Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९
विशेष लेख
पाकिस्तानी दहशतवादी गटांनी अंकगणितातल्या आकडय़ांवर आधारित सांकेतिक भाषा वापरली या वृत्तात तथ्य असेल तर दहशतवादी संघटना खूप प्राथमिक पातळीवरील सांकेतिक भाषा वापरत आहेत, असा त्याचा अर्थ होतो..
पाकिस्तानी दहशतवादी गटांनी अंकगणितातल्या आकडय़ांवर आधारित वापरलेल्या सांकेतिक भाषेची माहिती ३ जानेवारी रोजीच्या अंकात वाचली. ती अतिशय मनोरंजक आहे. त्यात तथ्य असेल तर दहशतवादी संघटना खूप प्राथमिक पातळीवरील सांकेतिक भाषा वापरत आहेत, असा त्याचा अर्थ होतो. मुळाक्षर बदलणे व / वा मुळाक्षराच्या जागी अंकगणितातले आकडे वापरणे ही पद्धत खूप जुनी आहे.
सांकेतिक व गुप्त असे या भाषांचे ढोबळ वर्गीकरण करता येते. ‘कोड’ व ‘सीफर’ या इंग्रजीतल्या शब्दांना प्रतिशब्द मराठीत अजून रुळायचे आहेत. यात ‘कोड’ (गुप्त) या पद्धतीत पाठवत असलेला निरोप रोजच्या व्यवहाराच्या भाषेतच असतो. मात्र ‘निरोप्या’ गुप्त असतो. या संकेतवर्गात खूप प्रकार आहेत. यातला धोका असा, की ‘निरोप्या’ पकडला गेला म्हणजे गुप्तता संपते. जगभर ही गुप्त भाषा वापरात असते. शास्त्रीय परिभाषेत याला स्टेगॅनोग्राफी असे म्हणतात. म्हणजे कागद लपवणे- प्रसंगी गिळून, अदृश्य होणारी शाई, पाठवण्याचा मजकूर फोटो काढून टिंबाएवढा लहान करणे, समोरच्याने तो मोठा करून वाचणे अशी काही उदाहरणे देता येतील. यादी संपूर्ण नाही.
‘सीफर’ म्हणजे अक्षर व/वा आकडे बदलणे. बदल करण्याची पद्धत वापर करणाऱ्या सर्वाना माहीत हवी. अक्षरांची अदलाबदल करून निरोप अगम्य करणे, याला ‘सीझर शिफ्ट’ असे म्हणतात. रोमचा प्रसिद्ध सेनापती- राजकारणी- सम्राट ज्युलिअस सीझर. याच्या नावाचे स्मरण म्हणून आपण रोज वापरतो त्या दिनदर्शिकेत ‘जुलै’ महिना आला. सीझरने त्याच्या आठवणी लिहिल्या होत्या.
 
त्यात त्याने ही पद्धत वापरल्याचे नमदू केले आहे. ‘ए’ ते ‘झेड’ या बाराखडीत ‘ए’ ऐवजी ‘डी’, ‘बी’ ऐवजी ‘ई’ असा हा वापर होता. म्हणजे मुळाक्षरे तीन घरे ओलांडून वापरणे. स्वाभाविकच शेवटची तीन पहिली तीन होतील. या पद्धतीच्या वापरातून लक्षावधी सांकेतिक लिप्या बनवता येऊ शकतात. अक्षरांची अदलाबदल ही पद्धत इजिप्त, मेसोपोटेमिया (इराक), भारत या व अशा सर्व प्राचीन संस्कृतींना ज्ञात होती. प्रत्यक्ष वापर केल्याचा पहिला ज्ञात पुरावा ज्युलियस सीझरच्या लिखाणात मिळतो. या पद्धतीत सुधारणा, भर, गुंता वाढवणे असे खूप काही झाले आहे. ती सर्व माहिती थरारक आहे. या पद्धती वापरून साधा दहावी पास झालेला विद्यार्थी असंख्य सांकेतिक पद्धती घडवू शकतो.
याची पुढची पायरी म्हणजे मुळाक्षरांच्या जागी आकडे वापरणे. ज्ञात इतिहासात ही संकल्पना सुचली पॉलिबियस या ग्रीक साहित्यिकाला! हा ज्युलियस सीझरच्या खूप आधी होऊन गेला, पण त्याने सुचवलेली पद्धत वापरात आणली गेल्याचा पुरावा सापडत नाही. इंग्रजी मुळाक्षरे वापरून जर ही पद्धत पाहिली तर चित्र वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे दिसेल.
या पद्धतीला ‘चेकरबोर्ड’ म्हणतात. वरील बोर्ड वापरून ‘मुंबई’ सांकेतिक लिपीत लिहायचे तर असे येईल -
ट व ट इ अ क
३२ ४५ ३२ १२ ११ २४
यात ५ बाय ५चा चौकोन व्हावा, यासाठी ‘आय’ व ‘जे’ ही मुळाक्षरे एकाच रकान्यात ठेवण्यात आली आहेत. ‘जे’ हे मुळाक्षर फार मोठय़ा प्रमाणावर वापरात नसते. संदर्भावरून ‘आय’ का ‘जे’ हे ओळखता येते.
या चेकरबोर्ड पद्धतीचाही खूप विकास झाला. त्याचाही इतिहास मनोरंजक आहे.
यंत्रयुगाच्या सुरुवातीला घडय़ाळाची पद्धत वापरून ‘सीफर’ने यंत्रयुगात प्रवेश केला. पुढे प्रथम वीज, तारायंत्र, टेलिफोन व रेडिओ हे व्यवहारात आल्याने संदेशवहनात गती आली तशीच क्रांतीही. सांकेतिक लिपी-भाषा निर्माण-वापर-उलगडा यासाठी यंत्रे वापरात येऊ लागली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेले ‘एनिग्मा’ हे यंत्र बराच काळ नाव सार्थ करणारे ठरले.
अर्थात ही सर्व पद्धत गणिताच्या नियमांवर बेतलेली असल्याने विरुद्ध बाजूने गणिताच्या साहाय्याने ते कोडे उलगडण्याचा प्रयत्नही केला. सांकेतिक भाषा-लिपी घडवणे-उलगडणे हे शह-काटशह प्रकरण काही हजार वर्षांचा इतिहास असणारे असे आहे. अनेक संस्कृतींनी त्यात आपापला वाटा उचलला आहे. यात एक लक्षणीय भर आजच्या ‘इराक’ म्हणवणाऱ्या प्रदेशाने म्हणजे अरबांनी इ. स. ८०० ते १२०० या काळात टाकली आहे. अब्बासिड खिलाफतीचा हा काळ अरबांचा वैभवशाली काळ आहे. इथे भाषेतल्या मुळाक्षरांच्या वापरातली वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) तपासत मुळाक्षरांमधले परस्परसंबंध तपासण्याच्या पद्धतींच्या विकासाची पहिली पावले उचलली गेली. याच्या आधारे सांकेतिक भाषा-लिपी उलगडण्यासाठीचे स्थिर नियमही सांगण्यात आले जे आजही अबाधित आहेत.
अरबीचा आपला लिपी म्हणून परिचय फार कमी आहे. मराठीच्या शब्दसंपत्तीत ३० ते ३५ टक्के शब्द फारसी-अरबी असले तरी तुलनेने इंग्रजी वर्णमाला आपल्या ओळखीची. निरनिराळय़ा विषयांवरचे (कला, शास्त्र, खेळ, ललित, कायदा वगैरे) इंग्रजी लिखाणातले उतारे जर घेतले (साधारण एक लाख शब्द) तर ‘ई’ हे मुळाक्षर सर्वात जास्त म्हणजे १५ ते १६ टक्के वापरले जाते. अक्षरांच्या परस्पर संबंधांबद्दल एक उदाहरण म्हणजे ‘ई’ हे मुळाक्षर ९९.९ टक्के ‘एच’च्या नंतरच शब्दात येईल. आधी येणार नाही. या दोन वैशिष्टय़ांच्या आधारे सांकेतिक भाषा उलगडण्याच्या पद्धती विकसित करण्यात आल्या, ज्या पुढे युरोपने अरबांकडून उचलल्या, खुलवल्या.
इथे हे नमूद करायला हवे, की अनेक विद्यापीठे, साहित्य संस्था, साहित्य संस्कृती मंडळे, विकास संस्था वगैरे अनेक दशके वावरत असूनही मराठी भाषेचे फ्रिक्वेन्सी अ‍ॅनालिसिस व / वा मुळाक्षरांच्या परस्परसंबंधांमधली वैशिष्टय़े तपासावी हे कुणालाच जाणवलेले नाही. आजपर्यंत तसा खास प्रयत्नही झाल्याचे आढळलेले नाही.
यंत्रयुगाचा पुढचा टप्पा संगणकाचा! याचा आवाका व गती अचाट असल्याने आता सांकेतिक भाषा घडवणे व उलगडा यासाठी आता प्रचंड प्रमाणावर संगणक वापरला जातो. आर्थिक- व्यापारी-सैनिकी-शासकीय-आंतरराष्ट्रीय अशा सर्वच क्षेत्रांत इंग्रजीत ज्याला ‘प्राइम नंबर्स’ म्हणतात, त्या आकडय़ांचा वापर यात सर्वाधिक आहे. ज्या संख्येला ‘एक’ व / वा त्याच संख्येने भाग जातो, त्यांना प्राइम नंबर्स म्हणतात. (१, ३, ५, ७, ११, १३, १७, १९, २३.. मालिका अनंतापर्यंत) शिवाय एक पद्धत ‘मॉडय़ुलर’ अंकगणितावर आधारलेलीही आहे. अतिप्रगत क्षेत्रात घडवलेल्या सांकेतिक भाषा आज तरी उलगडणे अशक्य वा अति कठीण श्रेणीतले!
म्हणून असे म्हणावे लागते, की ‘लोकसत्ता’तल्या बातमीत दिलेली सांकेतिक पद्धत खूप आधीच्या म्हणजेच प्राथमिक अवस्थेतील आहे. शक्य आहे, की ती एका गटापुरती व ‘त्या’ विशिष्ट काळापुरती केवळ वापरात असावी.
वरील धावती माहिती सांकेतिक-गुप्त संदेशवहनाचा ठळक असा आढावा नाही. हा विषय मोठा, अनेक परिमाणे-शाखा असलेला. ये सिर्फ झाँकी भी नहीं है!
विश्वास दांडेकर