Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

सीमाभागाचा ‘आवाज’ बनण्यासाठी राज ठाकरे यांना साकडे
संदीप आचार्य
मुंबई, ९ जानेवारी

 
गेली ४८ वर्षे अनिर्णित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तेथील मराठी बांधवांचा ‘आवाज’ बनण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती ‘मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती’ने आज राज ठाकरे यांना त्यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी भेटून केली. बेळगावातील मराठी नेत्यांमधील बेकी संपवा, आपण येत्या १६ जानेवारी रोजी बेळगावात येऊ, असे आश्वासन राज यांनी दिले.
राज यांच्या भेटीने भारावलेल्या समितीच्या सदस्यांनी राज यांच्या रोखठोक बोलण्याचे कौतुक केले आणि अगदी बाळासाहेबांचाच भास होत असल्याचे स्पष्ट केले. सीमाभागातील लक्षावधी मराठी बांधव आजही महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आसूसलेले असताना महाराष्ट्राच्या विधानसभेत दरवर्षी केवळ सीमाप्रश्नी ठराव संमत करण्याचा उपचार पार पाडला जातो. सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू असलेल्या सीमाप्रश्नाबाबत बेळगावात आता केवळ कानडीलाच स्थान असून तेथे कोणताही विरोध नाही, हे दाखविण्यासाठी येत्या १६ जानेवारी रोजी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यात येणार आहे. गेल्या ४८ वर्षांत बेळगाव येथे हे दुसऱ्यांदा अधिवेशन होत असून येथील मराठी जनतेवर कर्नाटक सरकारकडून मोठय़ा प्रमाणात अत्याचार केले जात असल्याचे या समितीच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांना सांगितले. बेळगावातील मराठी जनता आजही मनाने महाराष्ट्रात असल्याचे स्पष्टपणे दाखवून देण्यासाठी येत्या १६ जानेवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राज ठाकरे यांना आमंत्रण देण्यासाठी समितीचे अध्यक्ष व माजी आमदार वसंत पाटील, मनोहर किणीकर, आमदार दिगंबर पाटील, एन. हुद्दार आदींचे शिष्टमंडळ आले होते.
राज ठाकरे यांनी सीमावासीयांचा ‘आवाज’ बनावे अशी विनंती या सदस्यांनी केली. तेव्हा मी तुमच्यामागे ठामपणे आहे. मात्र त्यासाठी तुम्ही सर्वानी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे राज म्हणाले. तुमच्यातील भांडणे विसरून सीमाभागातील सर्व नेते जर १६ जानेवारी रोजी व्यासपीठावर दिसणार असतील तर मीही तुमच्या लढय़ात उतरीन, असे राज यांनी सांगितले.
समितीचे नाव ‘एकीकरण समिती’ आहे मग ‘बेकीकरण’ का करता असा सवाल राज यांनी केला. बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक राज्य विधिमंडळ अधिवेशनाला विरोध करण्यासाठी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून समितीच्या सदस्यांनी राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्या तरी त्यांच्या आशा आता राज ठाकरे यांच्याकडेच लागून राहिल्या आहेत. महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा प्रश्न राज यांनी ज्या पोटतिडकीने लावून धरला आहे तो पाहता, सीमाप्रश्नासाठी आता राज यांचेच लढाऊ नेतृत्व योग्य ठरेल, असा विश्वास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला..