Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
व्यापार-उद्योग

‘सत्यम’चे पुण्यातील २,५०० कर्मचारी अनिश्चितता व भवितव्याच्या चिंतेने ग्रस्त
व्यापार प्रतिनिधी: नावाजलेली सत्यम कॉम्प्युटर कंपनी गाळात जाईल आणि या आयटी कंपनीच्या आजवरच्या सर्व प्रतिष्ठेचा फुगा कंपनीचे संस्थापक व माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांनीच फोडला. त्याचे पडसाद सत्यम कॉम्प्युटरच्या पुणे येथील विकास केंद्रावर पडलले दिसून आले. कंपनीच्या पुणे केंद्रातील कामकाज नेहमीप्रमाणेच सुरू होते. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीसारखा उत्साह स्वाभाविकच दिसत नव्हता. कर्मचारी बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या केंद्रातील काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडे ‘नो कॉमेन्ट्स’शिवाय दुसरे उत्तर नव्हते. तर काहीशा अनुभवी मंडळींनी कंपनीच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करीत लवकरात लवकर नोकरी बदण्याचा आपला विचार असल्याचेही बोलून दाखविले.
देशातील सर्वात मोठय़ा आर्थिक घोटाळ्याने अडचणीत सापडलेल्या या कंपनीच्या पुणे केंद्रातील सुमारे २,५०० कर्मचारी पुण्यातील हिंजवडी, शिवाजीनगर आणि बोटक्लब रस्त्यावरील विकास केंद्रात काम करतात. ताज्या घटनाक्रमानंतरही या कर्मचाऱ्यांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. मात्र, वातावरण सामान्य दिवसांपेक्षा वेगळे होते. सत्यम कॉम्प्युटरच्या पुणे केंद्रांवर गुरूवारपासून मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नियमित कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही कंपनीच्या आवारात प्रवेश दिला जात नव्हता आणि आत असणाऱ्या सर्वामध्ये कंपनीचे पुढे काय होणार याचीच चर्चा प्रामुख्याने होती. पुण्याजवळील हिंजवडी या माहिती तंत्रज्ञान वाटिकेत, तीनच महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २००८ मध्ये सत्यमच्या एका मोठय़ा विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आल होते. या केंद्रात सध्या हजारपेक्षा अधिक कर्मचारी काम करीत असून येथील कर्मचाऱ्यांची संख्या २००९ मध्ये जवळपास दुपटीने वाढविण्यात येणार होती. पुणे परिसरात मोठय़ा प्रमाणावर कुशल अभियंते उपलब्ध असल्याने सत्यमने पुण्यावर लक्ष केंद्रित केल होते. कंपनीचेच भवितव्य आता अंध:कारमय झाल्याने आता पुढे काय हा प्रश्न सत्यमच्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना आज सतावत होता.

सामान्य भागधारकांचा शेअर बाजाराबद्दलच भ्रमनिरास!
सत्यमच्या समभागात मुंबई-पुण्यातील अनेक छोटय़ा गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असून सत्यमचा फुगा फुटल्याने या गुंतवणूकदारांना मोठया आर्थिक संकटातून जावे लागणार आहे. सध्या शेअर बाजारात मंदीचा फेरा चालू आहे. यामुळे गुंतवणूकदार अगोदरच अडचणीत सापडला आहे. यामध्ये सत्यमच्या घोटाळ्याची भर पडली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी चढय़ादराने सत्यमच्या शेअरची खरेदी केली होती. आज त्यांच्या या शेअरची किंमत कवडीमोल झाली आहे. मागील वर्षी सत्यमच्या एका शेअरची किंमत जवळपास साडेपाचशे रुपयांपर्यंत गेली होती. या दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची किंमत शुक्रवारच्या व्यवहारात ११.५० रुपयांपर्यंत खाली घसरली होती. भाव इतक्या झपाटय़ाने व भयानकरीत्या घसरले की अनेकांना शेअर विकून मोकळे होण्याचीही संधी मिळाली नाही. सद्यपरिस्थितीत ही कंपनी कोण ताब्यात घेईल, सत्यमच्या शेअरमध्ये अडकलेले पैसे कधी परत मिळतील याचीच चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. पण सत्यमपासून हात पोळलेल्या गुंतवणूकदारांचा एकंदर शेअर बाजाराबद्दल भ्रमनिरास झाला असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.

भारतात प्रथमच ‘वंडर इयर्स बाय मफतलाल’
व्यापार प्रतिनिधी: अरविंद मफतलाल समूहातील ‘मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड’ने ‘वंडर ईयर्स बाय मफतलाल’ या ब्रँड नावाखाली अनोखी गणवेश संकल्पना शाळांसाठी आणली आहे. मुंबईतल्या ग्रँट रोड येथील हॉटेल कृष्णा पॅलेसमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या प्रदर्शनवजा परिषदेत ही संकल्पना सादर करण्यात आली. या प्रदर्शनात सूटिंग्ज, तयार कपडे, विविध प्रकारचे शर्टिग आणि सूटिंग्ज यासह संपूर्ण मफतलाल श्रेणीतील फॅब्रिक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मफतलाल ही कंपनी एअर इंडिया, जेट एअरवेज, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र लि., एसकेएफ, कमिन्स इंडिया, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, मुंबई महापालिका शाळा, औरंगाबाद महापालिका शाळा, पुणे महानगरपालिका शाळा, सुरत महापालिका शाळा, नाल्को, टाटा ग्रूप कंपनीज, एमटीएनएल, नवोदया विद्यालय समिती स्कूल, पोलीस खाते, राज्य वाहतूक, नौदल, हवाई दल, निमलष्करी दल, यु. एस. फोर्स आदी विविध कंपन्यांना शाळेचे तयार गणवेश तसेच कार्यालयीन गणवेशांचा पुरवठा करीत आहे. आता भारतातील आपल्या विस्तृत जाळ्यामार्फत शाळांना तयार गणवेश पुरविण्यासाठी मफतलालने प्रारंभ केला आहे.