Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

राम गबाले यांचे निधन
पुणे, ९ जानेवारी/विशेष प्रतिनिधी

 
मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राम नारायण गबाले (वय ८५) यांचे आज सकाळी मूत्रिपडाच्या विकाराने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या निधनाने विविध विषय कौशल्याने हाताळणारे जुन्या पिढीतील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि कन्या असा परिवार आहे.
वृद्धापकाळामुळे गेल्या काही महिन्यांपासून गबाले यांचे फिरणे बंद झाले होते. तीन आठवडय़ांपूर्वी त्यांचा मूत्रपिंड विकाराचा आजार बळावला. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी त्यांना सिंहगड रस्त्यावरील त्रिमूर्ती हॉस्पिटल या त्यांच्या मुलीच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचार सुरू असताना आज सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लहान मुलांसाठी उत्तमोत्तम चित्रपट तयार करणाऱ्या दिग्गजांमध्ये गबाले यांचा समावेश होता. मा. विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या संस्थेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शनाबाबत स्वतचा वेगळा ठसा त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर उमटवला. मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी देशभक्तीपर आणि समाजहिताच्या विषयांवर ७० हून अधिक चित्रपट केले. ‘दूधभात’, ‘देवबाप्पा’, ‘जशास तसे’, ‘मोठी माणसे’, ‘पोस्टातली मुलगी’, ‘छोटा जवान’ असे एकाहून एक सरस असे २५ कथाप्रधान चित्रपट; ‘शेर शिवाजी’सारखे दहाहून अधिक बालचित्रपट त्यांनी रसिकांना दिले. शंभराहून अधिक अनुबोधपट, सुमारे पंधरा टेलिव्हिजन, व्हिडिओ फिल्म, मालिका आणि टेलिफिल्मशी ते दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक या नात्याने निगडित होते. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांना ‘गांधी’ या चित्रपटासाठी नियोजन करण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले होते. पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’ या चित्रपटाच्या निर्मितीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी अनेक माहितिपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.