Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

संपेना संप : जीव टांगणीला
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

 
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा संप संध्याकाळनंतर मिटल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वा:स सोडला. मात्र वाहतूकदारांचा संप अद्यापही सुरूच असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडय़ामुळे महागाई भडकण्याच्या भीतीने मुंबईकरांचा जीव टांगणीला आहे.ओएनजीसीने सकाळपासून महानगर गॅसला (एमजीएल) सुरू केलेल्या अतिरिक्त गॅसपुरवठय़ामुळे मुंबईतील लाखो घरांमधील गॅस विझण्याची नामुष्की आज टळली. दुपारी बारा वाजल्यापासून बेस्टच्या आठ आणि एमजीएलच्या तीन सीएनजी फिलिंग स्टेशनवर गॅस उपलब्ध झाला. संध्याकाळी सहानंतर शहरातील ५३ फिलिंग स्टेशन सुरू करण्यात आले होते व शनिवार सकाळपर्यंत शहरातील सर्व १३४ फिलिंग स्टेशन नेहमीप्रमाणे कार्यरत होतील, असे एमजीएलच्या प्रवक्त्याने सांगितले. शहरातील ६० टक्के पेट्रोल पंपांवर कालपासून खडखडाट होता. हिंदुस्तान पेट्रोलियमचे अनेक पंप सुरू असले तरी, वाहनधारकांची झुंबड उडाल्याने अल्पावधीतच तेसुद्धा बंद झाले. परिणामी दुपापर्यंत शहरातील ८५ टक्के पंप कोरडे होते, असे ‘फामपेडा’चे अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले. इंधनाअभावी शहरातील वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली होती. अनेकांनी आपली वाहने उभी ठेवली होती. इंधन काटा रिजव्‍‌र्हला लागल्याने अनेक वाहनधारक इंधन उपलब्ध असलेले पंप धुंडाळताना दिसत होते. पेट्रोल-डिझेल उपलब्ध असलेल्या पंपांवर लांबलचक रांगा तर, उर्वरित ठिकाणी ‘पंप बंद’ असल्याचे बोर्ड झळकत होते.
सुमारे सहा लाख लीटर इंधन साठा उपलब्ध असल्याने बेस्टच्या बसेस सुरळीत सुरू होत्या. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यास बेस्टला काही बसेस बंद ठेवाव्या लागल्या असत्या. मात्र एमजीएलने दुपारनंतर सीएनजीपुरवठा सुरू केल्याने ती नामुष्की टळली. सीएनजीअभावी बहुतांश म्हणजे जवळपास ७०-८० टक्के रिक्षा-टॅक्सी रस्त्यांवर येऊ शकल्या नव्हत्या. परिणामी बेस्टच्या थांब्यांवरील गर्दी वाढली होती. सीएनजी फिलिंग स्टेशनबाहेर कालपासूनच लागलेल्या लांबलचक रांगांमुळे संध्याकाळी पंप सुरू झाल्यानंतर दोन-तीन तासांनी सीएनजी भरण्यासाठी नंबर लागल्याचे अनेक टॅक्सी-रिक्षांच्या चालकांनी सांगितले.
तेल कंपन्यांतील संपामुळे उद्भवलेल्या अभुतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने दुपारी प्रथम बीपीसीएल आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत इंडियन ऑईल, ओएनजीसी व गेलच्या अधिकाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबईकरांचा जीव भांडय़ात पडला. मात्र गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मालवाहतूकदारांचा देशव्यापी संपामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असला तरी, त्या महागल्या असून अन्य वस्तूंचा काळाबाजार होऊ लागला आहे. यापाश्र्वभूमीवर वाहतूकदारांचा संप कधी मिटणार अशी भ्रांत मुंबईकरांना पडली आहे.