद्यांशी लढताना गोळीबारात शहीद झालेले पोलीस निरीक्षक शशांक शिंदे यांचे स्मारक त्यांच्या कोकणातील रिक्टोली या गावात उभारण्यात आले आहे. दैनिक ‘सागर’च्या वतीने उभारण्यात आलेल्या या स्मारकाचा लोकार्पण नुकताच सोहळा पार पडला. यावेळी रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधिक्षक सुरेश मेंडगे, सागरचे संपादक नाना तथा निशिकांत जोशी व सरपंच दिनेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कै. शशांक शिंदे यांचे वडिल चंद्रसेन शिंदे, भाऊ उत्तम शिंदे, पत्नी मानसी शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच कोकण मुस्लीम सिरत समितीच्या वतीने मुश्ताक युसूफ शाह यांनी पवित्र कुराणाचे पठण करून आदरांजली वाहिली.

वैशाली माडे राजकारणात जाणार
प्रतिनिधी : हे आम्ही नाही म्हणत, खुद्द वैशालीनेच अलीकडे राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली. झी मराठीवरील सारेगमप या कार्यक्रमाच्या महागायिकेचे विजेतेपद पटकाविलेल्या वैशाली भैसने-माडेने हिंदी सारेगमपमध्येही धमाल उडवून दिली आहे. या स्पर्धेच्या तीन अंतिम स्पर्धकांमध्ये वैशालीचाही समावेश झाला आहे. या स्पर्धेचा निकाल लागायचा बाकी आहे. त्या आधीच तिने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तिने राजकारणात प्रवेश करण्याची इच्छाही व्यक्त केली. एवढय़ात नाही, पण अजून दहा वर्षांनी मी नक्की राजकारणात जाणार, असे वैशालीने सांगितले. संगीताकडून राजकारणात का, अशी विचारणा केली असता ती म्हणाली की, निवडणुका जवळ आल्या की विविध पक्षांचे पुढारी आश्वासनांच्या फैरी झाडतात आणि निवडणुका झाल्या की अचानक गायब होतात. तिच्या या इच्छेला थोडीशी पाश्र्वभूमीही आहे. गरिबीत बालपण काढलेली वैशाली लहानपणीपासूनच गाण्याचे कार्यक्रम करते. दोन-तीन कार्यक्रमांना काही नेते मंडळीही उपस्थित होती. वैशालीच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू, अशी घोषणाही काही नेत्यांनी केली होती. कार्यक्रम झाल्यानंतरमात्र त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. गावागावांत दडलेले अनेक कलाकार योग्य मार्गदर्शनाअभावी किंवा आर्थिक चणचणीमुळे पडद्याआडच राहतात. अशा कलाकारांना मदत करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी वैयक्तिक स्वरूपात ती मदत करणारच आहे. राजकारणात गेल्यावर हे काम व्यापक स्वरूपात करता येईल, असे वैशालीचे म्हणणे आहे. राजकारणात गेली तरी ज्या संगीताने तिची ओळख निर्माण केली ते संगीत मात्र ती सोडणार नाही. ती म्हणाली की, अभिनेते राजकारणात जाऊ शकतात तर गायक का नाही?