Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९
नवनीत
संसारातील एकूण एक वस्तू अल्लाहची स्तुती व प्रशंसा करण्यात मग्न आहे. मग ते अणूच्या गर्भातील सूक्ष्म कण असोत की वृक्षवल्लीतून वाहणारे वारे असोत. ते आपापल्या भाषेत अल्लाहचा नामोल्लेख करण्यात मग्न आहेत. पवित्र कुरआनामध्ये अनेक ठिकाणी याचा उल्लेख करण्यात आला आहे. एके ठिकाणी म्हणण्यात आले आहे की, वमा ख़लक़तुल जिन्न वल इन्स इल्ला लियअबुदून; म्हणजे मी जिन्न आणि माणसांना या शिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी.
 
अल्लाहची भक्ती व त्याच्या नावाचा जप अनेकप्रकारे केला जातो. पुढील श्लोक बघा- अलहम्दुलिल्लाही रब्बिल आलमीन; अर्रहमानिर्रहीम; मालिकी यौमिद्दीन..! भावार्थ असा- स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे जो सर्व सृष्टीचा रब्ब (मालक, पालनपोषण करणारा, काळजी वाहणारा व देखरेख करणारा आणि शासक- संयोजक) आहे. एकमात्र कृपावंत व दयावंत, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे.
पवित्र कुरआनात पुढे एके ठिकाणी म्हटले आहे- अल्लाह जो चिरंतनजीवी आहे त्याने तमाम सृष्टीचा भार सांभाळलेला आहे त्याच्या शिवाय इतर कोणीही ईश्वर नाही. तो झोपतही नाही आणि त्याला झोपेची गुंगीही येत नाही. पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे त्याचेच आहे. असा कोण आहे जो त्याच्या पुढे त्याच्या परवानगीशिवाय शिफारस करु शकेल? जे काही दासांच्या सक्षम आहे ते तो जाणतो आणि जे काही त्यांच्यापासून अदृश्य आहे तेही तो जाणतो आणि त्याच्या माहितीपैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या बुद्धिकक्षेत येऊ शकत नाही. या व्यतिरिक्त की एखाद्या गोष्टीचे ज्ञान तो स्वतच त्यांना देऊ इच्छित असेल, त्याचे राज्य आकाश आणि पृथ्वीवर पसरले आहे आणि त्यांचे संरक्षण काही त्याला थकवून सोडणारे काम नव्हे. फक्त तोच एकटा महान व सर्वश्रेष्ठ आहे.(अकबकरा २:२५५) ल्ल अनीस चिश्ती

आकाशातल्या ताऱ्यांची तेजस्वितेनुसार वर्गवारी कशी केली जाते? ही पद्धत कोणी विकसित केली?
निरभ्र काळोख्या रात्री आपल्याला आकाशात अनेक तारे दिसतात. यातले काही तारे तेजस्वी तर काही तारे अंधूक दिसतात. ताऱ्यांच्या तेजस्वितेच्या मापनाचा पहिला प्रयत्न दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीक खगोलशास्त्रज्ञ हिप्पार्कस याने केला. हिप्पार्कसने साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या आकाशातील तेजस्वी ताऱ्यांचे पहिल्या प्रतीचे, तर साध्या डोळ्यांना जेमतेम दिसणाऱ्या सर्वात अंधूक ताऱ्यांचे सहाव्या प्रतीचे, असे वर्गीकरण केले. उरलेल्या ताऱ्यांचे त्यांच्या तेजस्वितेप्रमाणे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या प्रतीचे अशी वर्गवारी केली. हिप्पार्कसच्या या प्रत (मॅग्निटय़ूड) पद्धतीला कोणताही गणिती आधार नव्हता. मात्र ही पद्धत सोयीची असल्याने पुढची दोन हजार वर्षे सर्व खगोलशास्त्रज्ञांनी याचा वापर केला.
एकोणिसाव्या शतकात नॉर्मन पॉटासन या खगोलशास्त्रज्ञाने ताऱ्यांच्या तेजस्वितेचे फोटोमीटर या उपकरणाच्या साहाय्याने मापन केले. योगायोगाची गोष्ट अशी की पॉगसनला पहिल्या प्रतीच्या व सहाव्या प्रतीच्या ताऱ्यांच्या तेजस्वितेमध्ये शंभर पटीचा फरक आढळला. याचा अर्थ असा की दोन सलग प्रतीच्या ताऱ्यांच्या तेजस्वितेत सुमारे अडीच पटीचा फरक असतो. पॉगसनच्या या शोधामुळे हिप्पार्कसने शोधलेल्या प्रत पद्धतीला गणिती आधार मिळाला. आताही प्रत दोनही दिशांना वाढवता येणार होती. पहिल्या प्रतीच्या ताऱ्यापेक्षा अडीच पट तेजस्वी ताऱ्याचीप्रत शून्य व त्यापेक्षा अडीचपट तेजस्वी तारा उणे एक प्रतीचा, तसंच सहाव्या प्रतीपेक्षा अडीच पट अंधूक तारा सातव्या प्रतीचा. परंतु, सर्व अवकाशस्थ वस्तूंना तेजस्वितेच्या या मापन पद्धतीत बसविण्यासाठी एका प्रमाण ताऱ्याची आवश्यकता होती. खगोलशास्त्रज्ञांनी अभिजित या ताऱ्याला प्रमाण मानून त्याची प्रत शून्य मानली व यानुसार सर्व ताऱ्यांच्या व अवकाशस्थ वस्तूंच्या प्रती नक्की केल्या. रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या सर्वात तेजस्वी व्याघ ताऱ्याची प्रत -१.४, तर शुक्र ग्रहाची प्रत -४.४ आहे. पौर्णिमेचा चंद्र -१२.६ प्रतीचा तर सूर्याची प्रत -२७.६ आहे. हबल आकाश दुर्बिणीतून दिसणारा सर्वात अंधूक तारा +२४ प्रतीचा आहे.
प्रदीप नायक
pradeepnayak@gmail.com
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

‘दि सेकंड सेक्स’ हा एकच ग्रंथ लिहून लेखनविराम घेतला असता तरीही जिचं नाव साहित्यविश्वात आदरानं घेतलं गेलं असतं अशी बुद्धिवादी, स्त्री-पुरुष समानतेची पुरस्कर्ती जगविख्यात फ्रेंच लेखिका सिमॉन द बूव्हा. चूल आणि मूल हा पारंपरिक, पिढीजात सिद्धान्त नाकारत जिनं कुटुंबसंस्थेच्या पिढीजात चौकटीपासून स्वत:ला जाणुनबुजून दूर ठेवलं, सतत लेखन, वाचन आणि त्यावर चिंतन हेच जिचं आयुष्य बनलं अशी सिमॉन ९ जानेवारी १९०८ ला जन्मली. ‘बाई असणं म्हणजे काय’ या प्रश्नातून जन्म झाला ‘दि सेकंड सेक्स’चा. कुणीही स्त्री म्हणून जन्मत नाही, स्त्रीत्व घडवलं जातं हे तिचं गाजलेलं विधान. हजारो र्वष स्त्रियांचं स्वातंत्र्य साऱ्या जगानंच नाकारलं होतं हे त्रिवार सत्य तिनेच जगासमोर मांडलं. १४ एप्रिल १९८६ ला सिमॉनचा मृत्यू झाला. ल्ल संजय शा. वझरेकर

आज तुषारला बालवाडीच्या ताईंनी त्याचं नाव लिहायला शिकवलं. तुषार खूष झाला. बराचवेळ प्रयत्न करुन त्याने पाटीवर नाव लिहिले- ‘तुषार’. बाई म्हणाल्या, ‘शाब्बास. सारखंसारखं लिहिलंस की नीट लिहिता येईल.’
तुषार शाळेतून घरी आला. काकांनी त्याला रंगीत खडूची पेटी भेट दिली होती. त्यातला हिरवा, जांभळा, लाल खडू घेऊन तो विचार करु लागला की, कसंबरं लिहावं आपलं नाव? आई-बाबा घरी नव्हते. तुषारने भिंतीवर तिन्ही खडूंनी एकेक अक्षर लिहिले ‘तषर’. ‘अरे काहीतरी चुकलं वाटतं’, तो स्वतशीच पुटपुटला. त्यानं आपल्या चुकीच्या लिहिण्यावर फुली मारली. दुसऱ्या भिंतीवर नाव लिहिलं. असं करत घरातल्या सगळ्या भिंती रंगीत झाल्या. नावाशेजारी चिमुकलं फुल काढल्यावर तो फारच खूष झाला. घरी कंटाळा आला. मग तो घराबाहेर गेला. परसात पेरु, आंबा, चाफा, प्राजक्ताची झाडं होती. झाडांच्या बुंध्यावर तो नाव लिहायला लागला. छान वाटलं त्याला. मस्त दिसत होती त्याच्या नावाची झाडं. मग तो शेजारच्या जोशीकाकूंकडे गेला. त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यानं दरवाजावर स्वतचं नाव चार-पाच ठिकाणी लिहिलं. किती सुंदर नाव लिहिता येऊ लागलं होतं त्याला. मोठय़ा अक्षरात त्यानं खिडक्यांच्या काचांवर स्वतचं नाव लिहिलं. बाईंचं खरंच होतं. सारखंसारखं लिहिल्यावर नीट लिहिता येतं. तो खूष झाला.
संध्याकाळी आई घरी आली. तुषारने अभिमानाने सांगितलं, ‘आई, मी आता माझं नाव लिहू शकतो.’ ‘असं का, फारच छान हं राजा. शहाणंच आहे बाळ माझं’, असं म्हणत आईने त्याची पाठ थोपटली. इतक्यात शेजारच्या जोशीकाकू आल्या. त्या रागावल्या होत्या- ‘तुषारच्या आई, पाहिलेत का तुमच्या मुलाचे पराक्रम? आमचा दरवाजा, खिडक्या, काचा सगळं रंगवून टाकलंय स्वतच्या नावानं. काय विचित्रपणा हा?’ ‘काय रे तुषार? अरे का केलंस असं?’, आईनं विचारलं.
‘बाईंनीच सांगितलं होतं की सारखं लिहित राहा.’
‘अरे, म्हणून अशा भिंती, दरवाजे, खिडक्या खराब करायच्या का? एवढी मेहनत कागदावर, वहीत केली असतीस तर?’ आईने समजावणीच्या सुरात सांगितलं. ‘तर काय झालं असतं?’ -तुषारने विचारलं. ‘तर तुला तू खराब केलेल्या सगळ्या जागा पुसून काढाव्या लागल्या नसत्या. आता हे ओलं फडकं घे आणि सगळ्या भिंती, झाडे, दरवाजे, खिडक्या पूस बरं’, आई म्हणाली. तेवढय़ात परेशदादा आला. त्याने आणि तुषारने आईने सांगितलेली शिक्षा पूर्ण केली.
जे काम करायचे ते केवळ श्रम करायचे म्हणून करू नका. योग्यप्रकारे करा. विनाकारण दुप्पट वेळ वाया जातो.
आजचा संकल्प- कष्ट नकोत म्हणून जे काम लांबणीवर टाकलेय ते आज करुन टाका.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com