Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९


मोहरमनिमित्त पुण्यात गुरूवारी निघालेल्या मिरवणुकीत मोठय़ा संख्येने ताबूत सहभागी झाले होते.

भावपूर्ण वातावरणात करबला मिरवणूक
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

सरबत, रेवडय़ांचे वाटप करून, ताबुतांना शेरा वाहून मोहरमच्या निमित्ताने शहरात मुस्लिम बांधवांनी भावपूर्ण वातावरणात करबला मिरवणूक काढली. या मिरवणुकीत मोठय़ा संख्येने ताबूत सहभागी झाले होते. ताबुतांची मिरवणूक दुपारी ३ वाजता लष्कर भागातून सुरू झाली. त्यानंतर सरबतवाला चौक, नेहरू मेमोरियल हॉल, पॉवर हाऊस, रास्ता पेठ, अपोलो चित्रपटगृह, दारूवाला पूल, गणेश पेठ, सोन्या मारुती चौक, शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक, वसंत चित्रगृह, शनिवारवाडय़ाच्या पाठीमागून गाडगीळ पुतळ्याजवळून संगम ब्रीज येथे ताबुतांचे विसर्जन करण्यात आले. या करबला मिरवणुकांमध्ये विविध पक्ष, संघटना, संस्थांतर्फे सरबत, रेवडय़ांचे वाटप करण्यात येत होते. या मिरवणुकीमध्ये २० ताबूत सहभागी झाले होते. त्यांचे विसर्जन संगम ब्रीज येथे करण्यात आले.बगदाद येथील करबला येथे यसजीत या हुकूमशहाच्या अत्याचाराविरुद्ध लढताना इमाम हसन व हुसेन हे शहीद झाले होते. तो महिना मोहरमचा होता. त्यांच्या स्मृतिनिमित्त या ताबुतांची करबला मिरवणूक काढण्यात येते. या युद्धात हसन व हुसेन यांना पंधरा दिवस पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिनिमित्त सरबत वाटण्यात येते. या करबला मिरवणुकीस मुस्लिम बांधव मोठय़ा संख्येने जमले होते. चार वाजेपासून रस्ते गर्दीने भरून गेले होते, तसेच ताबुतांना शेरा वाहत होते.

पालिकेचे जकातीचे उत्पन्न सव्वाशे कोटींनी घटण्याची चिन्हे
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

महापालिकेच्या जकात विभागाने डिसेंबरअखेर पर्यंत उत्पन्नातील सातत्य टिकवून ठेवले असले, तरी मंदीचा फटका या विभागालाही बसणार असून चालू आर्थिक वर्षांच्या उत्पन्नात किमान सव्वाशे कोटींनी घट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंदीच्या वातावरणात जकात विभागाने डिसेंबरअखेर तरी समाधानकारक कामगिरी केल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ५५२ कोटी रुपयांचे उत्पन्न जकात विभागाला मिळाले होते. त्यात यंदा ४२ कोटींची वाढ झाली असून उत्पन्न ५९५ कोटींवर गेले आहे. मात्र, अशाच प्रकारे पुढेही उत्पन्न मिळत राहील, अशी शक्यता अधिकाऱ्यांना अजिबात वाटत नाही. सध्याची एकूण परिस्थिती पाहता, यंदा मार्च अखेपर्यंत सुमारे ७५० कोटी रुपये इतके उत्पन्न महापालिकेला मिळेल, अशी शक्यता आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात जकात विभागासाठी चालू आर्थिक वर्षांसाठी ८८५ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याचा विचार करता यंदा उत्पन्न १२५ ते १३५ कोटींनी कमी होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

गरिबांवर बुलडोझर नगरसेवकाला अभय?
नागरीहक्क सुरक्षा समितीचा पिंपरी पालिका प्रशासनाला खडा सवाल

पिंपरी ८, डिसेंबर/ प्रतिनिधी

फुगेवाडीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरदास गायकवाड यांनी आरक्षित जागेवर अतिक्रमण केले असताना ते पाडायला पालिका प्रशासन न्यायालयाच्या ऑर्डरची वाट पाहते, मात्र गोरगरिबांची बांधकामे,झोपडय़ा पाडताना बिनदिक्कतपणे बुलडोझर लावते हे आम्ही चालू देणार नाही,असा खणखणीत इशारा नागरीहक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी दिला आहे. समिताच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आयोजित जनजागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.दै.लोकसत्ताने हे प्रकरण उचलून धरल्याबद्दल कांबळे यांनी विषेश उल्लेख केला. नगरसेवकाच्या अतिक्रमणाला अभय देणाऱ्या पालिका प्रशासनावरही त्यांनी जोरदार टीका केली.ते म्हणाले,हे अनधिकृत बांधकाम पाडले जाऊ नये यासाठी प्रशासनने नगरसेवकाला पूर्णपणे साथ दिली. उच्च व सव्र्वोच्च न्यायालयाचीही पालिकेने दिशाभूल केली.

‘सत्यम’मधील कर्मचारी चिंतेत
पुणे, ८ जानेवारी/ प्रतिनिधी

सत्यम कॉम्प्युटर्स या देशातील चौथ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीचा फुगा कंपनीचे अध्यक्ष रामलिंग राजू यांनी काल फोडला. त्याचे पडसाद आज सत्यम कॉम्य्युटर्सच्या पुण्यातील विकास केंद्रावर पडलेले दिसून आले. कंपनीच्या पुणे केंद्रातील कामकाज आज नेहमीप्रमाणे चालू होते. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीसारखा उत्साह दिसत नव्हता. कर्मचारी बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या केंद्रातील काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी ‘नो कॉम्टेन्स’ हा शब्द वारंवार उच्चारला. अनेकांनी कंपनीच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली. काहींनी कंपनी लवकरात लवकर बदण्याचा विचार असल्याचेही बोलून दाखविले. देशातील सर्वात मोठय़ा आर्थिक घोटाळ्याने अडचणीत सापडलेल्या या कंपनीतील सुमारे अडीच हजार कर्मचारी पुण्यातील हिंजवडी, शिवाजीनगर आणि बोटक्लब रस्त्यावरील विकास केंद्रात काम करतात. या कर्मचाऱ्यांनी आपले आजचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु केले. मात्र, सवार्ंमध्ये कंपनीचे पुढे काय होणार याचीच चर्चा प्रामुख्याने होती. सत्यम कॉम्प्युटर्सच्या पुणे केंद्रांवर मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही कंपनीत प्रवेश दिला जात नव्हता.

पंचांग, राशी भविष्य, सूर्यग्रहणाबरोबरच आता उपयुक्त माहितीचाही खजिना
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

पंचांग, राशी भविष्य, सूर्यग्रहण, आहार या माहितीबरोबरच गिरिप्रेमींसाठी माहिती, किल्ले, लहान मुलांना चित्राद्वारे प्राणी, वनस्पती, करिअर मार्गदर्शन, मोबाईलची माहिती, व्यायामाचे महत्त्व, योगासनांची माहिती अशा गोष्टींनी यंदा नवीन वर्षांच्या दिनदíशकेत जागा मिळविली आहे. २००९ या वर्षांच्या दिनदर्शिका खरेदी करताना ग्राहकांचा चोखंदळपणा दिसत आहे. यंदा ‘भास्कर दर्शन’ या दिनदर्शिकेमध्ये छायाचित्रांतून किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे. तर, ‘प्रतिसंगदेव’ दिनदर्शिकेत लहान मुलांसाठी फळे, वन्य प्राण्यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. यामध्ये बारा फळांची, झाडांची व फळांच्या बियापासून बनणारे पदार्थ, प्राण्यांची चित्रे अशी वैशिष्टय़पूर्ण माहिती दिली आहे सूर्यग्रहण, आहार, पंचांग, राशी भविष्य हे प्रत्येक वर्षी असते, परंतु यंदा मोबाईलची माहिती, परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी व वाढत्या वयात कोणता आहार घ्यावा, रेल्वे व बसचे वेळापत्रक, करिअर मार्गदर्शन, प्रवासाला निघताना कोणती काळजी घ्यावी, महिलांसाठी कलाकुसर, व्यायामाचे महत्त्व, पाककला, अशा अनेक गोष्टींचा समावेश महालक्ष्मी, कालनिर्णय, कालदर्शन आदी विविध दिनदर्शिकांमध्ये आहे.

गाबडीचा पाऊस’ बरोबरच ‘गंध’ ही दरवळणार!
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

पुण्यात सुरू झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत ‘गाबडीचा पाऊस’, ‘गंध’ आदी मराठी चित्रपट पाहण्याची सुसंधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. ‘गाबडीचा पाऊस’ (किंवा 'गाभ्री'चा पाऊस) ही ‘पॅसिफिक एन्टरटेन्मेंट’ची निर्मिती असून, त्यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांच्या सध्याच्या हलाखीचे जिवंत चित्रण करण्यात आले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्याचा बहुचर्चित प्रश्न आहे. संपूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या शेतीच्या समस्या किती बिकट असतात व त्यावर अवलंबून असलेले शेतकरी कुटुंब त्यामध्ये कसे होरपळून निघते, याची विदारक कहाणी या चित्रपटात पाहावयास मिळते. किसन हा शेतकरी, त्याची आई, बायको व सहा वर्षांचा त्याचा मुलगा या चौकोनी कुटुंबाची कथा ‘पावसा’भोवती फिरते. वास्तविक गाबडीचा (किंवा गाबडय़ा) ही एक शिवी आहे व ती येथे पावसाला उद्देशून दिलेली आहे. कारण विदर्भातील पाऊस हा त्याच्या ‘लहरी’पणाबद्दल प्रसिद्ध आहे. त्याचा हा ‘लहरी’पणा शेतकऱ्यांचे जीवन कसे उद्ध्वस्त करतो व आत्महत्येची वेळ कशी आणतो याची ही संघर्षपूर्ण कथा आहे. सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष या प्रमुख कलाकारांनी कथेतील पात्रे जिवंत केली आहेत.

तलवारीचे वार करून लुटणाऱ्या तरुणांना काही तासांतच अटक
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

रामटेकडी येथे एका घरमालकावर तलवारीचे वार करून लुटीचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांपैकी एकाला पकडण्यात नागरिकांना बुधवारी मध्यरात्री यश आले. तर उर्वरित दोघांना पोलिसांनी आज पकडले. यातील दोन आरोपी नुकतेच तुरुंगातून सुटून आलेले आहेत.
राजेंद्र चौहान (वय २७, रा. रामनगर झोपडपट्टी, रामटेकडी) यांनी या प्रकाराबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात जुबेर सलीम शेख (वय २४, रा. वैदूवाडी, हडपसर), प्रकाश कुँवर (वय २४) आणि आक्कू अकबर शेख यांना अटक करण्यात आली आहे. चौहान व त्यांचे काही नातेवाईक बुधवारी रात्री घरात गप्पा मारत बसलेले असताना तिघे आरोपी त्यांच्या घरात लुटीसाठी घुसले.
तिघांनी घरातील सर्वाना तलवारीचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरुवात केली आणि घरातील रोख पंधरा हजार रुपये व एक मोबाईल असा ऐवज घेऊन पळू लागले.या पळापळीत जुबेर शेख खाली पडला. तो खाली पडताच घरातील व आजुबाजूच्या नागरिकांनी धाडस दाखवले आणि तलवारधारी शेख याला शिताफीने पकडले.
मात्र, तोवर इतर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. नागरिकांनी शेख याला लगेचच पोलिसांच्या ताब्यात दिले. शेख याच्याकडील चौकशीनंतर पोलिसांनी आज उर्वरित दोघांना तातडीने अटक केली.

वैदिक विज्ञानदिनी परिसंवाद
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

इन्स्टिटय़ूट ऑफ एशियंट इंडियन नॉलेज सिस्टीमतर्फे ११ जानेवारी हा दिवस वैदिक विज्ञानदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने १० व ११ जानेवारी रोजी ‘प्राचीन भारतीय वाङ्मयातील वैज्ञानिक संशोधनाच्या संधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्राचीन भारतीय वेद, उपनिषदे या विषयांवर आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचारमंथन करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात बनारस विद्यापीठाचे डॉ. एन. जी. डोंगरे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे डॉ. बी. डी. कुलकर्णी, इस्रोचे निवृत्त संचालक डॉ. प्रमोद काळे, एमआयटीचे संचालक डॉ. विश्वनाथ कराड सहभागी होणार आहेत. भारतीय प्राचीन वैदिक वाङ्मयावर परदेशात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे. तुलनेने भारतात त्याचे प्रमाण कमी आहे.या विषयावर संशोधन करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या सर्व संशोधकांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने दरवर्षी ११ जानेवारी हा दिवस वैदिक विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यासाठी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ०२०-२५४४५४५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

वैभवी रेळे यांना शौर्य पुरस्कार
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

पुण्यातील चित्रपट व माहितीपट निर्माती वैभवी रेळे यांना ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला धैर्याने तोंड देऊन इतरांना मदत केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगरच्या वतीने कर्नल ललित राय यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी दीपक शिकारपूर यांनी दोघांची मुलाखत घेतली. त्यावेळी वैभवी रेळे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या चर्चेच्या वेळी भारतातील उच्च संस्कृती व शांतीबद्दल परदेशी लोकांकडून कौतुकाचा वर्षांव होत असतानाच रात्री साडेदहाच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील लाउंजमध्ये काही फटाके वाजल्याचा भास झाला. एखादा विवाह समारंभ असेल अशी कल्पना मनात आली. तेवढय़ात पाच-सहा लोक ओरडत आले की बाहेर अतिरेकी फायरिंग करीत आहेत. बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकून काही लोक घाबरून सैरावैरा धावू लागले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दार व दिवे बंद करून घेतले. सारखे स्फोटांचे आवाज येत असल्याने मनातील भीती वाढत चालली होती. घरच्यांची आठवण आल्याने घरी फोन करून परिस्थिती सांगितली. मदतीसाठी दुसऱ्याला मोबाईल दिला. पहाटे चार वाजता हॉटेलमधील प्रचंड आग, पाण्याचे फवारे आणि छत पडण्याची भीती यामुळे आपण आता वाचू शकणार नाही, अशी भीती वाटली. पहाटे सव्वाचार वाजता अग्निशामक दलाच्या जवानांनी हातोडीने हॉटेलचे काचेचे दार फोडून आम्हा सर्वाना शिडीने खाली उतरवून आमची सुटका केली. अग्निशामक दल, मुंबई पोलीस कमांडो यांनी जीव धोक्यात घालून केलेल्या मदतीबद्दल रेळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.सुरक्षितता आणि अतिरेकी हल्ले याबाबत कर्नल ललित राय म्हणाले की, परकीय लोक अतिरेक्यांच्या मदतीने आमच्या घरावर हल्ला करतात हे दुख मोठे आहे. अशा प्रसंगी लोकांनी घाबरून जाऊ नये आणि मतभेद विसरून एकत्रितपणे काम करावे. चलता है, ही वृत्ती सोडून द्यावी. या वेळी शुभांगी वाळवेकर व मिलिंद पालकर यांची भाषणे झाली. या वेळी रोटरीचे अध्यक्ष किरण वाळिंबे यांनी सर्वाचे स्वागत केले.

प्रकल्प व्यवस्थापन विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पुणे, ८ जानेवारी / प्रतिनिधी

प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटच्या पुणे विभागातर्फे ११ व १८ जानेवारी रोजी ‘प्रकल्प व्यवस्थापन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष गिरीश केळकर यांनी आज ही माहिती दिली. केळकर म्हणाले की, ११ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच संशोधनात रस असणाऱ्या अभ्यासकांकरिता मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. जनवाणीचे व्यवस्थापक रणजित गाडगीळ, डॉ. एस. बी. कोलते, डॉ. चंद्रशेखर चितळे, वाडिया महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. संतोष दास्ताने, डॉ. अभय कुलकर्णी यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. कोथरूड येथील भारती विद्यापीठात हे सत्र होणार आहे. १८ जानेवारीला ली मेरिडियन येथे व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी खास सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.