Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
ग्रंथविश्व

कृषिक्रांतीच्या शिल्पकाराची यथायोग्य दखल
‘कृषिक्रांतीचा सेनानी’, ‘शेतीज्ञानाचा चालताबोलता ज्ञानकोश’ अशा शब्दात ज्यांचा गौरव होतो, ते स्व. अण्णासाहेब िशदे १९६२ ते १९७७ कृषिउपमंत्री, कृषिराज्यमंत्रीपदी होते. मात्र त्यांच्या कर्तृत्वाची देशाने योग्य दखल घेतलेली दिसत नाही. उलट सी. सुब्रमण्यम यांना देशाच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून १० वर्षांपूर्वीच ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. सी. सुब्रमण्यम विद्वान होतेच; पण जून १९६४ ते जानेवारी १९६७ अशी अवघी अडीच वर्षे ते कृषिमंत्री होते. याच काळात भारत-पाक युद्ध झाले. ताश्कंद करारानंतर शास्त्रीजींचे निधन झाले. १९६७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मद्रासमध्ये डी. एम. के.ची लाट आली. या लाटेत सुब्रमण्यम यांचा पराभव झाल्याने त्यांना मंत्रिपदाला मुकावे लागले. अशा अस्थिरतेच्या काळात अवघ्या अडीच वर्षांत सुब्रमण्यम यांनी भारताच्या शेतीचा कायापालट केला काय? सुब्रमण्यम यांनी स्वत:च म्हटले आहे की, मी शेतकरी नव्हतो. त्यामुळे मंत्री होईपर्यंत मला शेतीप्रश्नांची जाण नव्हती!
हरितक्रांतीच्या मागे ज्यांचे परिश्रम होते, त्या अण्णासाहेब शिंदे यांच्या कामाचा आलेख अमेय प्रकाशनच्या ‘हंग्री नेशन टु अ‍ॅग्रो पॉवर-अण्णासाहेब िशदे’ या ग्रंथात मांडला आहे. १९६६-६७ साली इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्चमध्ये काम केलेले कृषितंत्रज्ञ डॉ. स्वामीनाथन, ए. बी. जोशी, डॉ. कन्वर, डॉ. अय्या, ए. बी. भट, रांगणेकर यांच्यासह पं. जवाहरलाल नेहरूंपासून ते राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापर्यंतच्या मान्यवरांनी अण्णासाहेबांच्या कर्तृत्वाचा हा आलेख रेखाटला आहे.
डॉ. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील यांच्याबरोबरीने प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत आघाडीवर असलेले अण्णासाहेब िशदे १९६१ साली पंडित नेहरूंच्या नजरेत भरले. कृषि-सहकाराचा एवढा गाढा अभ्यास असलेला माणूस आपल्याला दिल्लीत हवा अशी इच्छा त्यांनी यशवंतराव चव्हाणांजवळ व्यक्त केली. परिणामी १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णासाहेब शिंदे कोपरगाव मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, ‘अण्णासाहेबांसारखा कृषितज्ज्ञ दिल्लीत गेल्याने देशापुढची कृषिसमस्या माझ्यापुरती सुटली आहे.’
यशवंतरावांचा हा विश्वास अण्णासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून सार्थ ठरवला . पुढची १५ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिउपमंत्री- कृषिराज्यमंत्री या पदावर त्यांनी काम केले. केवळ राजकीय सोय म्हणून अण्णासाहेबांना कृषिमंत्री पदावर कायम ठेवण्यासारखा तो काळ नव्हता. दिल्लीतले नेतृत्वही तेवढे लेचेपेचे नव्हते. स्वर्णसिंग, स. का. पाटील, जगजीवनराम, फक्रुद्दीन अली अहमद, सी. सुब्रमण्यम असे शेतीखात्याचे कॅबिनेट मंत्री या काळात होऊन गेले. स्वामीनाथन एका ठिकाणी म्हणतात, ‘देशाच्या शेतीखात्याला लाभलेले बहुतांश कॅबिनेटमंत्री राजकीय घडामोडीत व्यग्र असत. त्यामुळे कृषिराज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे हेच देशाच्या शेतीखात्याचे सर्वार्थाने प्रमुख होते.’ जगजीवनबाबू व फक्रुद्दीन अली अहमद यांनी तर अण्णासाहेब राज्यमंत्री असतील तरच कृषिखात्याचे कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारतो अशी अटच इंदिराजींना घातली होती.
‘द्रष्टा नेता’ या लेखात कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले होते, ‘पाण्याची टंचाई नेहमीची होती. अण्णासाहेबांनी या संदर्भात खूप लिखाण केलं. प्राप्त पाण्याचा थेंबन्थेंब भूगर्भात कसा जाईल आणि भूजलाची पातळी कशी वाढेल, याचा सखोल विचार अण्णासाहेबांनी केला होता. शेतीला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला पाहिजे. तसेच दूध, पोल्ट्री, रेशीम उद्योग अशा जोडधंद्यांची शेती व्यवसायाला जोड दिली पाहिजे. या भूमिकेतून अण्णासाहेबांनी विचार सखोल केला होता. त्यामुळेच धान्य आयात करण्याच्या कल्पनेला तिलांजली देता आली आणि हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले. पंजाबातला शेतकरी अण्णासाहेबांबद्दल फार आदर बाळगून आहे. गव्हाच्या आणि भाताच्या क्षेत्रात जी क्रांती पंजाबनं केली, तिच्यामध्ये पायाभूत काम अण्णासाहेबांनी केलं आहे. बदलाला सामोरं जाण्यासाठी एक धाडस लागतं ते अण्णासाहेबांकडं होतं. पूर्वी दुधाचं कार्ड मिळवून देण्यासाठी आमदार निवासात लोकांची गर्दी जमत असे. आज अतिरिक्त दुधाची विल्हेवाट लावण्यासंबंधीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि खेडय़ापाडय़ांतल्या बाजारातही सफरचंद, चिकू, स्ट्रॉबेरी, द्राक्षे दिसू लागली आहेत. नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी असताना शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या अण्णासाहेबांची औद्योगिकीकरणाविषयीची दृष्टीही स्पष्ट होती. हरित क्रांती व धवल क्रांती ही अण्णासाहेब शिंदे यांनी देशाला व महाराष्ट्राला दिलेली महान देणगी आहे.’
नाशिक जिल्ह्यातल्या पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळीसारख्या दुर्गम खेडय़ात २१ जानेवारी १९२२ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात अण्णासाहेबांचा जन्म झाला. आईवडिलांना शेतीकामात मदत करता करता अण्णासाहेबांनी शालेय शिक्षण घेतले. मॅट्रिकला सर डी. एम. पेटिट विद्यालयात ते पहिले आले. पुढील शिक्षणासाठी ते बडोदा येथे सयाजीराव महाराज यांच्या आश्रयाला गेले. याच वेळी १९४२ चा स्वातंत्र्यसंग्राम सुरू झाल्याने अण्णासाहेबांनी कॉलेज शिक्षणावर बहिष्कार घातला. ते नाशिकला परतले. पट्टा किल्ल्याच्या परिसरात ‘प्रतिसरकार’ स्थापण्याच्या प्रयत्नाला लागले. अण्णासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली. तुरुंगात असतानाच साम्यवादी विचारसरणीचा अभ्यास करून अण्णासाहेबांनी लेनिनवर एक पुस्तकही लिहिले होते. तुरुंगातून ते कम्युनिस्ट कार्यकर्ता बनूनच बाहेर आले. चळवळीत असतानाच ते एल.एल.बी. झाले.
‘१५ ऑगस्ट ४७ रोजी देशाला मिळालेले स्वातंत्र्य खरे नसून केंद्रातले सरकार उलथून टाका,’ असा ठराव कलकत्ता येथे कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात करण्यात आला. या अधिवेशनाहून परतताच अण्णासाहेबांना अटक झाली. विवेकाची कसोटी लावून, कम्युनिस्ट पक्षाचे धोरण कसे चुकीचे आहे, हे सांगणारे पत्रक अण्णासाहेबांनी प्रसिद्ध केल्यामुळे पक्षाने त्यांना वाळीत टाकले. अशा स्थितीत अडीच वर्षांनी त्यांची सुटका झाली.
कम्युनिस्टांचा बहिष्कार कायम होता. त्यामुळे अण्णासाहेब संगमनेर सोडून श्रीरामपूरला आले. श्रीरामपुरात अल्पावधीत वकिली व्यवसायात त्यांनी जम बसवला आणि डॉ. धनंजयराव गाडगीळ व पद्मश्री विखे-पाटील यांच्या पुढाकाराने प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत सामील झाले. विखेपाटील अध्यक्ष तर अण्णासाहेब उपाध्यक्ष झाले. धनंजयराव गाडगीळ यांच्या बरोबरीने राज्य सहकारी साखर संघाची स्थापना करण्यात अण्णासाहेबांनी पुढाकार घेतला. अण्णासाहेब संघाचे अध्यक्ष झाले. याच वेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याला भेट देण्यासाठी १९६१ साली पंडितजी प्रवरानगरला आले होते. अण्णासाहेबांचे इंग्रजीवरील प्रभुत्व, शेतीप्रश्नांची जाण त्यांच्या नजरेत भरली. सत्य बोलणे, बोलल्याप्रमाणे आचरण करणे, ध्येयनिष्ठेने जीवन व्यतित करणे, समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे, हाच मानवधर्म असे ते मानीत. ही जीवननिष्ठा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. या सगळ्याचा आढावा अण्णासाहेब शिंदे यांच्या जीवनावरील या पुस्तकामध्ये घेतला आहे.
दिनेशचंद्र हुलवळे
हंग्री नेशन टु अ‍ॅग्रो पॉवर
संपादन : अनिल शिंदे; प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे; पृष्ठे : १५०;
किंमत : २२५ रुपये