Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

रेल्वेत मराठी तरुणांना नोकरी हवीच - मुख्यमंत्री
ठाणे-पनवेल लोकलसेवेचे उद्घाटन
ठाणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

 
राज्यातील मराठी आणि गैरमराठी हा सुरू झालेला वाद थंडावत असताना कोणताही भेदभाव न करता महाराष्ट्रीय तरुणांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी ठोस भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज रेल्वे राज्यमंत्र्यांसमक्ष मांडली.
ठाणे-तुर्भे-नेरुळ या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि रेल्वे राज्यमंत्री नारणभाई राठवा यांच्या हस्ते ठाण्यात झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, ठाणे-तुर्भे -पनवेल या रेल्वेसाठी सिडकोने ६७ टक्क्यांच्या भागीदारीत एक हजार ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नागरिकांना सर्वोत्तम रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणाऱ्या रेल्वेत कोणताही भेदभाव, प्रांतवाद, भाषावाद आड न आणता महाराष्ट्रातील तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी दाखविलेल्या धैर्याचे आभार मानीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पुढे गेला तर देश पुढे जाईल, त्यासाठी राज्यातील अविकसित भाग जलद गतीने मुंबई, ठाण्याला जोडण्याची अपेक्षा व्यक्त केली. चीन, जर्मनीप्रमाणे ३०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वे लाईन उभारण्याची सूचना केली. ठाणे व नवी मुंबई परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता एमएमआरडीएच्या माध्यमातून या परिसरातील दळणवळणाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून ठाण्यातील विकासकामांच्या निर्णयासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रेल्वे राज्यमंत्री नारणभाई राठवा ूयांनी सांगितले की, ठाणे स्टेशनवर आणखी लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना थांबा दिला जाईल. सिडको, राज्य शासन आणि रेल्वेच्या माध्यमातून शहरात नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे नियोजन केले जात असूून पुणे-नागपूर गरीब रथाचे उद्घाटन १९ किंवा २० जानेवारीला करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, खासदार आनंद परांजपे, सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे आणि महापौर स्मिता इंदुलकर यांची भाषणे झाली.