Leading International Marathi News Daily
शनिवार, १० जानेवारी २००९

बॅंडवाल्यांचं आयुष्य कसं असतं? ते कुठं राहतात? त्यांना किती बिदागी मिळते? त्यात त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं भागतं का? ते आपल्या सुरेल गाण्यांनी आणि वादनानं इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करीत असले, तरी त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात असं सुखावणारं संगीत त्यांना कधी अनुभवायला मिळतं का?
रंगीबेरंगी, भरजरी, रुबाबदार पोषाख. खांद्यावर झिरमिळ्याच्या झुली. सोनेरी-चंदेरी वर्खाच्या विविध आकर्षक आकार-प्रकारांतील नक्षीच्या टोप्या किंवा फेटे. पायांतले गमबूटही तसेच नक्षीदार. हातात ट्रम्पेट, बिगुल, ड्रम्स आणि ताशांच्या जातकुळीतली पितळी वा स्टीलची चकचकीत वाद्यं. अशा राजेशाही थाटातलं बॅंडपथक तुमच्या-आमच्या कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरतं. लग्नसमारंभ, अन्य मंगल कार्ये, विजयी मिरवणुका, लष्करी वा पोलीस संचलन, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय सोहळ्यांच्या वेळची भव्य परेड, आंतरराष्ट्रीय नेत्यांचे स्वागत समारंभ, बडे नेते तसंच हौतात्म्य पत्करलेले देशभक्त, लष्करी वा पोलीस जवान यांच्यावरील अंतिम संस्कार.. अशा विविध प्रसंगी बॅंडवादन करणारे बॅंडवाले हे नेहमीच सर्वाचं लक्ष वेधून घेत असतात. विशेषत: लग्नसोहळ्यातले चमकदार, रंगीबेरंगी पोषाखांतील ऐटबाज बॅंडवाले हे तर समस्त लहानथोरांना आकर्षण ठरतात. त्यांचे ऐटदार पोषाख इतिहासकाळातील
 

राजेमहाराजे किंवा सेनापतींसारख्या बडय़ा हुद्दय़ाच्या अधिकारी व्यक्तींसारखे समोरच्यावर छाप पाडणारे व रुबाब मिरवणारे असतात. रस्त्यावरून बॅंडवाल्यांचा घोळका निघाला की त्यांच्याकडे वळून पाहत नाही, असा माणूस सापडणं विरळाच. लष्करी किंवा पोलीस बॅंडपथकांचा रुबाब अन् आब त्यांच्या इतमामास साजेसा असतो. या बॅंडपथकांतील वादकांचं जीवन त्यांच्या शासकीय नोकरीमुळे आर्थिकदृष्टय़ा सुनिश्चित अन् सुरक्षित असतं. त्यांना समाजमानसातही एक विशिष्ट प्रकारचा मान असतो. अर्थात तो त्यांच्या पेशातून आलेला असतो, हे खरं. ब्रिटिश राजवटीत त्यांच्या परंपरेतून आपल्याकडे बॅंडपथकांची ही प्रथा बहुधा आली असावी.
मात्र, त्यानंतर सर्वसामान्यांच्या आयुष्यातील लग्नकार्य, सणसमारंभ, यात्रा-उत्सव, आनंदाचे क्षण याप्रसंगीही बॅंडवादनानं रंगत येऊ लागली. विशेषत: थोरामोठय़ांच्या घरच्या मंगलकार्यात बॅंडवाल्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला जाऊ लागला. आजही पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या श्रीमंतांघरच्या लग्नसोहळ्यांतून थोडीशी का होईना, धुमधडाक्यात वरात काढली जातेच. आणि त्यात शिरोभागी मिरवणाऱ्या रंगीबेरंगी बॅंडपथकामागे नवरा मुलगा/ नवरी मुलगी सजवलेल्या घोडागाडीत किंवा घोडय़ावर बसलेले असतात. हे दृश्य काहीसं गमतीशीर वाटत असलं, तरी आपली राजेरजवाडय़ांपासून चालत आलेली सरंजामशाही मानसिकता अजूनही गेलेली नाही, याचंच हे द्योतक आहे. लग्नसमारंभातील बॅंडपथकाची हजेरी ही कुणा बडय़ा असामीच्या घरचं हे मंगल कार्य आहे, यावर निर्विवादपणे शिक्कामोर्तब करणारी असते.
मात्र, या मंडळींच्या या बाह्य रंगीबेरंगी, ऐटबाज रूपापलीकडे जात त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचं सहसा कुणालाच सुचत नाही. त्यांचं आयुष्य कसं असतं? ते कुठं राहतात? त्यांना किती बिदागी मिळते? त्यात त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं भागतं का? इतर वेळी ते काय करतात? ते कुठं प्रॅक्टिस करतात? मुख्य म्हणजे ते कुठून येतात? आपल्या सुरेल गाण्यांनी आणि वादनानं ते इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करीत असले, तरी त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात असं सुखावणारं संगीत त्यांना कधी अनुभवायला मिळतं का?.. त्यांना पाहून आपल्याला क्वचित क्षण- दोन क्षण पडणारे हे प्रश्न ते दृष्टीआड होताच क्षणार्धात विरूनही जातात.
परंतु चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना या प्रश्नांनी भयंकर अस्वस्थ केलं. इतकं, की या बॅंडवाल्यांचं आयुष्य काही अंशी तरी जवळून न्याहाळावं, असं त्यांना प्रकर्षांनं वाटू लागलं. पुण्यातील त्यांच्या स्टुडिओच्या आसपास चार-पाच मंगल कार्यालयं आहेत. त्यामुळे बॅंडवाल्यांचा राबता या परिसरात सततचा. शिवाय त्यांना लहानपणापासूनच बॅंडवाल्यांबद्दलचं आकर्षण होतंच मुळी. या कारणानं त्यांनी मग तिथं येणाऱ्या-जाणाऱ्या बॅंडवाल्या मंडळींशी हेतुत: जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. एका चित्रकाराच्या कलात्मक दृष्टीतून तर त्यांचं निरीक्षण ते करत होतेच; शिवाय त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही दिवसेंदिवस प्रबळ होऊ लागली होती. परिणामी त्यांनी कळत-नकळत बॅंडवाल्यांच्या जीवनात डोकावायला सुरुवात केली. प्रारंभी त्यांच्याशी गप्पा, मग थोडीशी मैत्री, त्यानंतर जिव्हाळ्याचे स्नेहबंध.. अशा वाढत्या मात्रेनं चंद्रमोहन कुलकर्णी बॅंडवाल्यांच्या अंतरंगात शिरू पाहत होते. एक माणूस आपल्या उपेक्षित आयुष्यात डोकावू पाहतोय, याचं त्या बॅंडवाल्यांनाही नाही म्हटलं तरी कुतूहल असणारच. तशात चंद्रमोहन कुलकर्णीची सोलापूरकर बॅंडवाल्यांशी निकटची मैत्री झाली. त्यातून त्यांना त्यांच्या आयुष्याचा अधिक जवळून परिचय होऊ लागला.
पुण्यातील आप्पा बळवंत चौक, सोमवार, मंगळवार, बुधवार पेठांतून ही बॅंडवाली मंडळी विखुरलेली आढळतात. तिथल्या चाळींतून त्यांच्या खोल्या आहेत. सकाळीच ही बॅंडवाली मंडळी एकेक करून तिथं गोळा होतात. खोलीतल्या ट्रंकांतून ठेवलेले पोषाख काढून आपल्याला फिट्ट बसेल किंवा किमानपक्षी फार बेंगरूळ दिसणार नाही, असा एखादा पोषाख निवडून तो ते अंगावर चढवतात. कधी कधी या खोलीतच त्यांची गाण्याबजावण्याची प्रॅक्टिस चालते. त्यावेळी ते पोषाखात नसतात. परंतु त्यांच्या या गाण्याबजावण्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होण्याची भीती असल्यानं ते बऱ्याचदा एखाद्या चौकात आपली गाण्याबजावण्याची प्रॅक्टिस करतात. बॅंडवाल्याच्या पोषाखामुळे कुणी त्यांना तिथं सहसा हटकत नाही. त्यानंतर जिथं तो समारंभ असेल तिथं त्यांना जावं लागतं. तिथं जाण्यासाठी सायकल, बस, रिक्षा असं मिळेल ते वाहन घ्यावं लागतं. बॅंडपथकाचा मालक वा कंत्राटदार त्यांच्या जाण्या-येण्याची कुठलीही व्यवस्था करीत नाही. आपापली वाद्यं अंगाखांद्यावर वागवत त्यांनाच आपली सोय करावी लागते. ज्या ठिकाणी मंगलकार्य असेल तिथं गेल्यावर त्यांचं अगत्यानं स्वागत करून त्यांना साध्या चहा-नाश्त्याचीही विचारणा होत नाही. त्यांचे तेच आपापली सोय करतात. ठरलेल्या वेळात गायन-वादन केल्यावर ठरलेली बिदागी घेऊन ते घरी परततात. ना त्यांना कुणी जेवणाखानाचं विचारीत, ना साधं प्यायचं पाणी. परंतु त्यांना गाण्यांची फर्माईश करायला मात्र सगळेचजण पुढं सरसावत असतात. या फर्माईशकर्त्यांची चित्रपटांतील गाण्यांची फर्माईश पुरी करण्याकरता त्यांना नेहमीच अपडेट राहावं लागतं. त्यासाठी सतत नव्या चित्रपटांतील गाणी ऐकावी लागतात. त्यांचे नोटेशन्स तयार करून त्याबरहुकूम ती वाजविण्याची प्रॅक्टिस करावी लागते. पुरेशा तयारीअभावी गाणं बेसूर झालं तर सोहळ्याचे यजमान रागावतात.
ही बॅंडवाली मंडळी बहुतांशी निम्न आर्थिक-सामाजिक स्तरातली असतात. शिक्षणाचा अभाव, दारिद्रय़, व्यसनाधीनता यांनी पीडित असतात. या अभावग्रस्ततेमुळे आयुष्याकडूनही त्यांच्या फारशा अपेक्षा नसतात. आपण नाडले जातो आहोत, उपेक्षिताचं जीवन जगतो आहोत, याची जाणीवही त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना नसते. त्यामुळे या खातेऱ्यातून बाहेर पडावं, अशी तीव्र इच्छाही यापैकी अनेकांत दिसून येत नाही. त्यांच्या या दुर्लक्षित जीवनाचं प्रतिबिंब त्यांच्या कोऱ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पडलेलं दिसतं. लोकांच्या आयुष्यात आपल्या कलेनं आनंद फुलविणाऱ्या या मंडळींच्या चेहऱ्यावर क्वचितच हास्य दिसतं. अन्यथा एक त्रयस्थ, अलिप्त भाव त्यांच्या अवघ्या अस्तित्वातून जाणवत राहतो.
चंद्रमोहन कुलकर्णी यांच्यातील कलाकाराला बॅंडवाल्यांच्या आयुष्यातील नेमका हाच विरोधाभास खुणावत असे. त्यांनी तो शब्दांऐवजी कुंचल्याद्वारे आपल्या कॅनव्हासवर उतरवला. त्यांच्या बॅंडवाल्यांचं जीवन चितारणाऱ्या या चित्रमालिकेचं प्रदर्शन नुकतंच मुंबईत भरलं होतं. त्यातील चित्रं पाहताना चित्रं म्हणून तर ती आनंद देत होतीच, परंतु त्यापलीकडे जात त्यांनी या उपेक्षित कलावंतांचं विश्व त्यातून प्रत्ययकारीतेनं साकारलेलं होतं. कोकणातील दशावतारी कलावंतांच्या बाबतीत जे म्हटलं जातं की, ‘रात्री राजा अन् दिवसा डोक्यावर बोजा..’ ही म्हण बॅंडवाल्यांनाही तितकीच लागू पडते. त्यांच्या बाह्य झगमगाटी रंग-रूपावरून त्यांचं आयुष्यही तसंच रंगीतसंगीत असेल असं आपल्याला वाटतं. परंतु खरं तर ते त्याच्या अगदी विरोधी आहे. म्हणूनच चंद्रमोहन कुलकर्णीच्या चित्रांत बॅंडवाल्या मंडळींचं चित्रण विरूपीकरणातून केलेलं आढळतं. त्यांचं बाहेरचं जीवन रंगीबेरंगी दिसत असलं तरी त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात कृष्ण-धवल छटाच प्राय: आढळतात. म्हणूनच त्यांचे चेहरे शक्यतो काळ्याच्या वेगवेगळ्या छटांतूनच त्यांनी रंगवलेले आहेत. शिवाय त्यांच्या चित्रांचा ठळकपणे जाणवणारा विशेष म्हणजे बॅंडवाल्यांची चेहऱ्याच्या तुलनेत अवाढव्य वा अगदीच किरकोळ दिसणारी शरीरयष्टी. त्यांचा शरीरापेक्षा कितीतरी पट फुगलेला पोषाख. यातून चित्रकाराला त्यांना झालेलं आपल्या पोषाखाचं ओझंच सूचित करायचं आहे. या चित्रमालिकेतील बॅंडवाल्यांच्या चेहऱ्यावर आनंद, हसू फारच क्वचित आढळून येतं. त्यांचं दारिद्रय़ त्यांच्या बाह्य रूपातही डोकावतं. कुणाच्या पायात स्लीपर्स आहेत, तर कुणी साध्या चपला घातलेल्या आहेत. एका चित्रात घोडय़ाच्या पाठीवरची झूल आणि त्याला घेऊन जाणाऱ्या बॅंडवाल्याच्या पोषाखाची भरजरी झूल सारखीच असल्याचं त्यांना सुचवायचं आहे. दारूच्या गुत्त्यात रोजमर्राचं जिणं दारूच्या प्याल्यात बुडवू पाहणाऱ्या बॅंडवाल्यांचं चित्रण त्यांच्या आयुष्यातील वैय्यर्थता नको इतकी गडद करतं.
या चित्रणातून आपल्याला त्यांचं अर्थशून्य जीवन, त्यातला विरोधाभास लोकांसमोर आणायचा होता, असं चंद्रमोहन सांगतात. मी काही त्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास केलेला नाही, परंतु कुणीतरी तो करण्याची आवश्यकता आहे, एवढं जरी हे प्रदर्शन पाहणाऱ्यांपैकी एखाद्याला वाटलं, तरी माझ्या प्रदर्शनाचा हेतू साध्य झाला असं मला वाटेल, असं ते म्हणतात.
बॅंडवाल्यांच्या निरीक्षणातून त्यांना समजलेला तपशील सांगताना ते म्हणाले की, बहुश: सातारा, सोलापूर, सांगली वगैरे भागांतून ही बॅंडवाली मंडळी येतात. त्यांचे वेगवेगळे ग्रुप आढळतात. मागणी येईल त्याप्रमाणे कंत्राटदार त्यांचा पुरवठा करतो. ते गाणंबजावणं नेमकं कुठं शिकतात, की परंपरेनंच ते हा धंदा करतात, हे तितकंसं ज्ञात नसलं, तरी सवयीनं, सततच्या सरावानंच ते निरनिराळी वाद्यं शिकतात. त्यांचे ड्रेसही त्यांच्या मापाचे नसतात. मिळेल तो ड्रेस त्यांना घालावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचं ध्यान बेंगरूळ दिसतं. काहींचे ड्रेस विरलेले असतात. पण तरीही तसेच ते घालतात. त्यांच्या वरकरणी भरजरी दिसणारे हे पोषाख बारकाईनं पाहिलं तर तकलादू आहेत, हे आपल्या सहज लक्षात येतं. ना त्यांना समाजात मान असत, ना हा व्यवसाय त्यांना सन्मानानं जगण्यासाठी लागणारा पुरेसा पैसा देत. तरीही ते या व्यवसायातून बाहेर पडत नाहीत. याचं कारण त्यांना त्याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही कला अवगत नसते. एरवी युनिफॉर्म माणसाला अधिकार, आदर मिळवून देतो, परंतु यांच्या बाबतीत असं काहीच घडत नाही. इतरांना वरकरणी चकचकीत, रंगीत-संगीत भासणाऱ्या या माणसांच्या प्रत्यक्ष आयुष्याचे रंग मात्र उडालेले असतात.
रवींद्र पाथरे