Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या सहा जणांना अटक
कल्याण, ९ जानेवारी/वार्ताहर

 
बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी इंटरनेटवर नोकरीची जाहिरात देणाऱ्यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यासाठी पैसे बँकेत जमा करायला सांगून, त्याचा अपहार करणाऱ्या एका सोनेरी टोळीतील सात जणांपैकी सहाजणांना अटक केली असून, यामध्ये एका नायजेरियन तरुणांचा समावेश आहे.
शहरातील दीपिका किरीट शर्मा या तरुणीने ग्रॅज्युएशन झाल्यावर हवाईसुंदरीचा कोर्स केला. इंटरनेटवर हवाईसुंदरीच्या जॉबसाठी जाहिरात होती. या जाहिरातीचा फायदा या टोळीने घेतला व हिल्ला व्हर्जिन अटलांटिक एअरवेजमध्ये आपली निवड झाली आहे. आपण कुलाबा येथील बँक ऑफ बडोदा या शाखेत ८०० पाऊंड (६१ हजार) भरा असे सांगितल्याने, नोकरी मिळाल्याच्या आनंदात दीपिका शर्मा यांनी पैसे भरले. अशी वेळोवेळी पैशाची मागणी केल्याने त्यांनी पाच लाख २८ हजार रुपये भरले. नोकरीचा कॉल न आल्याने लंडनच्या कंपनीत चौकशी केली असता, आमच्या कंपनीत तुमचे पैसे पोहोचलेले नाहीत व आमच्याकडे हवाईसुंदरीची जागा नाही, असे उत्तर कंपनी व्यवस्थापनाने सांगितल्याने, आपणास फसविले गेल्याचे दीपिका शमाच्या लक्षात आले. मग तिने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नायजेरियन तरुण मुंबईत येतात व दुकानदाराला हाताशी धरून कुलाब्यासारख्या विभागातील बँकेत अकाऊंट उघडतात. झोपडपट्टीतील तरुणांना हाताशी धरतात व त्यांना ८ ते १० टक्के देऊन त्यांना आपल्या टोळीत सहभागी करतात.
या टोळीला पकडण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात यांनी खास पथक स्थापन केले होते. या पथकाने कुलाब्यामधील बँक ऑफ बडोदामधून चेक, बँक स्टेटमेंट ताब्यात घेऊन या टोळीतील सहा जणांना गजाआड केले आहे. .