Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

(सविस्तर वृत्त)

रेल्वेसोबत गाडय़ांची प्रतीक्षाही रुळांवर
नवी मुंबई/प्रतिनिधी

 
नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच ठाण्याहून नेरुळ आणि पुढे थेट पनवेलपर्यंत रेल्वेसेवा सुरू करून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नववर्षांची भेट देणाऱ्या मध्य रेल्वेने नव्या मार्गासोबत प्रवाशांच्या नशिबी गाडय़ांच्या प्रतीक्षेचा फेराही मांडून ठेवला आहे. सकाळी आठ ते साडेदहा या एरवी चाकरमान्यांसाठी पीक अवर असलेल्या वेळेत ठाणे-नेरुळ लोकल कारशेडमध्ये मस्तपैकी पहुडलेली असेल, हेच या मार्गावरील वेळापत्रकानुसार स्पष्ट होऊ लागले आहे. या मार्गावर दोन्ही बाजूस पहिली लोकल सकाळी साडेदहा तसेच ११ नंतर धडधडणार आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत ठाणे-नेरुळ हा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना सानपाडा- वाशीचा द्राविडीप्राणायाम सध्या तरी करावाच लागेल, अशीच चिन्हे आहेत.
ठाणे- नेरुळ मार्गावर पहिल्या टप्प्यात नऊ डब्यांच्या दोन लोकल सोडण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने आखला होता. या मार्गावरील पहिल्या लोकल गाडीस ठाणे रेल्वेस्थानकातून राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हिरवा कंदील दाखविणार आहेत. यानंतर मात्र नऊ डब्यांची अवघी एकच लोकल या मार्गावर दोन्ही बाजूंनी फेऱ्या मारणार आहे. विशेष म्हणजे ठाणे-पनवेल रेल्वेसेवेचा शुभारंभही याच दिवशी होणार असली तरी या मार्गावरील प्रवाशांच्या नशिबी पहिल्या टप्प्यात जेमतेम चार फेऱ्याच येणार आहेत. त्यामुळे रेल्वेमार्ग सुरू झाला, या आनंदात असणाऱ्या प्रवाशांना गाडय़ांच्या प्रतीक्षेचा फेरा मात्र चुकणार नाही, असेच चित्र आहे. साधारण पाच वर्षांंपूर्वी ठाणे-वाशी रेल्वे सेवा सुरू झाल्याने नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातील प्रवाशांना दळणवळणाची नवी कवाडे खुली झाली होती. असे असले तरी या मार्गावर गाडय़ांच्या पुरेशा फेऱ्या व्हाव्यात, यासाठी प्रवाशांना सातत्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. अखेर पाच वर्षांंनंतर या मार्गावर ७४ फेऱ्यांचे दान पडले आहे. असे असले तरी ठाणे-वाशी मार्गावरील प्रवाशांची तोबा गर्दी लक्षात घेता, या मार्गावर आणखी फेऱ्यांची आवश्यकता आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे- नेरुळ मार्ग सुरू करताना रेल्वेने या मार्गावर दोन्ही बाजूस जेमतेम १२ फेऱ्या सुरू करून प्रवाशांना पुन्हा एकदा नाराज केले आहे. या मार्गाचा आढावा घेताना मध्य रेल्वे ठाणे-नेरुळ मार्गावर पहिल्या टप्प्यात २२ फेऱ्या सुरू करण्याचे निश्चित केले होते. मात्र रेल्वेने हे आश्वासन पाळलेले नाही, अशी टीका ठाण्याचे खासदार आनंद परांजपे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना केली. ठाणे-पनवेल मार्गावर दोन्ही बाजूस अवघ्या चार फेऱ्यांची तजवीज करून रेल्वेने हा मार्ग सुरू करण्याची केवळ औपचारिकता उरकली आहे.