Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९
व्यक्तिवेध
दुर्रानी हे भारताचे हस्तक आहेत, अमेरिकेची दलाली करतात, अशी टीका पाकिस्तानी राजकारण्यांकडून आणि काही पत्रकारांकडूनसुद्धा करण्यात आली, तेव्हा अनेकांना धक्काच बसला. अजमल अमीर कसाब हा पाकिस्तानी आहे, एवढीच कबुली तत्पूर्वी दुर्रानी यांनी दिली होती. महमूद अली दुर्रानी यांना त्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद गमवावे लागले. दुर्रानी यांनी भारतीय वृत्तवाहिनीला दिलेली कबुली बेजबाबदारपणाची आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान यूसुफ रझा गिलानी म्हणाले आणि त्यांनी दुर्रानींच्या बडतर्फीचा आदेश काढला. दुर्रानी यांनी केलेली ‘चूक’ पाकिस्तानच्या माहिती मंत्री शेरी रहमान आणि परराष्ट्र सचिव सलमान बशीर यांनी दुर्रानी यांच्या निवेदनानंतर तासाभराने केली. खरे तर दुर्रानी यांच्या निवेदनापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही ‘तो पाकिस्तानी आहे, पुढील चौकशी चालू आहे,’ असे म्हटले होते. म्हणजे ते तिघे पाकिस्तानच्या राजकारण्यांच्या दृष्टीने बडतर्फीस पात्र असले पाहिजेत. कसाब हा पाकिस्तानीच, असे जाहीर करणारे दुर्रानी आहेत तरी कसे? वायव्य सरहद्द प्रांतातील अटोबाबादचे दुर्रानी यांचा जन्म १९४१ चा. पदवी घेतल्यावर १९६१ मध्ये ते पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये दाखल झाले. लष्करात १६ वर्षे कार्यरत राहिल्यावर ते वॉशिंग्टनच्या पाकिस्तानी दूतावासात लष्करी प्रतिनिधी म्हणून काम पाहू लागले. १९८६ पर्यंत ते पाकिस्तानच्या अध्यक्षांचे लष्करी सचिव होते. पाकिस्तानच्या पहिल्या चिलखती विभागाचे कमांडर म्हणून काम पाहात असताना त्यांनी अध्यक्ष जनरल झिया उल हक यांना बहावलपूर येथे रणगाडय़ांची प्रात्यक्षिके पाहायला येण्याची विनंती करायला लष्करप्रमुखांना सुचवले. बहावलपूर येथे झियांनी १७ ऑगस्ट १९८८ रोजी ही प्रात्यक्षिके पाहिली आणि तेथून रावळपिंडीला परतताना झियांच्या विमानाला अपघात होऊन त्यात ते मारले गेले. १९९२ ते १९९८ या काळात दुर्रानी पाकिस्तानच्या दारूगोळा कारखान्यांच्या मंडळाचे अध्यक्ष बनले. पाकिस्तानी लष्करातून ते मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. २००१ ते २००४ दरम्यान दुर्रानी लंडनच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज’चे सल्लागार म्हणून, तसेच पुढे अमेरिका, रशिया आणि इराण या देशांमध्ये त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही काम पाहिले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ नये, असे त्यांना वाटते. या दोन्ही देशात समन्वय साधण्यासाठी ज्या संस्था मागल्या दाराने प्रयत्न करत असतात, त्यांना दुर्रानी यांचे सहकार्य नेहमीच लाभत असते. त्यांच्या या धडपडीबद्दल त्यांना ‘जनरल शांती’ म्हणूनही ओळखण्यात येते. २००६ मध्ये पाकिस्तानचे तेव्हाचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना अमेरिकेत राजदूतपदी नेमले. त्यावेळी आधीचे लष्करप्रमुख जहांगिर करामात हे अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत होते. करामात आणि दुरानी दोघेही पाकिस्तानच्या चिलखती विभागाचेच प्रतिनिधी होत. जनरल झिया यांच्या कारकीर्दीत अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एजाझ अझिीम हेही लष्कराच्या चिलखती विभागाचेच. पाकिस्तानी लष्करात मेजर जनरल पदावरून निवृत्त होऊनही भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष होऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये दुर्रानी यांचा समावेश होतो. त्यांनी ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान : द कॉस्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट अ‍ॅण्ड बेनिफिट्स ऑफ पीस’ यासह अनेक पुस्तके लिहिली आहेत. सुरक्षा सल्लागार या नात्याने २६ नोव्हेंबर २००८ नंतर हाती आलेली माहिती केव्हा तरी उघड होणारच, अशी दुर्रानी यांना खात्री होती. ती जाहीर करायची जबाबदारी आपलीच आहे, असे त्यांचे मत बनले आणि त्यांनी ती जाहीर केली. दुर्रानी हे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यांची बडतर्फी झरदारींना अंधारात ठेवून करण्यात आली. दुर्रानी यांनी कसाबचा बुरखा उतरवल्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘तो पाकिस्तानी नसल्या’चे जाहीर केले आणि त्यानंतर पुन्हा कोलांटउडी मारून कसाबच्या पाकिस्तानी नागरिकत्वावर परराष्ट्र खात्यालाच शिक्कामोर्तब करावे लागले. सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती होण्यापूर्वी यूसुफ गिलानी यांना भेटायला नकार देणारा ताठ मानेचा अधिकारी आता त्या पदावर राहिलेला नाही.