Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

तहसीलदारांच्या उपस्थितीत प्रभारी पुरवठा अधिकाऱ्यांविरुध्द तक्रारी
वार्ताहर / अमळनेर
तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांमधील गैरव्यवहारा संदर्भात वादग्रस्त स्थिती असताना स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीत बुधवारी तहसीलदार रवींद्र सपकाळे यांच्या उपस्थितीतच गोंधळ उडाल्याने पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर आला. प्रभारी पुरवठा अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढाच स्वस्त धान्य दुकानदारांनी या बैठकीत वाचला.

करविभागाची भीती बाळगू नका!
नंदकुमार शुक्ला यांचा करदात्यांना दिलासा

प्रतिनिधी / नाशिक

कर विभागाची भिती बाळगण्याचे दिवस आता गेले असून उलट आज आयकर अधिकाऱ्याने करदात्याला घाबरले पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण त्याची एक तक्रार आयकर अधिकाऱ्याच्या क्रेडिट रिपोर्टला वेगळे वळण देऊ शकते, असे प्रतिपादन आयकर मार्गदर्शक नंदकुमार शुक्ला यांनी केले.

कायदा-सुव्यवस्थेची बिकट अवस्था
उद्योग विश्वावरील अवकळा (९)

स्थानिक औद्योगिक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था हा पण अत्यंत टिंगलीचा विषय आहे. खरे तर अंबड, सातपूर, सिन्नर, दिंडोरी व गोंदे या प्रत्येक औद्योगिक वसाहतीत खास एमआयडीसीसाठी पोलीस यंत्रणा हवी. पण अंबड पोलीस ठाण्याला सिडको, पाथर्डी, सातपूर पोलीस ठाण्याला अशोक नगर, शिवाजीनगर, हौसिंग कॉलनी वगैरे दाट नागरी वसाहतींचा परिसर जोडला गेला आहे. त्यामुळे उद्योगांसाठी वेगळे ठाणे अस्तित्वात नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या चोऱ्या व अन्य गैरप्रकार रोखण्याला अपेक्षेनुसार महत्त्व मिळत नाही. शिवाय अनेकदा या वसांहतींमधील पथदीपही बहुतेकदा बंद असतात. शनिवारी सायंकाळनंतर तर सगळाच अंधार असतो. त्यामुळे चोरटय़ांचे फावते. याबाबत संबंधित यंत्रणेशी वेळोवेळी संपर्क साधूनही उपयोग होत नाही. शनिवारी पथदीप सुरू ठेवायचे तर त्यासाठी वेगळी वाहिनी लागेल असे म्हणतात. पण पथदीप लावणे हे महानगरपालिकेचे काम आहे. कर वसुलीसाठी सर्वप्रथम उद्योजकांना ‘टार्गेट’ करायचे, पण सुविधा द्यायची वेळ आली की टोलवाटोलवी करायची. पथदीपांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नी एम.आय.डी.सी., महानगरपालिका व वीज कंपन्यांमध्ये समन्वय राहू शकत नसेल तर आणखी काय अपेक्षा करणार, हा प्रश्नच आहे. शनिवारी म्हणजे साप्ताहिक सुटीच्या दिवशी औद्योगिक वसाहतींमध्ये हमखास चोऱ्या होतात. गंमत म्हणजे नोव्हेंबर मध्ये अंबडच्या उद्योगातून जेव्हा आठवडय़ातून दोन दिवस वीज पुरवठा खंडित असायचा तेव्हा एक आख्खा ट्रॉन्सफार्मरच चोरीला गेला.

रिक्षाचालकाजवळ बसणाऱ्या प्रवाशांनाही दंड
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी आजवर हरतऱ्हेने झालेले प्रयत्न तोकडे पडल्यानेच की काय, आता रिक्षात पुढच्या बाजुला बसणाऱ्या प्रवाशांनाही दंड करण्याचा फतवा प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) काढला आहे. अशारितीने प्रवाशांना दंड होऊ लागला तर ते रिक्षाचालकाशेजारी बसण्यापासून परावृत्त होतील व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षात कोंबण्याच्या प्रकारांना त्यामुळे हमखास आळा बसेल, असा उद्देश त्यामागे आहे. अर्थात, थेट प्रवाशांना अशारितीने दंड होऊ शकतो का याबाबत संबंधित यंत्रणांमध्येच साशंकता असून यातून कसा मार्ग काढता येईल, त्यादृष्टीने विचारविनिमय सुरू आहे. दरम्यान, कोणत्याही मार्गाने का होईना, पण या प्रकारांना आळा घातला जावा, अशी प्रतिक्रिया याबाबत सजग नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अपघात विरहित शहराच्या दिशेने..
अपघात विरहित शहर. खरोखरच अशी संकल्पना प्रत्यक्षात आली तर काय बहार येईल! आजच्या परिस्थितीत राज्यातील विशषत: घोटी ते पिपंळगाव या भागात अपघातांची संख्या जास्त आहे. काळ ,काम व वेगाचे गणित मांडून मिडटर्म प्रगतिपुस्तकाचे संकल्प सोडणाऱ्या मुख्यमंत्र्याना प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाण्यास वेळ नाही. जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांना तर असे गणित मांडण्याचीही गरज नाही. पण तरीही आर.टी.ओ. तसेच पोलिसांच्या कार्यक्रमास हजेरी लावून ते वरील प्रमाणे संकल्पना मांडतात. जिल्हाधिकाऱ्यांची कितीही इच्छा असली तरी ‘सिस्टिम’ मधील दोष उपटून काढणे त्यांनाही कठीण आहे. आरटीओ, पोलिसांबद्दल आम्हालाही फार काही म्हणायचे नाही. कारण त्यांच्यावरील कामाचा भार, अपुरे संख्याबळ, प्रसंगानुरुप वाढणारा बंदोबस्त अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. नाशिकपुरते बोलायचे झाले तर, पोलिसांची ‘शिस्तप्रियता’ मान्य करुनही असे वाटते, की त्यांनी हायवेवरच्या ट्रकना, सहाचाकी गाडय़ांना ओव्हरलोडींग व वेगासाठी शिस्त लावली, मुंबई नाका, द्वारका अशा ठिकाणी योग्य ते नियोजन केले आणि कॉलेजरोडवरील वेगवान हिरोंना चाप लावला तरी हा संकल्प काही अंशाने का होईना पूर्ण होऊ शकतो.

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज राष्ट्रीय परिषद
नाशिक / प्रतिनिधी

पुणे विद्यापीठ आणि येथील म.वि.प्र. समाजाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या सहकार्यातून ‘जागतिकीकरणात शिक्षक प्रशिक्षणाची भूमिका’ याविषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. युजीसीने पुरस्कृत केलेल्या या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. जागतिकीकरणाचे महत्त्व व त्यापुढील आव्हाने लक्षात घेता शिक्षक प्रशिक्षण, शिक्षक प्रशिक्षक व अभ्यासक्रम या सर्वाची भूमिका काय असावी या विषयावर तीन सत्रांमध्ये चर्चा होणार आहे. परिषदेस मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आ. डॉ. वसंत पवार, अध्यक्ष अरविदं कारे, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम रायते यांनी दिली. परिषदेच्या समन्वयक डॉ. व्ही. एन. जाधव आहेत.

धुळे महापालिका विरोधी पक्षनेतेपद अतुल सोनवणे यांना देण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी
वार्ताहर / धुळे

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी महापौर मोहन नवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेनेची सदस्य संख्या १६ असल्याने साहजिकच या पक्षाच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मित्र पक्षांनी महापालिकेवर सत्ता स्थापन केली आहे. महापालिकेच्या सभागृहात संख्याबळ कमी असल्याने शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदी सोनवणे यांची निवड करण्याची मागणी केली आहे. गटनेता नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी यासंदर्भात पत्र दिले. या संदर्भातील सर्वाधिकार महापौरांना आहेत. दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठीही विशेष सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातर्फे यासाठीची नावे जाहीर करण्यात आलेली नसली तरी शासन नियमातील नव्या तरतुदीमुळे संख्याबळानुसार सदस्य निवड होणार आहे. यामुळे महत्वाची अशी स्थायी समितीही सत्ताधारी गटाकडेच राहू शकेल. याच दरम्यान शिवसेना, भाजप आणि लोकसंग्रामची युती होऊ शकते असे म्हटले जात आहे. असे झाले तर या नव्या युतीचे सहा तर सत्ताधारी गटाचे १० सदस्य निवडून येऊ शकतील अशी परिस्थिती आहे.

मनमाडमध्ये दोन गटात हाणामारी; चार जखमी
वार्ताहर / मनमाड

जुन्या भांडणाची कुरापत काढून शहरातील आठवडे बाजार परिसरात बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेनंतर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आठवडे बाजारात सशस्त्र पथक सुरक्षेसाठी ठेवण्यात आले आहे. या हाणामारीत चार जण जखमी असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इदगाह परिसरात राहणाऱ्या अमिन शेख कासम (२५)ने रामभूल बेद, अमन बेद, जितु बेद, काळू बेद, सुशील राठोड, शंकर बेद, व अन्य यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीचा भाऊ तक्रार मागे घेत नाही, या कारणावरून आपल्यावर तसेच आपल्या साथीदारांवर तलवार व कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत अमीनने म्हटले आहे. या प्रकरणी संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीत आसीफ शेख, अमीन शेख व फहीम खान जखमी झाले. आठवडे बाजारात राहणाऱ्या रामभूल बेद (५५) ने अल्ताफ अत्तर, अमीन पटेल, बबलु (पूर्ण नाव नाही), आसीफ पटेल, जितु वानखेडे, तौसिक शेख, नहीम सहा, मोईन, काहिल आदी दहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून हातात लाठय़ा-काठय़ा घेऊन आपणास मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून आठवडे बाजारासह शहरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलिसांच्या दोन तुकडय़ा तसेच पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस दल शहरात दाखल झाले आहे.