Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

मंदीला फटकारून गझनीचा दोन आठवडय़ात २०० कोटींचा गल्ला!
हॉलीवूडची टीम येणार मुंबईत
समर खडस
मुंबई, ९ जानेवारी

 
जागतिक मंदी, सत्यम कॉम्प्युटर्सचा घोटाळा, शेअर बाजाराचे वाजलेले बारा या सगळ्या नन्नाच्या पाढयाला झिडकारून गझनी या अल्लू अरविंद आणि मधू मंतेनाच्या ‘गझनी’ने आज दुसरा आठवडा संपताना चक्क २०० कोटींवर झेप घेतली आहे. मधू मंतेना (वर्मा) आणि अल्लू अरविंद यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ‘गझनी’च्या या यशाने भारावून जाऊन हॉलिवूडमधील काही तज्ज्ञदेखील बॉलिवूम्ड प्रेक्षकांच्या या तुफान प्रतिसादाचा अभ्यास करण्यासाठी येत्या काही दिवसांत मुंबईत येणार आहेत. यात मल्टिप्लेक्सचे मालक, व्यवस्थापक आणि साध्या चित्रपटगृहांमध्ये स्टॉलमध्ये शिट्टय़ा आणि टाळ्यांच्या गजरात चित्रपटाचा आस्वाद घेणारे प्रेक्षक यांच्या भेटीगाठी हॉलिवूडची ही टीम घेणार आहे.
आमिर खानच्या या यशाने आता त्याचा भाव शाहरूख खानपेक्षा अधिक वाढला असल्याचे बॉलिवूडमधील सगळेच मान्य करू लागले असून राजकुमार हिरानीच्या नव्या सिनेमात काम करत असलेल्या आमिरचा मेहनताना म्हणून नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे काही प्रदेशांचे हक्क त्याच्या नावावर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
आमिर खान हा एका दिग्दर्शकाबरोबर एकदाच काम करीत असल्याने गझनीचा दिग्दर्शक मुरुगुदाससोबत पुढील सिनेमा करील किंवा नाही याबाबत शाश्वती नसल्याने आता निर्माता अल्लू अरविंद हा बॉलिवूडमधील एका मोठय़ा दिग्दर्शकाला आणि आमिरला एकत्र आणण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर राम गोपाल वर्माचा दूरचा भाऊ असलेल्या मधू मंतेना याने गझनीच्या या यशानंतर अब्बास टायरवालाच्या स्क्रिप्टवर जॉन अब्राहमला घेऊन नवा बिग बजेट सिनेमा नक्कीही करून टाकला आहे. गझनीचे दुसऱ्या आठवडय़ातील यशाची घोडदौड तिसऱ्या आठवडय़ातही जर अशीच सुरू राहिली तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमांप्रमाणे हा सिनेमाही बॉलिवूडमध्ये उत्पन्नाच्या नव्या विक्रमाला हात घालण्याची शक्यता आहे.
शाहरूख खानचा ‘रब ने बना दी जोडी’ आता १०० कोटींचा धंदा करून थंडावला आहे. आता फक्त अक्षय कुमारचा ‘चांदनी चौक टू चायना’ प्रदर्शित झाल्यानंतरच गझनीच्या या तुफान मेलला काही अंशी ब्रेक लागतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.