Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९

ठाणे प्लॅटफॉर्म क्र. फ १०
सब कुछ फर्स्ट क्लास

ठाणे/प्रतिनिधी : ठाणे-नेरूळ-पनवेल या उपनगरीय रेल्वेसेवेचा उद्या प्रारंभ होत आहे. या मार्गावरील पहिल्या उपनगरीय गाडीला दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री अशोक चव्हाण हिरवा झेंडा दाखविणार असून, या सोहळ्याची ठाणे स्थानकात जय्यत तयारी सुरू आहे.एरवी ठाणे स्टेशनमधील इतर प्लॅटफॉर्मचा विचार करता काहीशा शांत असणाऱ्या प्लॅटफॉर्म १० वर तसेच स्टेशनच्या पूर्वेला सरकारी यंत्रणांची एकच लगबग दिसून येत होती. ज्या प्लॅटफॉर्मवरून नेरूळ लोकल सुटणार त्या प्लॅटफॉर्म क्र. १० चे सुशोभीकरण करण्यात आले आहे. रंगरंगोटी, स्वच्छता, इंडिकेटर सर्व काही ठीकठाक करण्याचे काम सुरू होते. काल रात्री अचानक सुरक्षा यंत्रणांनी व्यासपीठाची जागा बदलण्याची सूचना केल्यामुळे आज सकाळपासूनच व्यासपीठ, सभामंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

..आणि ठाणे-पनवेलचा कोंबडाही आरवला
जयेश सामंत

ठाणे-नेरुळ रेल्वेसेवेसोबत ठाणे-पनवेल लोकलला हिरवा कंदील दाखवून प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या मध्य रेल्वेने काहीशा घाईघाईतच या नव्या मार्गाच्या शुभारंभाचा मुहूर्त गाठून अगदी तोंडावर आलेल्या निवडणूक आचारसंहितेचा मुहूर्त मात्र चलाखीने टाळल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील आणि पाठोपाठ आचारसंहितेचा बडगा लागू होईल, अशी भीती रेल्वे अधिकाऱ्यांनाही वाटू लागली होती. त्यामुळे ठाणे-नेरुळ रेल्वेसेवेच्या शुभारंभाच्या मांडवात ठाणे-पनवेलचे कार्यही उरकून घ्यावे, या विचारानेच या दोन्ही मार्गांचा मुहूर्त रेल्वेने एकाच वेळी निश्चित केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विशेष म्हणजे ठाणे-नेरुळपेक्षाही काहीसा ‘हॉट रूट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे-पनवेल मार्गावर आचारसंहितेपूर्वी जादा फेऱ्या सोडण्याचा विचारही मध्य रेल्वेतील तज्ज्ञ मंडळी करू लागली आहेत.

दोषी पालिका अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल दडपण्याचा प्रयत्न
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली पालिकेतील शहर अभियंता पी.के. उगले, सहाय्यक आयुक्त श्रीधर थल्ला, अनिल लाड, उपअभियंता राजेश मोरे, प्रमोद मोरे आणि नुकतेच निलंबित केलेले प्रभाग अधिकारी प्रभाकर जगदाळे यांना पालिकेतील चौकशी अधिकारी, निवृत्त शासकीय सचिव पटवर्धन समितीने दोषी ठरविले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे अहवाल महासभेसमोर ठेवण्यास प्रशासन टाळाटाळ करून अनधिकृत बांधकामांना अप्रत्यक्षरीत्या पाठीशी घालत आहे.

नाशिककडे जाणाऱ्या गाडय़ांसाठी कल्याण स्थानकात स्वतंत्र फलाट
भगवान मंडलिक

कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोन व तीनचा विस्तार करून तो २४ डब्यांचा करण्यात येणार आहे. यामुळे शिवाजी टर्मिनस, कुर्ला येथून उत्तर-पूर्वेकडे (नाशिककडे) जाणाऱ्या जलदगती गाडय़ा फलाट क्रमांक दोनवरून थेट नाशिकच्या दिशेने निघून जातील. या सुविधेमुळे कल्याण रेल्वे स्टेशनजवळ या गाडय़ांना क्रॉसिंग करताना लागणारा वेळ कमी करणे व फलाट क्रमांक चारवर लांबपल्ल्याच्या गाडय़ांचा जो भार येतो तो कमी करणे, हा मध्य रेल्वे प्रशासनाचा उद्देश आहे. हा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन असून अजून या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही.

जकात विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे पालिकेस कोटय़वधींचा फटका
दक्षता विभागही जकातीत अडकला

संजय बापट

महापालिकेची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जकात विभागाच्या मनमानी आणि सावळा गोंधळ कारभारामुळे महापालिकेस कोटय़वधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, या विभागाचे पालिकेच्या स्थापनेपासून १८० दावे न्यायालयात प्रलंबित असल्याने तब्बल १३ कोटींचे उत्पन्न अडकून पडले आहे.
चुकीच्या दराने, सक्षम प्राधिकरणाची मंजुरी न घेता केली जाणारी कर आकारणी, जकात वसुलीकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे जकात विभागाचा कारभारच भोंगळ असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्वच विभागांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेला दक्षता विभागही जकातीच्या बाहेर डोकावत नसल्याने, हा विभाग स्थापनेचा उद्देशच सफल झाला नसल्याचा ठपका पालिकेच्या सन २००५-०६ आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

आरक्षणबाह्य हुशार विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी
यंदाचे बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशन पुण्यात

ठाणे/प्रतिनिधी

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळत नसलेल्या ब्राह्मण व इतर आरक्षणबाह्य समाजांसाठी सरकारने विनाअनुदानित तत्त्वावर स्वतंत्र स्वायत्त विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी द्यावी. त्याअंतर्गत महाविद्यालये सुरू करून अशा आरक्षणबाह्य समाजातील आर्थिकदृष्टय़ा गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पुणे येथे भरणाऱ्या बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष वेदाचार्य मोरेश्वर विनायक घैसास यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

वीर हो तुमच्यासाठी..
ठाणे/प्रतिनिधी

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांशी मुकाबला करताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस व सेनादलाच्या जवानांना तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध सामान्य नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाणे जनता सहकारी बँक आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मावळी मंडळ, चरई येथे होणाऱ्या या सांगीतिक कार्यक्रमात राष्ट्रभक्तीपर गाणी सादर केली जाणार आहेत. टीजेएसबीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर सचिन पिळगावकर, सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी, डॉ. नेहा राजपाल, वृषाली मळगी-पाटील, प्रशांत काळुंद्रेकर आदी मान्यवर ही गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भार्गवी चिरमुले करणार आहे. याच कार्यक्रमात दोन्ही बँका आणि खातेदारांनी एकत्र केलेला निधी शहीद तसेच जखमी जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे, अशी माहिती टीजेएसबीचे सरव्यवस्थापक सतीश उतेकर यांनी दिली.

‘आयपीएच’ची महिलांसाठी ‘बहर’कार्यशाळा
ठाणे/ प्रतिनिधी: येथील ‘आयपीएच’ या संस्थेच्या वतीने १८ वर्षांवरील महिलांसाठी आत्मशोधास प्रवृत्त करणाऱ्या ‘बहर’ या वैशिष्टय़पूर्ण कार्यशाळेचे आयोजन १० जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान दर शनिवारी दुपारी ३.३० ते संध्याकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. आपल्यातला ‘मीह्णपणाचा शोध कसा घ्यायचा, त्याचा विकास कसा करायचा, सुसंवादी वृत्तीने नातेसंबंधातून आनंद कसा मिळवायचा, भावनांचे संतुलन साधून आनंद कसा निर्माण करायचा आदी विषयांचे हसत-खेळत मनोरंजन पद्धतीने प्रशिक्षण या कार्यशाळेतून दिले जाणार आहे. संपर्क- भारती, आयपीएच, श्री गणेश दर्शन, तीन पेट्रोलपंपजवळ, पाचपाखाडी, ठाणे (प) २५४३३२७०.

ठाणे पालिका कामगारांना मिळणार महागाई भत्त्याची थकबाकी
ठाणे/प्रतिनिधी: ठाणे महापालिका कामगार कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यासाठी म्युनिसिपल लेबर युनियनच्या प्रयत्नाने ठाणे महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी मंजुरी दिली.
ठामपा आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत ठामपा कामगारांना ५० टक्के महागाईभत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून त्याची थकबाकी अदा करणे, तसेच नवीन करारासंदर्भात कामगार नेते शरद राव यांनी प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी आयुक्त जंत्रे यांनी ठामपा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५० टक्के महागाई भत्ता समाविष्ट करण्याचे मान्य करून १ जानेवारी २००६ पासून ३१ डिसेंबर २००८ पर्यंत देण्याचे मान्य केले व २००४ व २००५ च्या थकबाकीचा प्रस्ताव चर्चेसाठी खुला ठेवला. म्युनिसिपल लेबर युनियनच्या प्रयत्नाने झालेल्या या निर्णयामुळे कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नामपाडा धरणाचे आज भूमिपूजन
शहापूर/वार्ताहर : २८ वर्षे रखडलेले नामपाडा (कुतरकुंड) धरण मार्गी लागले असून, या धरणाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी ९ जानेवारी रोजी जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सावरोली गावाजवळील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे धरणाचा भूमिपूजन समारंभ धरणस्थळी सकाळी १० वाजता जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार गोटीराम पवार, आ. महादू बरोरा, आ. किसन कथोरे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंद ठाकूर, साईनाथ चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा शुक्रवारी दुपारी १ वाजता शहापुरात आयोजित केला आहे. पंडित नाक्यावर आयोजित केलेल्या मेळाव्यास अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

वर्षभरात २५० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे रोटरी ठाणे नॉर्थचे उद्दिष्ट
ठाणे/ प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि भिवंडी तालुक्यातील पडघा येथील शिवकृपा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पडघा येथील मीनाताई ठाकरे संकुलात विनामूल्य मोतीबिंदू चिकित्सा, तसेच शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. परिसरातील १५० ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला. त्यातील ४५ जणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले असून, लवकरच पनवेल येथील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. वर्षभरात ठिकठिकाणी गरजूंसाठी विनामूल्य शिबिरे आयोजित करून, किमान २५० मोतीबिंद शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती विजय जैन यांनी दिली. याच शिबिरादरम्यान एका आठ वर्षांंच्या मुलीच्या दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू आढळल्याने आता विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे भरवून वर्षभरात किमान हजार विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे रोटरी ठाणे नॉर्थने ठरविले आहे.
या क्लबच्या पुढाकाराने तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांंत दीड हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पडघा येथे आयोजित शिबिरात ‘लक्ष्मी आयह्णच्या डॉ. शर्मिला आणि त्यांच्या पथकाने रुग्णांची नेत्रतपासणी केली. २५ जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष दिनेश कोरगावे, विजय जैन, शिवकृपा मित्रमंडळाचे प्रकाश पाटील आणि इतरांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

जीवनाचा आनंद लुटा -मंगेश पाडगावकर
कल्याण/प्रतिनिधी

आईने किंवा बायकोने केलेल्या चविष्ट आमटीचा भुरका मारताना जो आनंद असतो त्याप्रमाणे जीवनाचा आनंद लुटा. आध्यात्मिक माणसासारखा रुष्ट, आंबट आणि लांबट चेहरा करून जीवन जगू नका, असा सल्ला कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी तरुणांना दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सनई मंगल कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी कवी अशोक बागवे, विश्वनाथ अय्यर, प्रा. दीपक घाणेकर, प्रा. रामप्रकाश नायर, विश्वनाथनचे आईवडील उपस्थित होते. पाडगावकर म्हणाले, आयुष्याचे विविध अर्थ आहेत. त्यामधील स्वाद आपण कसा घेतो त्यावर जीवन अवलंबून असते. गाणी, सूर, स्वर यांना दाद द्या. जीवनाचा आनंद लुटा. तो ओंकारा इतका सुंदर वाटला पाहिजे. तरच त्या जगण्याला अर्थ आहे. सतत रुष्ट चेहरा करून बसलात तर त्या आध्यात्मिक जीवनाला अर्थ नाही. मी ८१ वर्षांंचा असलो तरी मला आता तुमच्या बसल्याने तरुण वाटायला लागले आहे, असे म्हणून त्यांनी हास्याची कारंजी उडवली. बागवे म्हणाले, टीव्हीच्या जमान्यात आता संस्कार शिल्लक राहिला नाही. संस्कार म्हणजे काय ते पाडगावकरांपासून शिकावे. एक उच्च प्रतिभेची पिढी त्यांच्या तालमीत तयार झाली आहे. म्हणून आज ८१ वर्षे असूनही आपण त्यांचे विचार तन्मयतेने ऐकत आहोत.

प्रेम ऑटो बसथांब्यावर थांबणार सामान्य, जलदगती बस
कल्याण/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जलदगती, सामान्य बस घोलपनगरजवळील बिर्ला महाविद्यालयासमोरील प्रेम ऑटो बसथांब्यावर थांबविण्यात येणार आहेत. एस.टी.चे ठाणे विभागीय नियंत्रकांनी कल्याण परिसरातील प्रवाशांची गेले अनेक दिवसापासूनची ही मागणी केली आहे. याबाबत राज्यातील सर्व आगारप्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. डी. एस. बांगर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० प्रवाशांनी ५ डिसेंबर रोजी प्रेम ऑटो बसथांब्यावर बस थांबविण्यात येत नसल्याने मुरबाड, नगर परिसरात नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या प्रवाशांची कैफियत विभागीय नियंत्रकांसमोर मांडली होती. यापूर्वीपासून त्यांचे हे प्रयत्न सुरू होते. खळेगोळवली, शहाड, काटेमानिवली, बेतुरकरपाडा, गोदरेज भागातील अनेक नागरिक दररोज मुरबाड परिसरात जातात. या प्रवाशांना दररोज मुरबाडकडे जाणारी बस पकडण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकाजवळील आगारात यावे लागत असे. हा प्रवास खूप त्रासदायक असल्याची कल्याण परिसरातील प्रवाशांची तक्रार होती.

आधारवाडीचे मैदान वाचविण्यासाठी उपोषण
कल्याण/प्रतिनिधी

आधारवाडी येथील वासुदेव बळवंत फडके मैदान एका खासगी ठेकेदाराला विकसित करण्यासाठी पालिकेने दिले आहे. याचा निषेध आणि विरोध करण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ते दिलीप काणे हे येत्या आठवडय़ात मैदानाजवळ उपोषणाला बसणार आहेत. शहरातील मैदानांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे नागरिकांनी अधिक संख्येने आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन काणे यांनी केले आहे. काणे यांनी सांगितले, शहरात अनेक ठिकाणी मोठे मॉल्स, खासगी शॉपिंग मॉलची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे पुन्हा पालिकेला मॉल उभारण्याची घाई झाली आहे. तो मॉल पालिकेच्या मोकळ्या मैदानावर का उभारण्यात येत आहे. शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदाने राहिली नाहीत. भाडय़ाने मैदाने घेऊन काही शाळा आपले क्रीडाविषयक उपक्रम राबवितात. मग पालिका तर या शहराची विश्वस्त आहे. त्या पालिकेला शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाविषयी काहीच का वाटत नाही. एकीकडे मैदानांची संख्या कमी होत आहे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा राहिलेली नाही. मोकळ्या जागा पालिका खासगी ठेकेदारांच्या घशात घालत असेल, तर करदाते नागरिक ते सहन करणार नाहीत.