Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

(सविस्तर वृत्त)

महामार्ग ते लोहमार्ग
ठाणे ते पनवेल व्हाया नवी मुंबई

 
पनवेल/प्रतिनिधी- केवळ पनवेल आणि ठाण्यातीलच नव्हे, तर कल्याण-बदलापूपर्यंतच्या लाखो प्रवाशांचे डोळे लागलेल्या ठाणे-नेरुळ आणि ठाणे-पनवेल थेट लोकलसेवेला आज अखेर मुहूर्त मिळाला आहे. रेल्वे राज्यमंत्री नारणभाई राठवा आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दुपारी १२ वाजता ठाणे स्थानकातील १० क्रमांकाच्या फलाटावर ठाणे-नेरुळ लोकलला हिरवा कंदील दाखविण्यात येईल, हीच लोकल पुढे पनवेल स्थानकात येईल आणि प्रवाशांचे ठाणे-पनवेल थेट लोकलचे प्रलंबित स्वप्न पूर्ण होईल. सुरुवातीला ठाणे-नेरुळ दरम्यान १२, तर ठाणे-पनवेलदरम्यान केवळ चार फेऱ्या होणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मात्र येत्या १० दिवसांत ठाणे-पनवेल गाडीच्या दररोज एकूण २० फेऱ्या सुरू होतील, अशी माहिती पनवेल रेल्वे प्रवासी संघाचे सचिव श्रीकांत बापट यांनी दिली.
ठाणे स्थानकातून निघालेली ही गाडी पनवेल स्थानकात दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे व अन्य पदाधिकारी या नव्या गाडीचे स्वागत करतील. हीच गाडी २ वाजून सहा मिनिटांनी रवाना होईल आणि ठाणे स्थानकात ३ वाजून चार मिनिटांनी पोहोचेल. खासदार आनंद परांजपे यांनी ठाणे-नेरुळ लोकलच्या शुभारंभाची घोषणा केल्यानंतर नवी मुंबईतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.ठाणे-पनवेल लोकलला आधीच विलंब झाल्याने ९ जानेवारीचाच मुहूर्त साधून नेरुळपर्यंतची लोकल पनवेलपर्यंत आणावी, अशी आग्रहाची मागणी प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य करीत घाईघाईने ठाणे-पनवेल थेट लोकलसेवेची घोषणा केली. ही घोषणा ऐनवेळी केल्यानेच सुरुवातीला या सेवेच्या केवळ चार फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. येत्या आठवडाभरातठाणे-पनवेल आणि पनवेल-ठाणे दरम्यान प्रत्येकी १० अशा एकूण २० फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय झाला. यामुळे एसटीला आर्थिक फटका बसणार आहे. ठाणे-पनवेलदरम्यान एसटीच्या दररोज सव्वाशेहून अधिक गाडय़ा धावतात व १७ हजारांहून अधिक प्रवासी त्याचा लाभ घेतात. मात्र ठाण्याच्या सिडको स्टॉपवरील अनागोंदी कारभार व बेशिस्त यामुळे प्रवासी त्रस्त असतात, तसेच ठाण्याहून पनवेलला येणाऱ्या गाडय़ांची ‘प्रकृती’ बिघडलेली असलेली प्रवाशांना अवयव मोजतच उतरावे लागते. या त्रासासाठी २३ रपये मोजावे लागतात ते वेगळेच. दीड तासांच्या या प्रवासाच्या तुलनेत लोकल आरामदायी ठरणार आहे. ही लोकल५० मिनिटे व १४ रुपयांत पनवेल गाठणार आहे. मासिक पास काढणाऱ्यांना तर केवळ २०० रुपये मोजावे लागणार आहेत. हा रेल्वेमार्ग एसटीच्या मार्गाला समांतर असल्याने मधल्या स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांसाठीही ही सेवा लाभदायक ठरणार आहे. ठाणे-पनवेल थेट सेवेलाही प्रचंड प्रतिसाद अपेक्षित असल्याने या २० फेऱ्या अपुऱ्या पडण्याची चिन्हे आहेत.