Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

महामार्ग ते लोहमार्ग
ठाणे ते पनवेल व्हाया नवी मुंबई

पनवेल/प्रतिनिधी- केवळ पनवेल आणि ठाण्यातीलच नव्हे, तर कल्याण-बदलापूपर्यंतच्या लाखो प्रवाशांचे डोळे लागलेल्या ठाणे-नेरुळ आणि ठाणे-पनवेल थेट लोकलसेवेला आज अखेर मुहूर्त मिळाला आहे. रेल्वे राज्यमंत्री नारणभाई राठवा आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दुपारी १२ वाजता ठाणे स्थानकातील १० क्रमांकाच्या फलाटावर ठाणे-नेरुळ लोकलला हिरवा कंदील दाखविण्यात येईल, हीच लोकल पुढे पनवेल स्थानकात येईल आणि प्रवाशांचे ठाणे-पनवेल थेट लोकलचे प्रलंबित स्वप्न पूर्ण होईल. सुरुवातीला ठाणे-नेरुळ दरम्यान १२, तर ठाणे-पनवेलदरम्यान केवळ चार फेऱ्या होणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मात्र येत्या १० दिवसांत ठाणे-पनवेल गाडीच्या दररोज एकूण २० फेऱ्या सुरू होतील, अशी माहिती पनवेल रेल्वे प्रवासी संघाचे सचिव श्रीकांत बापट यांनी दिली.

रेल्वेसोबत गाडय़ांची प्रतीक्षाही रुळांवर
नवी मुंबई/प्रतिनिधी

नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच ठाण्याहून नेरुळ आणि पुढे थेट पनवेलपर्यंत रेल्वेसेवा सुरू करून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नववर्षांची भेट देणाऱ्या मध्य रेल्वेने नव्या मार्गासोबत प्रवाशांच्या नशिबी गाडय़ांच्या प्रतीक्षेचा फेराही मांडून ठेवला आहे. सकाळी आठ ते साडेदहा या एरवी चाकरमान्यांसाठी पीक अवर असलेल्या वेळेत ठाणे-नेरुळ लोकल कारशेडमध्ये मस्तपैकी पहुडलेली असेल, हेच या मार्गावरील वेळापत्रकानुसार स्पष्ट होऊ लागले आहे. या मार्गावर दोन्ही बाजूस पहिली लोकल सकाळी साडेदहा तसेच ११ नंतर धडधडणार आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत ठाणे-नेरुळ हा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना सानपाडा- वाशीचा द्राविडीप्राणायाम सध्या तरी करावाच लागेल, अशीच चिन्हे आहेत.

‘सामान्य गुंतवणूकदारांनी अधिक डोळस व्हावे’
पनवेल/प्रतिनिधी : सत्यम कॉम्प्युटर्सचा फुगा फुटल्याच्या पाश्र्वभूमीवर सामान्य गुंतवणूकदारांनी अधिक डोळसपणे व्यवहार करण्याची आवश्यकता आहे, असे मत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपप्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी व्यक्त केले आहे.
सत्यम कॉम्प्युटर्समध्ये झालेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे ५५ हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे, तसेच ६० लाख भागधारकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. असे अनेक घोटोळे दररोज होत असून, शेवटचे टोक गाठल्यानंतरच ते उघड होत असल्याने मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचे भयंकर नुकसान होत आहे. या पाश्र्वभूमीवर सामान्य गुंतवणूकदारांनी संबंधित कंपनी, पतपेढी, बँक यांच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांची वेळोवेळी माहिती घ्यावी, असे आवाहन सोमण यांनी केले आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे आत्तापर्यंत अशा अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यातील काही तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, मात्र अशा आर्थिक गुन्ह्यांवर राजकीय प्रभाव असल्याने अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखलच होत नाहीत. हा आर्थिक दहशतवाद भयंकर असून, भविष्यात मोठा अनर्थ टाळण्यासाठी दक्ष नागरिकांनी बिगर राजकीय व्यासपीठ निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘त्या झोपडय़ा १९९५ पूर्वीच्या नाहीत’
पनवेल/प्रतिनिधी : रस्ता रुंदीकरण तसेच मैदानांची निर्मिती करताना अनधिकृत बांधकामे हटवावीच लागतात, पालिका प्रशासनाने वाल्मिकीनगरमधील तोडलेल्या झोपडय़ा १९९५ पूर्वीच्या नाहीत, असा खुलासा पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केला आहे.
या झोपडय़ा पाडल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना-भाजप व आरपीआयतर्फे पालिकेवर नुकताच एक मोर्चा काढण्यात आला होता. पाडलेल्या झोपडपट्टीवासींना कारवाईपूर्वी एक महिना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक तेथे जाईपर्यंत एकही झोपडीधारक तक्रार घेऊन आला नाही.
मात्र त्या पाडल्यानंतर शेकापच्या झोपडपट्टीदादांनी कांगावा करीत हा मोर्चा काढला, असा आरोप ठाकूर यांनी केला.
२००१ ते २००६ दरम्यान सत्ताधारी असणाऱ्या शेकापने झोपडपट्टीवासींसाठी काही केले नाही, मात्र काँग्रेसने पनवेलच्या विकासाचा विचार करून १९९५ पर्यंतच्याच नव्हे, तर २००० सालापर्यंतच्या झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.