Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

कृषी उत्पन्न बाजार समितीतील मालवाहतूकदारही संपात सामिल?
नवी मुंबई, ९ जानेवारी/प्रतिनिधी

 
तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकर आधीच ‘गॅस’वर असताना आज सायंकाळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशी बाजारातील सुमारे ५०० हून अधिक वाहतूकदारांनी वाहतूकदारांच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केल्याने मुंबईसह आसपासच्या नगरांमध्ये आता जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. वाशी बाजारातून दररोज सुमारे पाच हजाराहून अधिक वाहने मुंबईत भाजीपाला, कांदा-बटाटा, अन्न-धान्य पोहचवीत असतात. आता या बाजारांमधील वाहतूकदार मध्यरात्रीपासून संपात सहभागी होत असल्याने मुंबईत या वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारातील रिटेल मोटर ट्रान्सपोर्ट या वाहतूकदारांच्या सर्वात मोठय़ा संघटनेने या संदर्भातील निर्णय सायंकाळी जाहीर केला. मुंबईत होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठय़ावर जोपर्यंत परिणाम होत नाही तोपर्यंत सरकार वाहतूकदारांच्या मागण्या मनावर घेणार नाही, हे ओळखून भाजीपाला, धान्य, कांदा-बटाटा, फळे, मसाला या पाचही बाजारांमधील वाहतूकदार मध्यरात्रीपासून संपात सहभागी होतील, अशी माहिती ‘आरएमटी’ सरचिटणीस मुलजीभाई सोमय्या यांनी दिली. दरम्यान ‘आरएमटी’ने या संदर्भात निर्णय जाहीर केला असला, तरी भाजीपाला तसेच कांदा-बटाटा बाजारातील वाहतूकदारांना आम्ही या संपात सहभागी होऊ देणार नाही, असे आश्वासन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले. राज्यभरातून कृषीमालाने भरलेल्या गाडय़ा प्रथम वाशी बाजारात रिकाम्या होतात आणि तेथून पुढे स्थानिक वाहतूकदारांच्या मदतीने त्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या नगरांच्या दिशेने रवाना होत असतात. देशभरात सध्या वाहतूकदारांचा संप सुरू असला, तरी वाशी बाजारातील वाहतूकदार या संपात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे राज्यभरातून येणारा भाजीपाला मुंबईत व्यवस्थित पोहचत होता. आज दिवसभर पेट्रोल टंचाई निर्माण होऊन देखील भाजीपाला, तसेच कांदा-बटाटय़ाची सुमारे सातशेहून अधिक वाहने मुंबईत दाखल झाली. मात्र रिटेल मोटर ट्रान्सपोर्ट या वाशीतील वाहतूक शाखेच्या सर्वात मोठय़ा संघटनेने या संपात सहभागी होत असल्याची घोषणा करत मुंबईकरांची अवस्था ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी करून टाकली. तरी धान्यबाजाराव्यतिरिक्त वाशीतील इतर कोणत्याही बाजारांमधील वाहतूकदार या संपात सहभागी होणार नसल्याचा दावा एपीएमसीचे संचालक अशोक वाळुंज यांनी केला आहे.