Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
लोकमानस

विजयाबाई, प्रेक्षकांनाही झापा!
विजयाबाईंच्या तुमच्या मुलाखतीतला ‘प्रेक्षक न यायला, आजची नाटकंच जबाबदार आहेत’ (७ जानेवारी) हा निष्कर्ष कोणीच अमान्य करणार नाही. किंबहुना हा निष्कर्ष याआधी अनेकांनी काढून झाला आहे. पण विजयाबाई, तुम्ही जरा त्याच वडीलकीच्या नात्याने प्रेक्षकांनाही थोडं झापा. खेचून आणावा लागतो तो प्रेक्षक ‘मायबाप’ कसा काय मानायचा?
आजच्या नाटकांचा दर्जा वाईट असतो, हे खरे; पण हे विधान सरसकट करण्यात काय हशील आहे? आजही अनेक वेळेला चांगले प्रयत्न होताना दिसतात. या प्रयत्नांना किती प्रेक्षक लाभतो? तुमच्या काळात काय सगळीच नाटकं उच्च दर्जाची होत होती का? तुम्ही केलेल्या सर्व नाटकांचा दर्जा उच्च होता, असा दावा तुम्हीही करणार नाही. पण तेव्हाचा प्रेक्षक संयमी होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासमोर करमणुकीचे इतर पर्यायही नव्हते. आज एकंदरच जगण्याचा वेग वाढला आहे म्हणून नवीन आलेलं चांगलं पटकन जुनं होतं आणि आणखी काही चांगलं नवीन समोर येतं. उदाहरणच द्यायचं झालं तर लता-आशा या मंगेशकर भगिनींनी अनेक तपं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं पण आज त्यांच्याच तोडीच्या अनेक टॅलेंट्स सतत रसिकांच्या समोर येत असतात. (त्याही काळी लता मंगेशकरांना मीडिऑकर म्हणणारे समीक्षक होतेच).
आज विनोदी उथळ नाटकांना गर्दी होताना दिसते. ‘आम्हाला इतकी टेन्शन आहेत आणखी तुमची नाटकातली टेन्शन नकोत’, असं म्हणत हा प्रेक्षक फक्त विनोदी नाटकांना जातोय. तेव्हा प्रॉब्लेम प्रेक्षकांमध्येही आहे! उत्तम रसिकच उत्तम कलावंत घडवू शकतो. आजही अनेक ठिकाणी प्रेक्षकसंस्था आहेत. पण त्या चालवणाऱ्यांची कैफियत असते की, हे प्रेक्षक शक्यतो स्वत:च्या गावात नाटक आणायला सांगतात. गावात आणलं तर गल्लीत आणायला सांगतात. गल्लीत आणलं तर यांच्या घरासमोर, त्यांची जेवणं वगैरे आटोपल्यावर नाटक सुरू करायला सांगतात! आज त्या प्रेक्षकाला घराबाहेर पडायची वा बघायची इच्छा नाही. तेव्हा ते मुंबईच्या टोकला असलेल्या एन.सी.पी.ए.मध्ये येण्याची शक्यताच नाही.
महेंद्र तेरेदेसाई, मुलुंड, मुंबई
बुद्धीला चालना देणारी शाखा
त्रिकालवेध (३ जानेवारी) या सदरातील ‘अस्तित्त्वाच्या ज्ञानाचा वेध’ हे प्रथम स्फुट वाचले. मानवाच्या उत्क्रान्त मेंदूमुळे त्याने काळाचे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन खंड केले. खरे पाहता काळ हा प्रवाही आणि अखंड असतो. परंतु मानवाची स्मृतिक्षमता ही इतर प्राण्यांच्या तुलनेत तीक्ष्ण व समावेशक असल्यामुळे त्याला काळाचे आकलन उत्तम झाले आहे.
प्राण्यांना, पक्ष्यांना भविष्याची चाहूल लागते. येणाऱ्या ऋतुप्रमाणे ते घरटी बांधतात, अन्नाची बेगमी करतात. पण त्यांना भविष्याचे ज्ञान उपजत असते. त्यासाठी त्यांना विचार करावा लागत नाही. निसर्गाने हे सर्व त्यांच्या मेंदूत ‘हार्ड वायर्ड’ केलेले असते. मानव प्राणी मात्र त्याच्या विचारक्षमतेमुळे ज्ञानाची म्हणजे नवीन ज्ञानाची निर्मिती करतो. या नवीन ज्ञानाच्या आधारे तो भविष्याचा वेध घेतो.
मानवाला त्याचे ज्ञान सीमित आहे, याची जाणीव असते. अज्ञानाचा सागर अथांग आहे पण आपल्याजवळ असलेले ज्ञान मात्र मर्यादित आहे, हा विचार मानवाच्या शोधकलेचा ‘विस्तव’ असतो. म्हणून तर काही वर्षींपूर्वी ‘एनसायक्लोपीडिया ऑफ इग्नरन्स’ (अज्ञानाचा ज्ञानकोष) प्रकाशित झाला होता. म्हणूनच ‘फ्युचरॉलॉजी ही बुद्धीला चालना देणारी ज्ञान शाखा’ म्हणता येईल.
डॉ. आनंद जोशी, बोरिवली, मुंबई
अस्सल ग्रामीण साहित्य
‘डॉ. आनंद यादव यांच्या साहित्यावर टीका शंकरची’ ही (२८ डिसेंबर) बातमी वाचली. डॉ. आनंद यादव यांचे साहित्य अस्सल ग्रामीण बाज असलेले लेखक. त्यांच्या कथा- कादंबरीत येणारी पात्रंदेखील ग्रामीणच आहेत. पण म्हणून ते साहित्य टाळून कसं जमेल!
साहित्य हे साहित्यच असतं. मग ते कल्पनेतून फुलत जावो किंवा सत्य घटनेवर लिहिले जावो. साहित्यावर समाज घडत असतो आणि येणाऱ्या नवीन पिढीतल्या वाचकावर/ लेखकावर त्याचा परिणाम होत असतो. वाचकांवर साहित्याचा होणारा परिणाम पुस्तकाच्या खपावरून दिसतो. पण लेखक त्याचे भांडवल करीत नाही.
‘ग्रामीण साहित्या’ला मर्यादा नसून ग्रामीण साहित्याच्या ‘वाचका’ला मर्यादा आहेत. शहरी भागात ग्रामीण साहित्याचे वाचक कमी आहेत. ग्लोबलायझेशनमुळे सर्वानाच ‘फास्टफूड’ आवडू लागले आहे. सध्या तरी ‘शहरी’ आणि ‘ग्रामीण’ असे प्रमाण ठरविण्यापेक्षा वाचक तयार होणे हेच महत्त्वाचे. टीका करून साहित्यकृतीतील भाषेचा दर्जा ठरविणे हे आत्मकेंद्रीपणाचेच वाटते.
राजन पाटोळे, मुंबई
मानवंदना देताना सभ्यता पाळा
रविवार, ४ जानेवारी रोजी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या गीतांवर आधारित ‘माझे जीवन गाणे’ हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम खूप रंगला. साथ उत्तम, निवेदन उत्कृष्ट, संयोजन देखणे होते. मात्र एकच गोष्ट खटकली. पाडगावकर रंगमंचावर आल्यावर सर्वजण उठून उभे राहिले. पण पाडगावकर उभे असतानाच श्रोत्यांचे खाली बसणे सुरू झाले. मला वाटते इथे पाश्चात्त्यांचे अनुकरण होईल तर बरे. मान्यवर व्यक्ती स्थानापन्न होईपर्यंत रसिक उभेच राहतात, अशी मानवंदना आपणही दिली पाहिजे.
विद्याधर कात्रे, माहीम, मुंबई