Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

भाषा जिवंत ठेवायची असेल तर ती संगणकावर पोहोचली पाहिजे-डॉ. विजय भटकर
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

 
भारतीय भाषांसाठी एकच युनिकोड असावा यासाठी सीडॅकतर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आल्याने आता भारतात संगणकाचा प्रसार अधिक वेगाने होईल असा विश्वास सुपर कॉम्पुटर 'परम संगणक'चे प्रणेते डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्यभवन येथे आयोजित चौथ्या आंतरभारती साहित्य संवाद संमेलनात भटकर बोलत होते. साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक संस्था व गुरूदेव टागोर तौलनिक साहित्याध्यासन यांच्यावतीने दोन दिवसाचे आंतरभारती साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले, संमेलनाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे, साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक संस्थेचे अध्यक्ष सुधीर देसाई, रामदास भटकळ, हरिश्चंद्र थोरात, कवयित्री नीरजा, सुरेश कसले, प्रमुख पाहुणे डॉ. अशोक वाजपेयी आदी व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन शैलेश आवटी यांनी केले. विजय भटकर यांनी त्यांच्या विशेष भाषणात भारताच्या संगणकीय प्रगतीचा आढावा घेतला. जगातील पहिल्या १०० वेगवान सुपर कॉम्पुटरमध्ये चौथा क्रमांक भारताच्या परम संगणकाचा आहे. पहिले तीन सुपर कॉम्पुटर अमेरिकेतील आहेत. भारतीय भाषांना प्राचीन इतिहास आहे. भाषा वाढवायची असेल, जिवंत ठेवायची असेल तर, ती संगणकावर पोचली पाहिजे. भारतात संगणकाचा प्रसार होण्यासाठी भारतीय भाषात संगणकाचे काम करता आले पाहिजे, तर जास्तीत जास्त लोक याचा वापर करतील असे भटकर म्हणाले. भारतीय भाषांसाठी एकच युनिकोड असावा यासाठी सीडॅकतर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले असले तरी, त्यातील ज्या काही त्रूटी असतील त्या दूर केल्या जातील असा विश्वास भटकर यांनी व्यक्त केला.
देवनागरी भाषा वेगळी, दक्षिणेकडील भाषांची लिपी वेगळी, उर्दूमध्ये उलटे लिहिले जाते अशा सगळ्या अडचणींवर मात करीत संगणकाच्या पडद्यावर सगळी अक्षरे नीट दिसतील, त्याचे प्रिंटआऊटस येतील याची दक्षता घेत युनिकोड डिझाईन करण्यात आले. इंग्रजीमध्ये ऑक्सफर्ड, वेबस्टार सारखी शब्दकोश (डिक्शनरी) आहे. त्यामुळे संगणकावर इंग्रजीत टाईपिंग करताना तो स्पेल चेक करीत जातो. आपल्याकडे असा कोणताही एक शब्दकोश नसल्याने भारतीय भाषांच्या स्पेल चेकसाठी सुधारणा करता येत नाही, अशी खंत भटकर यांनी व्यक्त केली. इंटरनेटवर भारतीय भाषांतील खूप कमी मजकूर आहे. संगणकाचे काम आपल्या भाषेत सहजरित्या होऊ लागले तरच, भाषा समृध्द होऊ शकेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल असे भटकर म्हणाले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अशोक वाजपेयी यांनी टीव्हीमुळे आपली विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचे सांगितले. आपण विचार करण्याचे काम दुसऱ्यावर सोपवतो हा भारतीयांचा स्वभाव असल्याचा चिमटा काढत, अनुवादावर वाजपेयी यांनी त्यांचे म्हणणे व्यक्त केले. अनुवाद म्हणजे केवळ भाषांतर नाही. केवळ क था, कविता, आत्मकथा यांचे अनुवाद करण्याबरोबर वैचारिक साहित्याचेसुध्दा अनुवाद होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अनुवाद करताना शब्दश अर्थ बदलताना मूळ कथेच्या ढाच्याला आपण बदलत असतो, तेव्हा अनुवाद करणाऱ्यांनी त्याचे भान ठेवावे असा सल्ला वाजपेयी यांनी दिला. अध्यक्षस्थानावरून बोलताना अर्जुन डांगळे यांनी भाषावाद, प्रांतवाद यातून माणसे माणसापासून दुरावली जात आहेत. साहित्य सर्वाना एकत्र आणू शकते. साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक संस्थेतर्फे गुरूजींच्या जन्मगावी माणगाव येथे अनुवाद सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचा लाभ साहित्यीकांना होणार असल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी उदघाटनप्रसंगी केलेल्या भाषणात विविध संस्कृतींना आणि भाषांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा कार्यक्रम असल्याचे सांगितले. अनुवादाचे भाषेत आणि भाषेचे मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे. साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक संस्था याच आंतरभारतीच्या उद्देशाने प्रेरित झाल्याचे खोले यांनी सांगितले.