Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

असुरक्षित वाय-फाय नेटवर्क शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची मोहीम
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

 
दहशतवाद्यांनी पाठविलेल्या धमकीच्या इ-मेलनंतर मुंबईतील असुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा मुद्दा प्रकाशात आला होता. त्याच पाश्र्वभूमीवर येत्या १२ जानेवारीपासून मुंबईतील असुरक्षित वाय-फाय नेटवर्क शोधून ते सुरक्षित करण्याची मोहीम मुंबई पोलिसांतर्फे राबविण्यात येणार असून ८२ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी मोबाईल आणि लॅपटॉपसह असुक्षित वाय-फाय इ-मेल शोधताना दिसेल. या मोहिमे अंतर्गत सूचना देऊनही एखाद्याने असुरक्षित वाय-फाय नेटवर्क सुरक्षित केले नाही आणि त्याच्या वाय-फाय नेटवर्कचा गैरवापर केला गेला तर त्या व्यक्तीलाही दोषी ठरवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हल्ल्यांपूर्वी दहशतवाद्यांनी धमकीचे इ-मेल पाठविले होते. असुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा फायदा घेऊन तसेच इ-मेल हॅक करून दहशतवाद्यांनी हे धमकीचे इ-मेल पाठविण्यात आले होते. दहशतवाद्यांच्या या कृतीला तसेच असुरक्षित वाय-फाय नेटवर्कमुळे होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे असुरक्षित वाय-फाय नेटवर्क शोधून काढून ते सुरक्षित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील ८६ पोलीस ठाण्यांतून ज्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान आहे, अशा ८२ पोलीस निरीक्षक- उपनिरीक्षकांची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली आहे. मुंबईच्या आयटी समितीचे अध्यक्ष विजय मुखी यांनी आज या ८२ पोलीस अधिकाऱ्यांना मोबाईल तसेच लॅपटॉपद्वारे असुरक्षित वाय-फाय नेटवर्क कसे शोधून काढायचे याचे प्रशिक्षण दिले. येत्या १२ तारखेपासून ८२ जणांचे हे पथक विजय मुखींसोबत बाजार, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील असुरक्षित इ-मेल शोधून काढण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर सुरक्षित वाय-फाय नेटवर्कच्या जागरुकतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मेयर ब्रिगेड’ या महाविद्यालयीन तरुणांसोबत हे पथक आपले काम सुरू करेल. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची पथके लॅपटॉप आणि मोबाईलद्वारे असुरक्षित वाय-फाय नेटवर्क शोधताना दिसतील. आजघडीला मुंबईत एक लाख वाय-फाय नेटवर्क असून त्यातील ४० ते ५० टक्के वाय-फाय नेटवर्क ही असुरक्षित असल्याचे मुखी यांनी सांगितले.