Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

दिगंबर कांडरकर पुन्हा शिवसेनेत
मुंबई, ९ जानेवारी / खास प्रतिनिधी

 
राज ठाकरे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा रोवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांच्यासोबत मनसेचा चौरंगी झेंडा हाती धरलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर कांडरकर यांनी आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. मनसेतून बाहेर पडल्यानंतर जवळजवळ एक वर्षांची विश्रांती घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षाकडे परतण्याचा निर्णय घेतला, असे कांडरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दिगंबर कांडरकर यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेत पुनप्र्रवेश केला. कांडरकर यांनी परतावे, यासाठी कार्याध्यक्षांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मोठी भूमिका बजावली. कांडरकर यांच्याकडे लागलीच कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नसली तरी येत्या काळात त्यांच्याकडे पक्षाचे योग्य ते काम सोपवले जाईल, अशी चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेची उमेदवारीही मिळण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कांडरकर यांना मनसे स्थापनेनिमित्तच्या शिवाजी पार्कवरील पहिल्या जाहीर सभेत मानाचे पान देण्यात आले होते. राज ठाकरे यांनी ज्या निवडक पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी दिली होती त्यांत कांडरकर होते. मात्र काही काळानंतर कांडरकर यांचा मनसेत भ्रमनिरास झाला. आपल्याला मुंबई प्रदेश सरचिटणीस करण्यात आले होते. मात्र पक्षाकडून जनतेच्या कोणत्याच प्रश्नांवर आंदोलन केले जात नाही, असे आपल्या लक्षात आले. यासंदर्भात जेव्हा जेव्हा विषय काढला तेव्हा त्याबाबत उदासीनता दाखवली गेली. त्यामुळे वर्षांपूर्वी आपण राज ठाकरे यांना एका पत्राद्वारे आपण पक्षात राहू इच्छित नसल्याचे कळविले होते, असे सांगून कांडरकर म्हणाले की, आता शिवसेनेतर्फे देण्यात आलेली जबाबदारी आपण पार पाडू.