Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९९
विविध

लोकसभा निवडणुकीतभाजपला विजयी करण्यासाठी रा.स्व. संघ-विहिंपची मोर्चेबांधणी
नवी दिल्ली, ८ जानेवारी / पी.टी.आय.

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंपने प्रचारमोहिम राबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वििहपचे पदाधिकारी आणि विश्वस्तांची चालू आठवडय़ाच्या प्रारंभी आंध्र प्रदेशातील वरदायप्पलम येथे तीन दिवस बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक कुप्प. सी. सुदर्शन यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.

जगभरातील भारतीयांना स्वदेशसेवेची संधी देणारे ‘नेटवर्क’ स्थापन
चेन्नई, ८ जानेवारी/पी.टी.आय.

विकास, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत मार्गदर्शन व प्रत्यक्ष कार्याद्वारे स्वदेशाची सेवा करण्याची संधी जगभर पसरलेल्या अनिवासी भारतीयांना देण्यासाठी ‘ग्लोबल इंडियन नेटवर्क’ स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज येथे प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित परिषदेत केली. या परिषदेत जगभरातील १५०० अनिवासी भारतीय सहभागी झाले आहेत.

वयानुसार मीच ज्येष्ठ - शेखावत
नवी दिल्ली, ८ जानेवारी / पी.टी.आय.

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीला आव्हान देत माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांनी आपण सर्व नेत्यांमध्ये वरिष्ठ आहोत असे आज पत्रकारांशी बोलताना सांगितले आणि ‘भाजप’ च्या गोटात पुन्हा एकदा खळबळ निर्माण केली. भाजपमध्ये अडवाणी, राजनाथसिंह, जसवंत सिंह यांसारखे वरिष्ठ नेते आहेत, पण वयानुसार मी वरिष्ठ ठरतो, असे सांगून पंतप्रधानपदासाठी आपलाही मार्ग मोकळा असल्याचे शेखावत यांनी सूचित केले.

दुर्राणी यांच्या हकालपट्टीमुळे पाकिस्तानातील सत्तासंघर्ष चव्हाटय़ावर
इस्लामाबाद, ८ जानेवारी/पी.टी.आय.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्राणी यांची पंतप्रधान युसूफ गिलानी यांनी तडकाफडकी हकालपट्टी केल्याने दोन सर्वोच्च सत्तास्थानांमधील तंटाबखेडा चव्हाटय़ावर आला आहे. दुर्राणी यांची नेमणूक अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केली होती. ते त्यांच्या विश्वासातील अधिकारी समजले जात होते. या पाश्र्वभूमीवर गिलानी यांनी त्यांना काढून टाकल्याने अध्यक्ष व पंतप्रधान असे स्वरूप या भांडणाला आले आहे.

ओबामा यांच्या सत्ताग्रहणप्रसंगी अमेरिकेतील हिंदू गटांकडून निदर्शने
न्यूयॉर्क, ८ जानेवारी/पी.टी.आय.

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सत्ताग्रहणप्रसंगी अमेरिकेतील हिंदूू गटांनी व्हाईट हाऊसवर निदर्शने करण्याचा तसेच दहशतवादाच्या धोक्याबाबत जाणीव निर्माण करून पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी दबाव आणण्याचा निर्धार केला आहे. २० जानेवारी रोजी न्यूयॉर्क, न्यू जर्सी, मेरीलँड, व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टन डीसीमधील हिंदू गटांकडून नारायण कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली व्हाईट हाऊसमधील ओबामा यांच्या सत्ताग्रहणाच्या कार्यक्रमात निदर्शने केली जाणार आहेत. यात काही ख्रिस्ती आणि ज्यू संघटनादेखील सहभागी होणार असल्याची शक्यता कटारिया यांनी व्यक्त केली. या दिवशी दुपारपासून चार तास निदर्शने करणार असून त्याद्वारे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे, इराणला अण्वस्त्रे निर्माण करण्यापासून रोखावे आणि सौदी अरेबियाला दहशतवादासाठी आर्थिक पुरवठा करण्यापासून थांबवावे अशी मागणी ओबामांकडे केली जाणार आहे, असे कटारिया म्हणाले.

अतिरेक्यांना इशारा
चेन्नई, ८ जानेवारी/पी.टी.आय.

धर्माध दहशतवाद्यांना भारताला राजकीय व आर्थिकदृष्टय़ा अस्थिर करता येणार नाही, असे ठणकावून सांगत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्याची ग्वाही पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज प्रवासी परिषदेत दिली.
देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, असे ते म्हणाले. जग मंदीच्या अवघड परिस्थितीतून जात असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मात्र अजूनही मजबूत आहे. यावर्षी आर्थिक विकासाचा सात टक्के हा दर आपण गाठणे अपेक्षित आहे. भारताचा आर्थिक आराखडा मजबूत बनवला असल्याने कोणतीही आव्हाने स्वीकारण्यासाठी आपली अर्थव्यवस्था सक्षम आहे, असेही ते म्हणाले.

क्रूर शिक्षेमुळे विद्यार्थिनीने डोळा गमावला
कोरबा, ८ जानेवारी / पी. टी. आय.

शिक्षकाने विद्यार्थ्यांना सौम्य शिक्षा कराव्यात, असा नियम सध्या अस्तित्वात असला तरी काही शिक्षकांचा राग इतका अनावर असतो, की आपण विद्यार्थ्यांला काय शिक्षा करीत आहोत त्या शिक्षेचे विद्यार्थ्यांच्या जीवनावर काय परिणाम होतील याचा सारारास विचारही केला जात नाही आणि मग एखाद्या विद्यार्थ्यांचे जीवन पार उद्ध्वस्त होते.१९ नोव्हेंबर रोजी कातघोरा जिल्ह्य़ातल्या जुराली खेडय़ात सरस्वती शिशूमंदिरातील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ वर्षे वयाच्या श्वेता या विद्यार्थीनीला परसराम भानिया नावाच्या शिक्षकाने प्रश्नाचे उत्तर देता न आल्यामुळे बेदम मारहाण केली आणि नंतर तिच्या उजव्या डोळ्यात टाचणी खूपली त्यामुळे श्वेताचा एक डोळा पार निकामी झाला.शिक्षक भानिया फरारी असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेताच्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी तिला रायपूरला पाठविण्यात आले असून, उपचारांचा खर्च शाळा करणार आहे.

डॉ. कलाम यांच्या प्रकृतीत सुधारणा
नवी दिल्ली, ८ जानेवारी / पी.टी.आय.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर क्षेपणास्त्र वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकरच इस्पितळातून सुटी दिली जाईल, असे लष्करी इस्पितळाच्या सूत्रांनी आज सांगितले. त्वचेच्या विकारामुळे ७७ वर्षीय डॉ. कलाम यांना रविवारी इस्पितळात दाखल करावे लागले होते. डॉ. कलाम ‘एक्झिमा’ ने त्रस्त आहेत. त्रास वाढल्याने त्यांना इस्पितळात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना आर्मी हॉस्पिटल रिसर्च अॅण्ड रेफरलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ओ.पी. मॅथ्यू म्हणाले, नित्याच्या वैद्यकीय तपासणीसाठीच डॉ. कलाम यांना दाखल करून घेण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत असून दोन दिवसात ते घरी जाऊ शकतील. इस्पितळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. कलाम यांना मधुमेह आहे. त्यांना त्वचेचा संसर्ग झाल्याने त्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढल्याने संसर्ग वाढला आहे.
साखर आणि इन्सुलिनचे प्रमाण योग्य स्तरावर आल्यानंतर त्यांचा त्रास कमी होईल. दरम्यान राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या प्रकृतीची हैदराबाद येथून दूरध्वनीवरून चौकशी करून त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

नेपाळच्या पशुपतिनाथ मंदिरात भारतीय पुजारी पुनश्च रुजू
काठमांडू, ८ जानेवारी/पीटीआय

नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरातील भारतीय पुजाऱ्यांना हटविण्याचा निर्णय तेथील माओवादी सरकारने मागे घेतल्यानंतर आज या मंदिरातील नित्यपूजा पूर्ववत भारतीय पुजाऱ्यांमार्फत पार पडली. या वेळी शेकडो हिंदू भाविक उपस्थित होते. पशुपतिनाथ मंदिरातील नित्यपूजा करणाऱ्या दोन मुख्य पुजाऱ्यांची नियुक्ती आजवर नेपाळच्या राजाकडून केली जात असे. मात्र राजेशाही संपुष्टात आल्यानंतर सत्तारूढ झालेल्या माओवादी सरकारने भारतीय पुजाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी नेपाळी पुजाऱ्यांना नियुक्त केले व भारतीय पुजाऱ्यांना मंदिरात पूजाअर्चा करण्यास बंदी घातली. तथापि या निर्णयास स्थानिक हिंदूंनी जोरदार विरोध केला. या मुद्दय़ावर आंदोलन करून सरकारला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान प्रचंड यांना हा निर्णय काल मागे घ्यावा लागला.सरकारने आपला निर्णय मागे घेतल्याचे जाहीर होताच मंदिराचे मुख्य पुजारी महाबळेश्वर भट्ट, तसेच गणेश भट्ट आणि रामकृष्ण भट्ट या तिघांनी जवळजवळ एक आठवडय़ानंतर आज मंदिरात जाऊन पूर्ववत पूजाअर्चा केली. या तीनही पुजाऱ्यांकडे वंशपरंपरेने हे काम चालत आले आहे. गेली तीनशे वर्षे त्या तिघांचे कुटुंब नेपाळमध्ये वास्तव्य करून आहे. आजच्या नित्यपूजेला चित्रपट अभिनेता व खासदार गोविंदा यांच्यासह अनेक भारतीय भाविक उपस्थित होते.

‘देशाच्या विकासासाठी जिल्हा पातळीवर प्रयत्न करा’
चेन्नई, ८ जानेवारी/पी.टी.आय.

भारत हा महासत्ता व्हावा, असे वाटत असेल तर अनिवासी भारतीयांनी जिल्हा पातळीपासून विकासकार्यातील सहभागाचे प्रयत्न सुरू करावेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय प्रज्ञा आयोगाचे अध्यक्ष आणि अमेरिकेतील सी-सॅम इन्कॉर्पोरेशन या कंपनीचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी आज प्रवासी भारतीय परिषदेत केले.‘भारत उदयास येणारी महासत्ता व अनिवासी भारतीयांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. आपल्या देशाचा विकास होण्यासाठी आपल्याला काय करता येईल, याचा विचार आपण आधी जिल्हा पातळीपासून केला पाहिजे, असे पित्रोडा म्हणाले.क्रिकेट सामन्यांतील विजय किंवा गल्लापेटीवर विक्रमी यश मिळविणाऱ्या चित्रपटांची निर्मिती यातून भारत महासत्ता होणार नाही. आपल्याला दारिद्रय़रेषेखाली राहाणाऱ्या ४० कोटी लोकांपर्यंत त्यासाठी पोहोचायला हवे. त्यांना शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्वच्छ राहणीमान दिले पाहिजे, असे ते म्हणाले.मलेशियन इंडियन काँग्रेसचे अध्यक्ष दातो सेरी सामीवेलु यांनी सांगितले की, जगभर आर्थिक मंदी पसरत असताना अनिवासी भारतीय उद्योजकांनी संघटित होऊन औद्योगिक विकासाचे प्रयत्न केले पाहिजेत. जागतिक मंदीचा पहिला फटका भारतातील आऊटसोर्सिग इंडस्ट्रीला बसणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०३० सालापर्यंतच्या भारतीय प्रगतीचा वेधही त्यांनी घेतला.