Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९
क्रीडा

एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघातून हेडनला नारळ!
मेलबर्न, ८ जानेवारी/ पीटीआय

बॅडपॅचच्या चक्रव्युहात सापडलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कॉमनवेल्थ बॅंक एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०मालिकेसाठी १३ सदस्यीय संघातून नारळ देण्याचा निर्णेय आज ऑस्ट्रेलियन निवड समितीने घेतला आहे. या वर्षांच्या शेवटी होणारा ट्वेंन्टी-२० विश्वचषक आणि २०११ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघ निवड केली असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष अ‍ॅन्र्डय़ू हिल्डिच यांनी स्पष्ट केले आहे. आगामी ट्वेन्टी-२०मालिका आणि २०११ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ‘के.एफ.सी. ट्वेन्टी-२०’ आणि ‘कॉमनवेल्थ बॅंक एकदिवसीय मालिके’साठी संघ निवडण्यात आले आहेत.

नेतृत्व स्ट्रॉसकडे
लंडन, ८ जानेवारी / पीटीआय

केव्हिन पिटरसन आणि प्रशिक्षक पीटर मुर्स यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये कालच अचानक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आता सलामीचा डावखुरा फलंदाज अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस इंग्लंडचे कर्णधारपद भूषवण्यास सज्ज झाला आहे. निवड समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची जाहीरपणे वाच्यता केल्यामुळे पिटरसन व मुर्स यांना इंग्लंड बोर्डाने फटकारले होते. त्यामुळे या दोघांनीही काल त्यांचे राजीनामे जाहीर केले होते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांचे राजीनामे स्वीकारल्याचे वृत्त आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत काही मुद्यांवरून झालेल्या मतभेदांमुळेच कर्णधार व प्रशिक्षकाला राजीनामा देण्याची टोकाची भूमिका घ्यावी लागली, असे ‘स्काय स्पोर्ट्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

सोमदेवकडून मोया चकित चेन्नई ओपन टेनिस
चेन्नई, ८ जानेवारी / पीटीआय

सोमदेव देववर्मनने कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय नोंदवताना आज चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत माजी फ्रेंच ओपन विजेत्या कालरेस मोयाचा ४-६, ७-५, ६-४ गुणांनी पराभव केला. या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या सोमदेवची आता उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या इव्हो कालरेव्हिकशी गाठ पडणार आहे. २ तास ११ मिनिटे चाललेल्या या लढतीत मोयाने पहिला सेट ६-४ नेजिंकत १-०ची आघाडी मिळवली.

महाराष्ट्राच्या मुलींची सुवर्णभरारी!
राष्ट्रीय नेमबाजी

मुंबई, ८ जानेवारी / क्री. प्र.

केरळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २२ स्पोर्ट्स रायफल प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदकाची कमाई केली. रुचिरा लावंड (५८१), प्रीयल केणी (५७६) व तेजस्विनी मुळे (५७२) या तिघींनी एकूण १७२९ गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. एकेरीत मात्र रुचिरा लावंडला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या लज्जा गोस्वामीने ५८२ गुणांसह आपले सुवर्णपदक निश्चित केले.

वाघ, चव्हाण, कालेकर तिसऱ्या फेरीत
राज्य कुस्ती स्पर्धा

मिलिंद ढमढेरे
कडेगाव, ८ जानेवारी

अहमदनगरचा सारंग वाघ, मुंबई शहर संघाचा अरुण चव्हाण व पुणे शहर संघाचा खंडू कालेकर यांनी महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धेत आज तिसरी फेरी गाठली. मात्र पुढच्या लढतीत खंडू कालेकरचा प्रकाश काळे याने पराभव केला.बयाबाई कन्या महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून या स्पर्धेस प्रारंभ झाला. गादी विभागातील ६६ किलो गटात मुंबईच्या अरुण चव्हाण याने रायगडच्या भारत पाटील याच्यावर निर्णायक विजय नोंदविला.

क्लार्कची गरुडभरारी
दुबई, ८ जानेवारी/पीटीआय

भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने आयसीसी क्रिकेट क्रमवारीतील कसोटी फलंदाजांच्या यादीतील १०वे स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्कने आपल्या कारकीर्दीत प्रथमच गरुडभरारी घेत अव्वल पाचजणांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. अव्वल २० जणांच्या यादीत गंभीरपाठोपाठ वीरेंद्र सेहवागने एक स्थानाने प्रगती करीत १२ वे, तर सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी अनुक्रमे १६वे आणि १८वे स्थान मिळविले आहे. २७ वर्षीय क्लार्कने चार स्थानांनी पुढे झेपावत पाचवे स्थान काबीज केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीत क्लार्कने अनुक्रमे १३८ आणि ४१ धावा काढताना ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमला आणि सायमल कॅटिच यांनी कारकीर्दीत प्रथमच चांगली मजल मारताना अव्वल २० जणांमध्ये स्थान मिळविले आहे. अमलाने दोन अर्धशतकाच्या साह्याने १९ वे स्थान मिळविले, तर कॅटिचने वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेलच्या साथीने २०व्या स्थानावर संयुक्तपणे दावा केला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग यांना मात्र आपले स्थान टिकविण्यात अपयश आले आहे. स्मिथची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो नवव्या स्थानावर आहे. सिडनी कसोटीत दुखापतीची पर्वा न करता स्मिथने ११व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरून नेटाने लढा दिला. स्थानावर आहे.

अंतिम फेरीसाठी मुंबईचा संघ कायम
मुंबई, ८ जानेवारी/ क्री.प्र.

चेन्नई येथे झालेल्या उपान्त्य फेरीत सौराष्ट्रला त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देणाऱ्या मुंबईच्या १५ सदस्यीय संघात अंतिम फेरीसाठी कोणताही बदल पद्माकर शिवलकर यांच्या निवड समितीने केलेला नाही. हैदराबाद येथे १२ ते १६ जानेवारी दरम्यान मुंबईचा अंतिम फेरीतील सामना उत्तर प्रदेशविरूद्ध होणार आहे.
मुंबईच्या संघाचे नेतृत्व वसीम जाफर करणार असून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेगवान गोलंदाज झहीर खान हेसुद्धा या सामन्यात खेळणार आहेत, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव हेमंत वायंगणकर यांनी सांगितले.
मुंबईचा संघ पुढीलप्रमाणे : वसीम जाफर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, झहीर खान, रोहित शर्मा, रमेश पोवार, साईराज बहुतुले, विनायक सामंत (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, उस्मान माळवी, साहील कुकरेजा आणि अंकित चव्हाण. प्रशिक्षक : प्रवीण अमरे.

कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार -जाफर
नवी दिल्ली, ८ जानेवारी/ पीटीआय

रणजी करंडकातील सौराष्ट्रविरूद्धच्या उपान्त्य फेरीतील सामन्यात त्रिशक झळकाविल्यानंतर मुंबईचा कर्णधार वसीम जाफरचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करायला तयार असल्याचे त्याने आज सांगितले. वीरू आणि गंभीर या दोघांनी सध्यातरी सलामीवीरीची जबाबदारी योग्यरीत्या पेललेली दिसतेय. पण माझा सलामीच्या स्थानासाठी अट्टाहास नसून मी कोणत्याही स्थानावर खेळायला तयार आहे. सलामीवीर हा कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे मला कोणतीही अडचण येणार नाही, असेही जाफरने सांगितले.

सायना नेहवाल उपान्त्यपूर्व फेरीत
मलेशियन सुपर सिरीज बॅडमिंटन
क्वालालम्पूर ८ जानेवारी / पीटीआय

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने चायनिज तायपेईच्या हसिओ ह्य़ुन चेनचा पराभव करीत मलेशियन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत दहाव्या स्थानावरील सायनाने चेनची झुंज २१-१६, १९-२१, २१-१९ गुणांनी मोडून काढली. उपांत्यपूर्व फेरीत सायनाला फ्रान्सच्या होन्जियन पीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सायनाने पहिल्या गेममध्ये प्रतिस्पर्धी चेनला कुठलीच संधी न देता २१-१६ गुणांनी गेमजिंकला. १-०ने पिछाडीवर पडल्यानंतर चेनने दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत २१-१९ गुणांनी गेमजिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये चेनने सुरुवातीला १२-९ गुणांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर सायनाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताच्या प्रस्तावावर न्यूझीलंडचा निर्णय आठवडय़ाअखेर
मुंबई, ८ जानेवारी/क्री.प्र.

मार्च-एप्रिल महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून, आणखी एक कसोटी सामना खेळण्याच्या भारताच्या विनंतीबाबतचा निर्णय न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आठवडय़ाअखेर घेण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आणखी एका कसोटीचा प्रस्ताव मिळाला असून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डापुढे तो विचाराधीन आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चालू आठवडय़ाअखेपर्यंत निर्णय अपेक्षित आहे, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले. याआधी निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, भारत वेलिंग्टन येथे ६ मार्चला एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे .

सानिया, झेंग यांना पराभवाचा धक्का
हाँगकाँग, ८ जानेवारी / पीटीआय

मनगटाच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणारी भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला आज वर्ल्ड टीम चॅलेंज स्पर्धेत रशियाच्या अ‍ॅना चॅकेवेतात्झविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सानियाने शर्थीची झुंज दिली पण, जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावर असलेल्या चॅकेवेतात्झने तिचा ६-४, ६-४ गुणांनी पराभव केला. त्याआधी रशियाच्या वेरा झ्वोनारेव्हाने चीनची झेंग झीचा ७-६(३), ६-४ गुणांनी पराभव करत रशियाला १-०ची आघाडी मिळवून दिली होती.

रणजीपटू व पंचांना मुंबई
क्रिकेट असो.चे निमंत्रण

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे पूर्व येथील वांद्रे-कुर्ला संकुलातील वास्तूमधील रिक्रीएशन सेंटरचे उद्या (९ जानेवारी) सायंकाळी ६-३० वाजता उद्घाटन होणार आहे. या समारंभाची निमंत्रणे मुंबईच्या सर्व रणजीपटू आणि पंचमंडळातील सदस्यांपर्यंत पोहोचली नाहीत. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सर्व रणजीपटू व पंचांना निमंत्रित करण्यात आले आहे.