Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

* कठोर कारवाईच्या भीतीमुळे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा संप मागे
* इंधन पुरवठा पूर्ववत होण्यासाठी दोन-तीन दिवस लागणार

नवी दिल्ली, ९ जानेवारी/खास प्रतिनिधी

संपूर्ण देशातील वाहतूक ठप्प करून अर्थव्यवस्थेला वेठीस धरीत सर्वत्र हाहाकार माजविणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा संप आज केंद्र सरकारच्या कठोर कारवाईच्या इशाऱ्यामुळे अखेर संपुष्टात आला. पण तीन दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या टंचाईचा नाहक सामना कराव्या लागणाऱ्या देशवासियांना लगेच दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. हा संप मिटल्यामुळे पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्यासह केंद्र सरकारचा जीव भांडय़ात पडला असून देशवासियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, इंधन पुरवठा पूर्ववत होण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील, असे देवरा यांनी म्हटले आहे.

राम गबाले यांचे निधन
पुणे, ९ जानेवारी/विशेष प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राम नारायण गबाले (वय ८५) यांचे आज सकाळी मूत्रिपडाच्या विकाराने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या निधनाने विविध विषय कौशल्याने हाताळणारे जुन्या पिढीतील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि कन्या असा परिवार आहे. वृद्धापकाळामुळे गेल्या काही महिन्यांपासून गबाले यांचे फिरणे बंद झाले होते. तीन आठवडय़ांपूर्वी त्यांचा मूत्रपिंड विकाराचा आजार बळावला. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी त्यांना सिंहगड रस्त्यावरील त्रिमूर्ती हॉस्पिटल या त्यांच्या मुलीच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते.
(अल्पचरित्र,मान्यवरांची श्रद्धांजली)

बलात्काराच्या खटल्यासाठी दोन महिन्यात निवाडा बंधनकारक
फौजदारी प्रक्रिया संहितेतील नवे बदल - १

दत्ता सांगळे
औरंगाबाद, ९ जानेवारी

फौजदारी प्रक्रिया संहितेतील नव्या बदलाला लोकसभेत नुकतीच मान्यता देण्यात आली. यानुसार यापुढे बलात्काराचा खटला महिला न्यायाधीशासमोरच चालविण्यात यावा आणि कोणत्याही परिस्थितीत तो दोन महिन्यांत निकाली निघावा, असे बंधन घालण्यात आले आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अशा गुन्ह्य़ाच्या खटल्यांमध्ये वकीलांना तारखेवर तारीख मागून घेता येणार नाही. बलात्काराच्या खटल्याची प्रत्येक सुनावणी बंद खोलीत व केवळ संबंधितांपुढेच (‘इन कॅमेरा’) घेण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत हे कायद्याने बंधनकारक नव्हते. मागणीनंतर न्यायाधीश ते ठरवत असत. ही प्रकरणे दोन महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत सुनावणी होऊन त्यावर निकाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी वकिलांना पुढील तारीख मागताच येणार नाही. वकील अन्य खटल्याच्या युक्तिवादात व्यग्र आहे, हे कारणही यापुढे देताच येणार नाही. शिवाय पक्षकाराचे वकील आजारी आहेत, ही सबबही चालणार नाही. वकील खरेच आजारी असला तरीही सुनावणी खंडित ठेवता येणार नाही. वकील नसेल तर न्यायालय स्वत:च साक्षीदाराची उलटतपासणी करील आणि योग्य तो निर्णय देईल, असे या कलमात म्हटले आहे.

मंदीला फटकारून गझनीचा २०० कोटींचा गल्ला!
समर खडस
मुंबई, ९ जानेवारी

जागतिक मंदी, सत्यम कॉम्प्युटर्सचा घोटाळा, शेअर बाजाराचे वाजलेले बारा या सगळ्या नन्नाच्या पाढयाला झिडकारून गझनी या अल्लू अरविंद आणि मधू मंतेनाच्या ‘गझनी’ने आज दुसरा आठवडा संपताना चक्क २०० कोटींवर झेप घेतली आहे. ‘गझनी’च्या या यशाने भारावून जाऊन हॉलिवूडमधील काही तज्ज्ञदेखील बॉलिवूम्ड प्रेक्षकांच्या या तुफान प्रतिसादाचा अभ्यास करण्यासाठी येत्या काही दिवसांत मुंबईत येणार आहेत. यात मल्टिप्लेक्सचे मालक, व्यवस्थापक आणि प्रेक्षक यांच्या भेटीगाठी हॉलिवूडची ही टीम घेणार आहे. सविस्तर वृत्त

‘शालेय क्रिकेटला अधिक महत्त्व द्या’
मुंबई, ९ जानेवारी / क्री. प्र.

शालेय क्रिकेट हा मुंबई क्रिकेटच्या यशाचा पाया होता. तो पाया मजबूत करण्यासाठी हॅरिस, गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धाना अधिक महत्त्व द्या. प्रत्येक शाळेला या स्पर्धासाठी किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळावी. त्यायोगे संघातील प्रत्येक खेळाडूला आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळेल, असे आवाहन सचिन तेंडुलकर याने आपल्या सत्काराप्रसंगी केले. सविस्तर वृत्त

‘सत्यम’च्या रामलिंग राजू यांची शरणागती
नवी दिल्ली, हैदराबाद, ९ जानेवारी/पीटीआय

कोटय़वधी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून सत्यम कम्प्युटर या कंपनीला गाळात घालणारे त्या कंपनीचे संस्थापक रामलिंग राजू आज रात्री पोलिसांसमोर शरण आले. रामलिंग राज यांनी आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक एस. एस. पी. यादव यांच्यासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर राजू आणि त्यांचा भाऊ रामजू यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, सत्यम महाघोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारने धडक कृती करताना, सत्यमचे विद्यमान संचालक मंडळ व हंगामी व्यवस्थापन दोहोंना बरखास्त करून, नवीन १० नामनिर्देशित संचालक नियुक्त करण्याचा निर्णय आज रात्री जाहीर केला. दरम्यान सत्यमचे घोटाळेबाज माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांना आज सेबीने चौकशीसाठी समन्स धाडले. तब्बल ७,८०० कोटींच्या घरात जाणाऱ्या या आर्थिक घोटाळ्यासंबंधाने राजू उद्या सत्यमच्या हैदराबादस्थित मुख्यालयात सेबीच्या चौकशी पथकापुढे साक्ष देणे अपेक्षित आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागानेही राजू यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.कंपनी लॉ बोर्डाकडून सत्यमच्या नवनियुक्त संचालक मंडळाचे गठन केले जाणार असून, नव्या संचालक मंडळाची सात दिवसांत बैठक बोलाविली जाईल. या बैठकीतच कंपनीच्या व्यवस्थापनाची धुरा कोणावर सोपवावी याचा निर्णय घेतला जाईल.

सत्यमच्या शेअर्सचा पालापाचोळा
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

घोटाळाग्रस्त सत्यमच्या समभागांचा शेअर बाजारात पालापाचोळा झाला असून आज हा समभाग दिवसभरात तब्बल ८४ टक्क्यांनी घसरला. बुधवारच्या सुट्टीनंतर आज बाजार उघडला त्यावेळी सत्यमच्या समभागांचे काय होते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रातच हा समभाग ४० टक्क्यांनी घसरुन २३.७५ रुपयांवर घसरला. त्यानंतर या समभागांची घसरण काही थांबली नाही आणि हा समभाग ६.३० रुपयांवर कोसळला. त्यानंतर या समभागांची थोडय़ाफार प्रमाणात खरेदी सुरु झाली. बाजार बंद होते वेळी हा समभाग २३.७५ रुपयांवर स्थिर झाला.

मालवाहतूकदार काँग्रेसच्या अध्यक्ष, सरचिटणीसांना अटक
नवी दिल्ली, ९ जानेवारी/खास प्रतिनिधी

सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा संप तीन दिवसात संपला असला तरी मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप आज पाचव्या दिवशीही सुरुच राहिला. हा मोडीत काढण्यासाठी अ. भा. मालवाहतूकदार काँग्रेसचे अध्यक्ष चरणसिंह लोहारा आणि सरचिटणीस एस. वेणुगोपाल यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली. तरीही हा संप सुरुच राहील, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८