Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९

सर्वेशची ‘सौंदर्यचित्रे’!
सर्वेश हरीवल्लभदास हा १८ वर्षांचा तरुण सध्या सीएचे प्रशिक्षण घेत आहे. परंतु चित्रकलेच्या छंदाने त्याला नेहमीच प्रोत्साहित केले. डोनाल्ड डक, मिकी माऊस, अमर चित्रकथा, वॉल्ट डिस्ने यांची व्यंगचित्रे यांचे अवलोकन करून सर्वेश चित्रकार झाला. राजा रविवर्मा, जॉन फर्नांडिस यांच्या चित्रांनी सर्वेशला प्रेरणा दिली. जॉन फर्नांडिस यांच्या स्त्रीचित्रांनी सर्वेशला भुरळ घातली. सर्वेशनेही स्त्रियांची सौंदर्यरूपे रेखाटली. चारकोल व पेस्टल रंगावर सर्वेशचा चांगलाच हातखंडा आहे. देवदास, जोधा अकबर यांची श्रीमंती रेखाटण्याचा प्रयत्न सर्वेशने केला आहे. नॅशनल जिओग्राफीवरील प्रसिद्ध अफगाण मायलेकी, अफगाण मुलींचे घारे डोळे, गजरा घातलेली सौंदर्यवती, बाईचा पाठमोरा

 

आंबाडा, केस सोडलेली तरुणी, मांजरांमध्ये रमलेली लहान मुलगी, प्रेमीयुगुल, पाश्चिमात्य मुली, राजस्थानच्या पारंपरिक पेहरावातील महिला, सिंह व छाव्याचे ऐटीत दर्शन, महात्मा गांधी व संतांचे व्यक्तिचित्र यांची चित्रे सर्वेशने रेखाटली आहेत. चारकोल व पेस्टल रंगांचा वेधक वापर सर्वेशने केला आहे. भारतीय स्त्रीचित्रांचे बारकावे, त्यांचे अनोखे सौंदर्य, विविध रंगछटा या प्रदर्शनात पाहायला मिळतात. तरुणांची देखणी व्यक्तिचित्रे सर्वेशने रेखाटली आहेत. हे प्रदर्शन सध्या आर्ट देश द स्टुडिओ आर्ट गॅलरी, पहिला
मजला, फिल्म सेंटर बिल्डिंग, ६८, ताडदेव रोड, मुंबई-३४ येथे भरले भरले असून १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना ते पाहता येईल.
प्रतिनिधी

प्रखर.. तरीही शीतल प्रकाश!
आयुष्यभर कसला ना कसला ध्यास घेतलेले आणि केवळ खरेपणाच जपणारे प्रकाशभाई आजही सानेगुरुजी विद्यालयाचे संस्थापक आहेत. ९ जानेवारी १९१९ ला जन्मलेले प्रकाशभाई ९० व्या वर्षीही हे करू शकतात. प्रवास, बदलतं हवामान आणि अन्नपाणी हे सारं सहन करून काम करत राहण्यासाठी कुठून येत असेल ही शक्ती, हा उत्साह, ही ऊर्जा? नितळ निळ्या आभाळात लुकलुकणाऱ्या एखाद्या तेजस्वी चांदणीने पटकन लक्ष वेधून घ्यावं तसे प्रकाशभाईंचे म्हणजे प्रकाशभाई मोहाडीकरांचे डोळे आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांना त्यांच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांतून मिस्कील हसताही येतं. आपण त्या हसण्याच्या चांदण्याकडे खुळावल्यासारखं पहात राहतो. नव्वदाव्या वर्षीही भूतकाळातले अचूक संदर्भ देत, स्वच्छ आणि स्पष्ट विचार मांडणारं त्यांचं बोलणं आपण ऐकायला लागतो आणि ऐकतच राहतो. हळूहळू त्यांच्या डोळ्यातल्या चांदण्यांचं तेज आपले डोळे दिपवण्याइतकं प्रखर होत जातं. त्या प्रखर प्रकाशात दिसायला लागतात एक वेगळेच प्रकाशभाई! प्रकाशभाई? नाही त्यांचं खरं नाव लक्ष्मण मोहाडीकर!

ब्लाइंडनेस
साच्यातून दर्शनिकतेकडे..

१९९५ मध्ये पोर्तुगीजमध्ये प्रकाशित झालेल्या (आणि १९९७ मध्ये इंग्रजीत ‘ब्लाइंडनेस’ या नावाने प्रकाशित झालेल्या) जोसे सारामॅगो याच्या प्रसिद्ध कादंबरीवरील ‘ब्लाइंडनेस’ या इंग्रजी चित्रपटाने गेल्या वर्षीच्या ‘कान’ महोत्सवाचे उद्घाटन झाले होते. फर्नाडो मेयरलेस दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेत हॉलीवूडच्या एका साच्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या शहरात वा देशात अचानक एखाद्या अनाकलनीय रोगाचा (शारीरिक वा मानसिक) प्रसार होऊन सारी जनता रोगग्रस्त, वेडीपिशी होते, शहराच्या, देशाच्या नागरी व्यवस्थेची विधूळवाट लागते आणि रोगग्रस्त माणसं जगण्याच्या प्रयत्नात एकमेकांच्या जिवावर उठतात, संस्कृतीची धूळधाण उडते- हा तो फॉम्र्युला. ‘ब्लाइंडनेस’मधल्या शहरात एकाएकी माणसं एकापाठोपाठ एक आंधळी होऊ लागतात. डोळ्यासमोर पांढऱ्याफेक रंगाशिवाय काहीच दिसत नाही. हा संसर्गजन्य रोग पाहता पाहता पसरतो. डोळ्यांचा तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा रोगग्रस्त होतो. सुरुवातीला या सर्व रोगग्रस्तांची रवानगी सरकारच्या आरोग्य यंत्रणेतर्फे क्वारंटाइनमध्ये करण्यात येते. एकेकाळच्या मनोरुग्णालयाच्या आता रिकाम्या झालेल्या इमारतीत हे क्वारंटाइन उभारण्यात येते. संसर्ग होऊ नये म्हणून क्वारंटाइनवर सैन्याचे पहारे बसवले जातात. अंध झालेल्या डॉक्टर (मार्क रफॅलो)ची पत्नी (ज्युलियाना मूर) हिला सुदैवाने या रोगाची लागण होत नाही, मात्र पतीची काळजी घेण्यासाठी हट्टाने त्याच्याबरोबर क्वारंटाइनमध्ये दाखल होते. उत्तरोत्तर क्वारंटाइनमध्ये डांबल्या जाणाऱ्या (होय, आता त्यांचे प्रवेश हे डांबलं जाणंच असतं.) रोग्यांची संख्या वाढत जाते. क्वारंटाइनमधल्या सोयी, बाहेरून पुरवले जाणारे अन्नपदार्थ यांची कमतरता भासू लागते आणि जगण्याच्या धडपडीत या आंधळ्यांच्या जगातली मानवी संस्कृती उद्ध्वस्त होऊ लागते.

हॉलीवूड बॉलीवूडला गिळंकृत करेल?
जागतिकिकरणाच्या प्रवाहात जगभरातील सगळे चित्रउद्योग अमेरिकी चित्रपट उद्योगाने गिळंकृत केले असले, तरी बॉलीवूडने त्यापुढे नांगी टाकली नाही, त्याला तसूभर धक्का लावण्याचेही हॉलीवूडला कधी जमले नाही, या भ्रमात आपण अजून किती दिवस राहणार ? आता दिवस बदललेत आणि भारतीय चित्रपट उद्योगही हॉलीवूम्डने गिळंकृत करायला सुरुवात झाली आहे. एकीकडे वॉल्ट डिझ्ने आणि सोनी भारतीय कंपन्यांमधील गुंतवणूक वाढवून त्यांचा ताबा घेण्याच्या प्रतिक्षेत असतानाच ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटाद्वारे वॉर्नर ब्रदर्स हा मातब्बर स्टुडियो या वर्षांतील सर्वात खर्चिक निर्मिती घेऊन बॉलीवूडच्या मार्केटमध्ये उतरत आहे, तो येथील बाजारपेठ ताब्यात घेण्याच्या इराद्यानेच. गेली दोन वर्षे या कंपनीकडून हिंदी चित्रपट बनविण्याच्या केवळ बातम्या पसरविल्या जात होत्या. पण या आठवडय़ात या कंपनीने एकाएकी सक्रिय होत या आठवडय़ात चार हिंदी आणि एक तामिळ चित्रपटांची घोषणा केली आहे. अत्यंत वेगात ही घोषणा करण्याचं कारण भारतीय बाजारपेठ मोठी आहे, इथे खोऱ्यानी पैसा आहे, अन् अमेरिकेत तो संपलाय अशातला भाग अजिबात नाही. तर बॉलीवूडचा या चित्रउद्योगाने हॉलीवूडसमोर जी आव्हाने उभी केलीत, त्यांना उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या संपूर्ण वर्षभरात जगातील १२ टक्के बाजारपेठ बॉलीवूडने काबीज केली असून उत्तर अमेरिका आणि युरोपातील हॉलीवूडच्या निर्विवाद वर्चस्वाला धक्का दिला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आत्मा सिंग यांच्या ‘अ‍ॅन एशियन सेंच्युरी मॅनीफेस्टो- ग्लोबल पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ ट्वेंटीवन सेंच्युरी’ या ग्रंथात याचा आकडेवारीसह दाखला दिला आहे.त्यात त्यांनी म्हटलंय, की अमेरिका आणि युरोपात टॉम क्रूझची येवढीच क्रेझ आमिर व शाहरुख या अभिनेत्यांचीही आहे. तेव्हा बॉलीवूडच्या घोडदौडीला थांबविणे या स्टुडियोजसाठी महत्त्वाचे बनले आहे. परदेशातील भारतीयांचा प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवत असल्याच्या थापा मारत, त्यांच्यासाठी ‘लो’ (पण इकडचं ‘बीग’) बजेट वाटणाऱ्या फिल्म आणण्याच्या विचारात दोन वर्षे घालविणारी वॉर्नर ब्रदर्स यावर्षी अनेक भारतीय चित्रपटांसह येत आहे. ‘चांदनी चौक’ने वार्नरला चांगले यश मिळवून दिले, तर वॉर्नरपाठोपाठ हॉलीवूडचे आणखीही काही स्टुडियो भारतीय बाजारपेठेत उतरण्याच्या तयारीत असल्याचे सध्या चित्र आहे.
जेसिका अल्बा आणि भारतीय स्वागत
हॉलीवूडची ‘हॉट’ गटात मोडणारी अभिनेत्री जेसिका अल्बा गेल्या वर्षी ‘लव्ह गुरू’ या चित्रपटासाठी साडीत वावरली, तेव्हा आपल्याकडल्या झाडून साऱ्या गॉसीप दैनिके, वाहिन्यांची आकर्षक फोटोंची आणि या घटनेच्या चर्चेने मजकुराची भली मोठी गरज काही दिवसांसाठी भागवली होती. सतत फ्लॉप चित्रपट देऊनही सलग दोन वेळा जगातील सर्वात ‘मादक’ अभिनेत्री म्हणून मिरविण्याचा मान तिने कसा बरे पटकावला असेल, हा एक कुतूहलाचा विषय आहे. पण केवळ साडी घातल्याने भारतीय चित्रपटात भूमिका मिळविणारी ती जगातील एकमेव व्यक्ती असेल हे मात्र खरं. गोव्यात गेल्या वर्षी झालेल्या बहुचर्चित ‘स्कार्लेट कीलिंग’ हत्या प्रकरणावर वार्नर ब्रदर्स दक्षिणेतील पहिला चित्रपट बनवत आहे. यातील सोळा वर्षीय स्कार्लेट कीलिंगची भूमिका अठ्ठावीस वर्षीय जेसिका अल्बा वठवणार आहे. तिचं वय जरी अठ्ठावीस असलं तरी ‘बिल’, ‘अवेक’ आणि ‘द आय’ या ताज्या चित्रपटात ती खरोखरीच सध्या असलेल्या वयाच्या निम्म्या वयातील दिसत आहे. त्यामुळे तिला ही भूमिका मिळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत वॉर्नर ब्रदर्ससोबत या चित्रपटाची सहनिर्मिती करणार असून ‘गोवा’ हे चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. मुख्य असली तरी स्कार्लेट कीलिंगवर बलात्कार करून हत्या होण्याच्या चित्रपटातील अत्यल्प भागापलीकडे भूमिका नसणार, हे स्पष्ट असलं तरी वृत्त शोधक दैनिकांनी आत्तापासूनच जेसिका अल्बाच्या भारतातील स्वागतासाठी बातम्यांच्या पायघडय़ा घालायला सुरुवात केलीय.
‘अ‍ॅन्ड गोल्डन ग्लोब गोज टू’
‘ऑस्कर’नंतर सर्वात प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यंदापासून भारतीयांनाही पाहायला मिळणार आहे. यापूर्वी फक्त या सोहळ्यातील निवडक दृश्ये, वृत्तपत्रांतील छायाचित्रे आणि कुठल्याशा वाहिनींवरील थोडेसे, पण शिळे प्रसारण यावर आपल्या प्रेक्षकांना समाधान मानावं लागत होतं. पण ‘यूटीव्ही वर्ल्ड मुव्हीज’ने गुरुवारी या पारितोषिक सोहळ्याच्या सार्क देशांमधील (पाकिस्तान वगळून) थेट प्रसारणाचे हक्क तीन वर्षांसाठी विकत घेतले आहेत. ज्याद्वारे ११ जानेवारी रोजी रात्री अमेरिकेत सुरू होणारा हा सोहळा १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आपल्याला ‘लाईव्ह’ पाहायला मिळेल. यंदा ‘स्लमडॉग मिलियेनर’ हा संपूर्ण भारतात चित्रीत झालेला सिनेमा आणि त्यासाठी संगीतकार ए. आर. रेहमान या पुरस्काराच्या नामांकनात असल्याने आधीच या पुरस्काराविषयीची उत्सुकता लोकांमध्ये अधिक होती. आता या पुरस्कार सोहळ्यामधील खरी गंमत हॉलीवूम्ड चित्रपटवेडय़ांना थेट अनुभवता येणार आहे.
‘स्लमडॉग आणि डॅनी बॉयल
वेगवेगळ्या देशांमध्ये चित्रपट बनविणाऱ्या ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी ‘स्लमडॉग’च्या निमित्ताने भारत पहिल्यांदाच पाहिला, पण जगातील कुठल्याही भागाने केले नसेल इतके मुंबई शहराने त्यांना प्रभावित केले. एकाचवेळी नजरेत भरणारी इथली चकचकीत श्रीमंती आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या गरीबीच्या दर्शनाने अक्षरश हादरवून सोडल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. ‘स्लमडॉग मिलियेनर’ या चित्रपटात लहान मुलांची कामे करणाऱ्या झोपडपट्टीमधीलच एका महत्त्वाच्या पात्राला शूटींगसाठी येण्यास उशीर झाला म्हणून शोघ घेतला असता, त्या मुलाची झोपडी तोडण्यात आल्याने रस्त्यावरील एका गाडीजवळ झोपलेल्या अवस्थेत त्यांना तो सापडला. या घटनेचा तीव्र परिणाम झालेल्या डॅनी बॉयल यांनी इथल्या झोपडपट्टीतील मुलांचे अत्यंत वाईट अवस्थेतील जगणे काही अंशी दूर व्हावे यासाठी मदत निधी उभारायचे ठरविले आहे. ज्याद्वारे या मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यास तसेच उच्च शिक्षणात कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची काळजी घेतली जाणार आहे. या मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था भरपूर असल्या, तरी त्यांच्याकडून होणारी मदत प्रत्यक्षात किती तोकडी आहे, याची जाणीव भारताशी आत्तापर्यंत कसलाही संबंध नसलेल्या एक ब्रिटिश दिग्दर्शकालाही होऊ शकते, पण सिनेमासाठी हा विषय घेऊन गल्ला भरू पाहणाऱ्या, वर वास्तवतेचा बुरखा पांघरणाऱ्या आपल्याकडल्या दिग्दर्शकांमध्ये नाही, याची खंत वाटते. ‘बाल दिना’च्या निमित्ताने वार्षिक सोहळ्यात रस्त्यावरील मुलांसोबत काही काळ घालवून वृत्तपत्रात छायाचित्रे प्रसिद्ध करणारे बॉलीवूड कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यापुढे आदर्श निर्माण करण्याचे काम डॅनी बॉयल यांनी मदतनिधी उभारण्याच्या निमित्ताने केले आहे.
पंकज भोसले