Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील तज्ज्ञांच्या उपसमित्या नेमून सूचना मागवणार
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

 
राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या आजच्या बैठकीत तज्ज्ञांच्या विविध सूचनांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी आता प्रत्येकाच्या
विषयातील प्रभुत्वानुसार उपसमित्या तयार करण्यात येणार असून त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत सरकार निर्णय घेणार आहे.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आदींच्या उपस्थितीत ६६ जणांच्या तज्ज्ञ समितीची बैठक पार पडली. त्यावेळी सर्व नागरिकांना ओळखपत्रे द्यावीत, इथपासून ते विमानतळ परिसरातील झोपडय़ा हटवाव्यात इथपर्यंत अनेक मुद्दे तज्ज्ञांनी उपस्थित केले. मात्र हे सर्व मुद्दे विस्ताराने समोर यावेत व यावर सर्वागीण विचार व्हावा यासाठी मुख्य समितीमधील विविध विषयांच्या तज्ज्ञांच्या उपसमित्या नेमण्याचे आम्ही निश्चित केले असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण व गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
ओळखपत्रांसारख्या विषयावर केंद्र सरकारची परवानगी लागेल. मात्र केंद्र सरकारही या विचाराप्रत आले आहे. त्यामुळे हा विषयदेखील कसा हाताळावा याबाबत सरकार विचार करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सूतोवाच केले. बैठकीमध्ये किनारपट्टीच्या सुरक्षेचा विषयही उपस्थित झाला. याबाबतही र्सवकष धोरण बनविण्याबाबत ठोस पावले उचलण्याची सूचना अनेकांनी यावेळी केली. तसेच अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी थिंक टँकची निर्मिती करण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. क्विक रिस्पॉन्स टीम, सुरक्षा यंत्रणांचे आधुनिकीकरण आदी अनेक
विषयांबाबतही अनेक मुद्दे या बैठकीत उपस्थित झाले होते. मात्र आता या सगळ्या मुद्दय़ांबाबत विविध उपसमित्या तयार झाल्यानंतरच त्याचा अहवाल सरकारकडे येईल व त्यानंतरच हा विषय मार्गी लागेल, असे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.