Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९
राज्य

विकासाच्या महामार्गावर समस्यांचे ‘स्पीडब्रेकर’!
ना शिक-धुळे आणि नाशिक-मुंबई दरम्यान महामार्ग विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच, नाशिक जिल्ह्य़ाच्या विकासाच्या मार्गात मात्र अनेक ‘स्पीडब्रेकर’ आहेत. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणाचा गवगवा होत असला तरी प्रत्यक्षात तिसऱ्या कोनाला अर्थात नाशिक जिल्ह्य़ाला अनेक समस्यांनी घेरले आहे. यापैकी काही समस्या कित्येक वर्षांपासून कायम आहेत, तर काही नव्याने निर्माण झाल्या आहेत. मॉल्सचा चकचकाट व प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे नाशिक शहराच्या विकासाचे आभासात्मक रूप दिसते. यावरून जिल्ह्य़ाच्या विकासाचा अंदाज बांधण्याचा कुणी प्रयत्न केल्यास फसगत होईल. जागतिक मंदी, तसेच संघटनांमधील वादामुळे नाशिकचे औद्योगिक क्षेत्र निस्तेज होऊ लागले आहे. नव्या जिल्ह्य़ाची स्वप्ने पाहणाऱ्या मालेगावात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पायाभरणीसाठी चुकीची जागा निवडल्याने आता शहराच्या पूर्व भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

एस.टी. फायद्यात, कामगार तोटय़ात
ठाणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

अपुरी आणि अकार्यक्षम वाहने, पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव आणि खासगी प्रवासी वाहतुकीचे संकट असूनही गेल्या आर्थिक वर्षांत एस.टी. महामंडळास १५३ कोटी रुपयांचा नफा झाला असून, तो मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कामगारांच्या वेतनवाढीबाबत मात्र प्रशासनाची उदासीनतेची भूमिका कायम असून, याबाबत एकजुटीने लढा द्यावा लागेल, असे मत महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशनचे कार्याध्यक्ष किसन सैद यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. एस.टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या आठ वर्षांंत कोणताही वेतन करार झालेला नाही. परिणामी सध्या समकक्ष निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एस.टी. कर्मचाऱ्यांना ३६ टक्के कमी वेतनावर काम करावे लागते. सध्या १५ हजार ८२० गाडय़ांमधून दररोज सरासरी ६३ लाख १६ हजार प्रवासी प्रवास करतात.

कर्जतचे शेतकरी हरी फुलवरे यांच्या चित्रकृती
प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

श्रीराम पुरोहित
कर्जत, ८ जानेवारी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या बीड या अगदी लहानशा गावात वास्तव्य करणारे आणि शेती हाच मुख्य व्यवसाय असलेले एक हरहुन्नरी कलाकार हरी फुलवरे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन मुंबईतील ‘आर्ट प्लाझा’ गॅलरीमध्ये सोमवार, ५ जानेवारीपासून आयोजिण्यात आले आहे. चित्रकलेची दैवी देणगी असलेल्या हरी फुलवरे यांचे लौकिक शिक्षण हे जेमतेम इयत्ता सातवीपर्यंतच पूर्ण झालेले आहे. स्वाभाविकच चित्रकलेसंबंधीचे कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षणही त्यांनी घेतलेले नाही. मात्र शेती व्यवसायाच्या निमित्ताने सदैव निसर्गाच्याच सान्निध्यात रममाण होणाऱ्या ३५ वर्षे वयाच्या या कलाकाराला चित्रकलेच्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अलौकिक अशी प्रतिभा जन्मत:च प्राप्त झालेली आहे.

दापोलीत रेडिएशन सुविधा केंद्र उभारणार - शरद पवार
राजगोपाल मयेकर
दापोली, ८ जानेवारी

बारमाही कच्चा माल नसल्याने कोकणात प्रक्रिया उद्योग उभारणीला मर्यादा आहेत, मात्र आंब्यासारखी निर्यातक्षम फळे मोठय़ा प्रमाणात निर्यात होण्यासाठी लासलगावप्रमाणे दापोलीत रेडिएशन सुविधा केंद्र तातडीने उभारण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत येथे दिले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या राज्यस्तरीय ‘पालवी’ कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री सुनील तटकरे, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे डॉ. विजयराव कोलते, आमदार सूर्यकांत दळवी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय मेहता आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘सहवीजनिर्मिती प्रकल्पांना राज्यात वीज विकण्यास मुभा’
पुणे, ८ जानेवारी/खास प्रतिनिधी

सहकारी साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांत निर्माण होणारी पन्नास टक्के वीज ही ‘महावीज’ कंपनीला देण्याची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असून, या प्रकल्पांतील वीज राज्यात कोठेही विकण्यास मुभा देण्यात येणार आहे. या प्रकल्पांद्वारे डिसेंबरअखेर ५६२ मेगावॉट वीज उपलब्ध होणार आहे.
राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘फिशपाँड’ दिल्याबद्दल युवकाला बेदम मारहाण
पुणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी
स्नेहसंमेलनात एका मुलीला ‘फिशपाँड’ दिल्याचा राग धरून सात तरुणांनी एका विद्यार्थ्यांला बेदम मारहाण करण्याची घटना चिंचवड येथील फत्तेचंद जैन महाविद्यालयात घडली. या वेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. चिंचवड येथील फत्तेचंद जैन महाविद्यालयात बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

ठाण्यात महिलेची हत्या करून पाच लाखांची लूट
ठाणे, ८ जानेवारी/प्रतिनिधी

घरात एकटी असल्याचे पाहून घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमधील एका महिलेची निर्घृण हत्या करून अज्ञात दरोडेखोरांनी चार लाख ७० हजारांचा ऐवज पळविला. उच्चभ्रू राहात असलेल्या ब्लु मिनडेल इमारतीच्या नवव्या मजल्यावर ही घडली असून, याप्रकरणी प्लंबरचे काम करणाऱ्या तिघांचा पोलीस कसून तपास करीत आहेत.
९०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या शारदा ओमप्रकाश शर्मा (५९) यांची नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून व त्यांच्या डोक्यात गणपतीची मूर्ती घालून हत्या करण्यात आली. ही घटना दुपारी १ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलगा आशीष हा अमेरिकेत, तर अर्पिता, अनाषिका आणि अर्चना या तीन मुली सासरी गेल्यानंतर ओमप्रकाश शर्मा हे सपत्निक हिरानंदानी इस्टेटमध्ये राहत होते. काल दुपारी शर्मा कामानिमित्त नेरुळला गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. दिवसभर मोबाइलवर संपर्क होऊ न शकल्याने अस्वस्थ झालेल्या शर्मा यांनी रात्री ९ वाजता घर गाठले. दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद न लाभल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पत्नी आढळली. कपाटातील सोन्याचे दागिने आणि २५ हजार रोकड असा एकूण चार लाख ७० हजारांचा ऐवजही गायब होता. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

शासकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की; राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यास अटक
भिवंडी, ८ जानेवारी/वार्ताहर

तहसीलदारांच्या आदेशाने मीठपाडा येथे महसूल वसुलीसाठी मंडळ अधिकारी व तलाठी गेले असता, त्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यास निजामपूरा पोलिसांनी गजाआड केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठपाडा येथील गाळा क्र. ९ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने नेते व विधान परिषदेचे सभापती वसंत डावखरे यांचे निकटवर्तीय विष्णू बंडू डावखरे यांच्याकडे अकृषिक दंडाची रक्कम वसुलीसाठी खारबाव मंडळ अधिकारी लाटे, तलाठी सजा खोणीचे जाधव, खारबावचे एस. आर. जाधव, पुरुषोत्तम केणे गेले होते. अधिकारी कर्मचाऱ्यांना अकृषिक रक्कम देण्याऐवजी उलट त्यांना धक्काबुक्की करून त्यांना हुसकावून लावल्याप्रकरणी तहसीलदार रुपाली भालके यांच्या आदेशाने निजामपुरा पोलीस ठाण्यात डावखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री उशिरा विष्णू बंडू डावखरे यांना अटक केल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

गॅस पुरवठय़ाअभावी उरण येथील वीजनिर्मिती ठप्प
उरण, ८ जानेवारी/वार्ताहर

उरण येथील वायुविद्युत केंद्राचा गॅसपुरवठा बंद झाल्याने वीजनिर्मिती पूर्णत: ठप्प झाली आहे. दररोज ६७५ मेगाव्ॉट होणारी वीजनिर्मिती बंद झाल्याने राज्याच्या भारनियमनामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उरण बोकडवीरा वायुविद्युत केंद्राची वीजनिर्मितीची क्षमता ८५२ मेगाव्ॉटची आहे, मात्र प्रकल्पाच्या नऊ संचांपैकी वीजनिर्मितीचे चार संच याआधीच योग्य प्रमाणात ओएनजीसीकडून गॅसपुरवठा होत नसल्याने भंगारात निघाले आहेत. उरलेल्या पाच संचांमार्फत बुधवापर्यंत ६७५ मेगाव्ॉट विजेची निर्मिती केली जात होती, मात्र गुरुवारी सकाळी पावणेबारा वाजल्यापासून ओएनजीसीकडून गॅसपुरवठा पूर्णत: बंद झाल्याने वीजनिर्मितीचा प्रकल्प बंद पडल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एन. खोकले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

डॉक्टर महिलेवरील हल्ल्याचे गूढ कायम
कल्याण, ८ जानेवारी/वार्ताहर

डॉ. मृणाली लोखंडे यांच्यावर काल झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी दोन रखवालदार व सोसायटीतील रहिवाशांनी बबन धावडे व मनोज चव्हाण या दोघांना पकडून दिले असले, तरी महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना या मारहाणीचे खरे रहस्य मात्र अद्याप उलगडता आले नाही.
पोलिसांच्या ताब्यातील आरोपींशी डॉ. लोखंडे यांची ओळख होती. तपासात आरोपीने आपल्या पत्नीला त्रास दिल्याने आपण हे कृत्य केल्याचे सांगितले, मात्र त्यांना झालेली अमानुष मारहाण पाहता, हे कारण संयुक्तिक वाटत नसल्याचे पोलीस निरीक्षक घुले यांनी सांगितले.शिवसेना शहरप्रमुख विजय साळवी यांनी या घटनेचे वृत्त समजताच रुग्णालयात जाऊन डॉ. लोखंडे यांची भेट घेतली.
त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्या डोक्यावर व शरीरावर साडेतीनशे टाके घालण्यात आले आहेत. हातोडय़ाने झालेल्या मारहाणीत त्यांची करंगळी तुटली आहे. टाके घालण्यासाठी चार तास डॉक्टर झटत होते.

अर्भकाची छुप्यारीतीने विल्हेवाट लावण्याप्रकरणी डॉक्टरला सक्तमजुरी
पालघर, ८ जानेवारी/वार्ताहर : पालघरमधील ‘वैशाली नर्सिग होम’चे डॉक्टर श्रीकांत बुद्धे व कंपाऊंडर प्रकाश राऊत या दोघांना बेकायदेशीर गर्भपात करून अर्भक कचरा कुंडीत फेकून अर्भकाची छुप्यारीतीने विल्हेवाट लावण्याप्रकरणी पालघर न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची, तसेच अनुक्रमे पाच व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. १ जून रोजी घडलेल्या या गुन्'ाासंदर्भात अलीकडे पालघर न्यायालयात सुनावणी होऊन न्या. एस.जी. अग्रवाल यांनी ५ जानेवारी रोजी हा निकाल दिला.
कचेरीकडून बिटकोकडे जाणाऱ्या रस्त्यावर डॉ. बुधे यांचे नर्सिग होम असून, त्यांच्या नर्सिग होमसमोरील कचरा कुंडीत अर्भक आढळून आल्याची खबर मिळाल्यानंतर पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळी पोचले. त्यांनी पंचनामा व पुढील तपास केल्यानंतर डॉ. बुद्धे यांचा या प्रकरणात हात असल्याचे आढळून आले. त्यानुसार डॉक्टर व कंपाऊंडर अशा दोघांविरोधात पालघर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला. हे अर्भक २४ ते २६ आठवडय़ाचे असावे, असा अभिप्राय पोस्टमॉर्टेमनंतर डॉक्टरांनी दिला होता. यातून गर्भपाताचा हा प्रकार असावा, असा संशयही व्यक्त करण्यात आला. कचराकुंडीत टाकलेले हे अर्भक झाकण्यासाठी डॉक्टर व कंपाऊंडर हे दोघेही अर्भकावर कचरा टाकत असल्याचे प्रत्यक्षदर्शीं पाहिले होते. न्यायालयाने याबाबतीत ठोस पुरावे असल्याचे स्पष्ट करत दोघांनाही उपरोक्त शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारच्या वतीने अॅड. पी.एच. पटेल यांनी काम पाहिले.

८० लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
चिपळूण, ८ जानेवारी/वार्ताहर

मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि रोजगार मंत्रालयाकडून साडेसात हजार कोटी रुपयांची शिष्यवृत्ती योजनेची गुंतवणूक केली आहे. या योजनेतून देशभरातील सुमारे ८० लाख विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेव्यतिरिक्त सरकारने अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने २००८-०९ या शैक्षणिक वर्षांत ६०० कोटी रुपयांची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. याचा लाभ येत्या पाच वर्षांंत ११ लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी १५१५ कोटी रुपयांची राष्ट्रीय प्रोत्साहन योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेत ५२ लाख मुलींना लाभ मिळणार आहे, तसेच राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप योजनेंतर्गत २०३ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती एमफील आणि पीएचडी करणाऱ्या ५ हजार ३३२ विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.